डोरेमॉनच्यात असा कोणता कल्ट होता, ज्यामुळे तो हिट झाला हे अजूनही कळत नाही

“है बडा प्यारा दोस्त हमारा डोरेमॉन”

लेट नव्वदच्या दशकातल्या पोरांना डोरेमॉनचं हे अख्खं गाणं आजही चालीसकट तोंडपाठ असतंय. शाळेतून घरी आलं की कपडे बदलून हात पाय धूवून एखादा नियम घालून दिला असल्यासारखं टीव्हीसमोर बसायचं आणि हंगामा चॅनेल लाऊन लाडक्या डोरेमॉनला बघायचं.

मग घरातल्या आजी आजोबांशी भांडावं लागलं, त्यांच्या हातातून रिमोट हिसकावून घ्यायला लागला आणि नंतर आईचा ओरडा खावा लागला तरी चालेल पण एपिसोडचा एक मिनीट पण बघायचा राहिला नाही पाहिजे एवढंच डोक्यात असायचं.

काळाच्या पुढे धावणाऱ्या डोरेमॉनने खरोखर एक काळ गाजवलेला.

पण अर्थात हे कार्टून बघताना ह्यातल्या पोरा पोरींची नावं गण्या, मंगेश, बबलू सोडून नोबीता, जियान, शीझुका असली का होती हे कधीच कळायचं नाय. आमची एक येडी मैत्रीण तर त्या शिझुकाला ‘शीधूका’ म्हणायची आणि आम्ही सगळे तिला लय हसायचो. पण तरी हा प्रश्न पडायचाच की ह्यांची नावं ही अशी का.

मग लक्षात आलं की हे कार्टून भारतात बनलेलं नसून जपानमधल्या लोकांनी बनवलंय आणि म्हणून या कार्टूनमधल्या पात्रांची नावं भारतीय नाहीत तर जपानी आहेत.

पण मग आपण पाहतो त्या कार्टूनची भाषा हिन्दी कशी? तर डबिंगमुळे. आणि फक्त हिंदीच नाही तर जगभरातल्या अनेक भाषांमध्ये ह्या जपानी कार्टूनचं डबिंग झालंय. ही कार्टून सिरिज एका जॅपनीज कॉमिक सिरिजवरुन काढण्यात आलेली.

हिरोशी फुझीमोटो आणि मोटो ॲबीको नावाच्या दोन कार्यकर्त्यांनी ही सिरिज काढली होती. हे दोघंच या सिरिजचे राइटर आणि इलसट्रेटर होते.

या सिरिजमधली गोष्ट, हुशार आणि सुपरपॉवर असलेल्या एका निळ्या बोक्याभोवती आणि त्याच्यासोबत असणाऱ्या एका मठ्ठ मुलाभोवती फिरते. शिवाय नोबीता, त्याची शाळा, त्याचे मित्र, आणि त्याची दवनीय अवस्था या सगळ्यामुळे आपल्याला सगळं कायम रीलेट होत रहातं. एक गोष्ट सोडून, ती म्हणजे हा अजब बोका. पण रीलटेबल वाटत नसला तरी हा बोका लय जवळचा आणि खास वाटायचा. आणि त्याच्याकडे बघून आपल्याही आयुष्यात असा एखादा खास दोस्त असावा असं वाटायचं.

त्या मठ्ठ मुलाची म्हणजेच नोबीताची मदत करायला म्हणूनच हा बोका धरतीवर आलेला असतो. आणि बोक्याचं नाव असतं डोरेमॉन.

ह्या डोरेमॉनकडे, आजीबाईच्या बटव्यासारखा एक बारका खिसा असतो. आणि आज्जीबाईच्या बटव्यातून जसं काहीही निघू शकतं तसं ह्या बोक्याच्या खिशातूनही बरंच काय काय निघत असतं आणि त्या वस्तूंना बोका गॅजेट म्हणत असतो आणि त्याच्याकडची ही भन्नाट गॅजेट्स तो नोबीताला संकटांपासून वाचवायला वापरत असतो. 

