डोअर किपरने दादा कोंडकेंची कॉलर पकडून त्यांना थिएटरबाहेर काढलं होतं

दादा कोंडके यांचे चित्रपट हे मराठी प्रेक्षकांच्या मनाचा एक सुखद कप्पा आहे. दादा कोंडकेंनी गाजवलेला चित्रपटांचा काळ हा सुवर्णकाळ होता. दादांच्या चित्रपट कारकिर्दीतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रसिद्धीचा चित्रपट म्हणजे सोंगाड्या .

या चित्रपटाच्या अगदी सुरवातीपासून ते हिट होण्यापर्यंत अनेक घटना घडल्या त्यापैकी आज एक किस्सा आपण बघूया.

सोंगाड्या हा दादांचा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट होता. नाटकात त्यांना जितका आपलेलपणा वाटत होता तितका त्यानं चित्रपटात वाट नसायचा. पण चित्रपट क्षेत्रातले दिग्गज भालजी पेंढारकर यांनी दादांना नाटकाऐवजी चित्रपट कर असा सल्ला दिला आणि चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक अशा गोष्टी हाताळायला सांगितल्या.

अनेक अडीअडचणींचा सामना करून सोंगाड्या हा चित्रपट तयार झाला. चित्रपट पूर्ण झाला खरा पण तो प्रदर्शित करायला कुणी तयार नव्हतं. कारण या चित्रपटात एका भोळसट मुलावर नायिका भाळूच कशी शकते असा सवाल वितरकांनी विचारला होता. लोकांच्या निगेटिव्ह कमेंटमुळे दादांनी सोंगाड्या चित्रपटाकडून अपेक्षा सोडली होती.

त्यात चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दिवशी अमावस्या होती असं कुणीतरी दादांना सांगितलं. यावर दादांचे वितरक असलेले त्यांचे पुतणे विजय कोंडके यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासाठी पुण्याच्या भानुविलास थेटरचे मालक बापट याना विनंती केली. मात्र पुढे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्यांनी तारीख बदलण्यास नकार कळवला.

यावर दादांनी वैतागून देवाचं नाव घे आणि त्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करा असं विजय कोंडकेंना सांगितलं आणि ते विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या त्याकाळी जोरात चाललेल्या नाटकाच्या प्रयोगाला निघून गेले.

विच्छाचे प्रयोग संपवून दादा पुण्यात आले. पुण्यातल्या पुना गेस्ट हाऊसवर त्यांचा मुक्काम असायचा. ज्यावेळी ते आले तेव्हा त्यांचा मित्र चारुदत्त आणि गेस्ट हाऊसचे मालक येऊन त्यांचं अभिनंदन करायला लागले. दादांना मात्र काही कळेना , तेव्हा त्यांना सांगितलं कि,

सोंगाड्या सुपरहिट झालाय, चित्रपट बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. थेटरबाहेर अक्षरशः जत्रा भरल्याच वातावरण आहे. हे ऐकून दादा जवळपास उडालेच, त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण या चित्रपटाकडून त्यांच्या अपेक्षा शून्य होत्या.

थेटरचे मालक बापट दादांना भेटायाला आले आणि त्यांनी दादांचं कौतुक केलं आणि सांगितलं कि लोकांनी चित्रपट डोक्यावर घेतलाय , गर्दी आवरण्यासाठी पोलीस बोलवावे लागत आहे. त्यावेळी चित्रपटाचा दुसरा आठवडा सुसाट चालू होता. पुढे हा चित्रपट सहा आठवडे भानुविलास थेटरमध्ये तळ ठोकून होता. 

भरतनाट्य थिएटरमध्ये दादांचा विच्छेचा प्रयोग चालू होता. त्यावेळी दादांचे मोठे बंधू तिथे आले आणि प्रयोग संपल्यावर दादांना चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहण्यासाठी घेऊन गेले. रात्रीचा शेवटचा शो भानुविलास थेटरात सुरु होता. बाहेर इतकी गर्दी नव्हती , पण थेटरमध्ये मात्र तुडुंब गर्दी होती. दादा तिकीट खिडकीवर गेले तर तिथं कोणीच नव्हते.

थेटरच्या दरवाज्यावर कोणीच नव्हतं बहुतेक डोअरकीपर बाहेर गेला असावा असं समजून दादा थेटरात शिरले तोच दादांची मागून कुणीतरी कॉलर पकडली आणि अक्षरशः दादाला त्या माणसाने हाकलून लावत बाहेर काढले आणि दादांनाच ठणकावून सांगितले कि, ” तिकीट असल्याबगार आत घुसायचा नाय ”  या प्रकाराने दादा खुश झाले.

पुढे जेव्हा सोंगाड्या चित्रपटाची सिल्व्हर जुबली साजरी करण्यात आली तेव्हा दादांची कॉलर पकडून थेटरातून हाकलून लावणाऱ्या तिथल्या डोअरकिपरला बोलावून त्याचा सत्कार दादांनी केला होता. जितके प्रयत्न चित्रपट बनवणारे लोकं चित्रपट हिट व्हावा म्हणून करतात तितकेच प्रयत्न हि लोकसुद्धा करत असतात ,असे उद्गार दादांनी काढले.

सोंगाड्याने दादांना घराघरात पोहचवले. सोंगाड्याने मात्र प्रेक्षकांना वेड लावलं होतं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.