ह्या डोरेमॉनची ओरिजिनल कॉमिक सिरिज १५ डिसेंबर १९६९ पासून २३ जून १९९६ पर्यंत पब्लिश केली गेली. आणि ह्या सिरिजमध्ये जवळ जवळ १३४५ नवनवीन गोष्टी होत्या. ही कॉमिक सिरिज एवढी खुंखार हिट झाली आणि गाजली की १ एप्रिल १९७३ साली ह्याच कार्टून कॉमिक सिरिजचं अनिमेटेड व्हर्जन बनवलं गेलं.

नंतर डोरेमॉनच्या एकूण तीन अनिमेटेड सिरिज बनवल्या गेल्या होत्या.

ह्यातली पहिली सिरिज जी १ एप्रिल १९७३ साली आली ती ३० सेप्टेंबर १९७३ पर्यंत चालली, पण ह्या सिरिज मधले कॅरक्टर्स आणि विषय जरा वेगळे घेतलेले होते आणि त्यामुळे ही सिरिज फार काही गाजली नाही. आणि पाच महिन्यातच बंद पडली. या पहिल्या सिरिजमधली एकही कॉपी आज कोणाकडेच अवेलेबल नाहीये.

पण २ एप्रिल १९७९ ला दुसरी अनिमेटेड सिरिज जी आली ती भयानक हीट झाली.

ही सिरिज १८ मार्च २००५ पर्यंत ब्रॉडकास्ट केली गेली. आणि तिसरी अनिमेटेड सिरिज आली १५ एप्रिल २००५ मध्ये. ही सिरिज सुद्धा भारत आणि जगभरात खूप फेमस झाली. 

डोरेमॉन कार्टूनचा यू एस पी होता तो म्हणजे अतिशय खरी वाटणारी आणि आपल्या आयुष्याला रीलेट होणारी ह्या कार्टूनमधली कॅरेक्टर्स. एक अति सामान्य, एक अति हुशार, एक अति शहाणा आणि एक अति मंद अशा सगळ्या स्वभावाची पोरं ह्या कार्टूनला जास्त इंट्रेस्टिंग बनवतात.

शिवाय काळाच्या पुढे धावणारा बोका फक्त जादूचे प्रयोग करत नाही तर कार्टून मधल्या आणि कार्टून बघणाऱ्या पोरांना चार चांगल्या गोष्टी पण शिकवतो. त्यामुळे सगळ्या पोरांच्या आई वडिलांचा पण तो कायमच लाडका राहिलाय.

डोरेमॉन कार्टून जगभरात इतकं गाजलं की त्यावर ३५ हून अधिक मुव्हीज आल्या. शिवाय डोरेमॉनचे व्हिडिओ गेम्स सुद्धा बनवण्यात आलेत.

२०१५ सालापर्यंत डोरेमॉन कॉमिक सिरिजच्या जवळ जवळ १०० मिलियन कॉपीज विकल्या गेलेल्या. आणि जवळपास ३० देशात हे कार्टून आजही दाखवलं जातं. एवढंच काय तर आपल्या ह्या डोरेमॉन नावाच्या हीरोला २००२ साली टाइम एशिया मॅगजीनमध्ये ऐशीयन हीरोचा अवॉर्ड सुद्धा मिळालाय. आणि जपानी लोकांनी तर डोरेमॉनला आपला कल्चर आयकॉनच मानून टाकलय.

डोरेमॉन हे कार्टून पूर्वी हंगामा चॅनलवर लागायचं आणि आता ह्या कार्टूनचे एपिसोड्स तुम्ही यू ट्यूबवर पाहू शकता, डोरेमॉनची ॲनिमेटेड सिरिज तुम्ही netflix वर पाहू शकता.

आणि आत्ताही आपण कितीपण मोठे झालो तरी, ‘जिंदगी सवार लू इक नई बहार दू’ असं म्हणत, हलत डुलत हा निळा बोका आपल्याही आयुष्यात यावा आणि आपणही नोबीता सारखं नशीब काढावं असं आजही मनात येऊन जातं खरं…   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.