कंबरेखाली वार करणाऱ्या प्रत्येकाने प्रमोद महाजनांचे हे ९ मुद्दे वाचायला हवेत…

प्रमोद महाजन यांची आज जयंती. भारतीय जनता पक्षातील एक महत्वाचा नेता म्हणून तर प्रमोद महाजन आपल्याला माहित होतेच,पण त्यापलीकडे जाऊन ते एक उत्कृष्ट वक्ते होते. आपल्या अमोघ वकृत्व शैलीमुळे त्यांनी अनेक राजकीय सभा अक्षरशः गाजवल्या.

संसदेत देखील त्यांनी अभ्यासू भाषणाद्वारे आपली एक वेगळीच छाप सोडली होती. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ने उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी भाषण कशा प्रकारे केलं पाहिजे, भाषण करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयीची कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत प्रमोद महाजन यांनी उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी जे ‘नुस्के’ सांगितले तेच आज आम्ही प्रमोद महाजनांच्या जयंतीनिमित्ताने तुमच्याशी शेअर करतोय…

१) सुरुवात महत्वाची. 

कुठलंही भाषण देताना भाषणाची सुरुवात अतिशय महत्वाची. भाषणाच्या सुरुवातीलाच तुम्ही प्रेक्षकांचा ताबा घ्यायला हवा. जर सुरुवात चांगली झाली नाही तर नंतर तुम्ही कितीही महत्वाचं काही बोलत असाल तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे भाषणाची सुरुवातच चांगली  असायला हवी आणि शेवट देखील प्रभावी हवा. शिवाय तुमचा आवाज शेवटच्या श्रोत्यापर्यंत व्यवस्थित पोहचतोय ना, याचीही काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. नाहीतर लोक आवाज येत नाही म्हणून गोंधळ घालायला लागतात. माईक व्यवस्थित अंतरावर आहे ना, तो व्यवस्थित अंतरावर आहे ना हे देखील बघितलं पाहिजे.

२) विषयाचा अभ्यास हवा.

मी अनेक वेळा राजकीय नेत्यांची भाषणं  बघतो, त्यावेळी जाणवतं की काही अपवाद वगळता बहुतेक नेत्यांचा, त्यांना ज्या विषयावर बोलायचंय आहे त्या विषयाचा अभ्यासच नसतो. विषयाचा अभ्यास नसल्याने बऱ्याच वेळा त्यांची भाषणं कंटाळवाणी होतात. काही लोकांना तर विषयाचा गंधही नसतो, कुठल्याही प्रसंगी ते एकाच प्रकारचं भाषण करतात. हे टाळता यायला हवं. तेव्हा सर्वप्रथम ही गोष्ट महत्वाची की आधी विषय वाचून घ्या, समजून घ्या आणि त्यावर व्यवस्थित अभ्यास करा. आपण ज्या प्रेक्षकांसमोर बोलणार आहोत, त्यांचीही माहिती आपणास असणं अधिक चांगलं. प्रेक्षकांची माहिती असेल तरच आपण योग्य ठिकाणी योग्य उदाहरणं देऊ शकू. उद्योगपतींच्या बैठकीत बोलताना बैलगाडीचं उदाहरण देऊन नाही चालणार ना..?

३) प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करता यायला हवं. 

आपल्या शैलीने लोकांना खिळवून ठेवता यायला हवं. तुमचं भाषण सुरु असताना तुम्ही कधी पहिला मुद्दा मांडला आणि कधी दहाव्या मुद्द्यावर पोहोचले, हे देखील प्रेक्षकांच्या लक्षात आलं नाही पाहिजे, इतके प्रेक्षक तुमचं भाषण ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला पाहिजेत. अनेक वेळा प्रेक्षकांना गंभीर भाषण फार काळ ऐकायला आवडत नाही, त्यामुळे भाषणांमध्ये हसी-मजाक असायला हवा. गमती-जमती हव्यात.

४) तुमची स्वतःची वेगळी शैली हवी. 

प्रभावी वक्ता होण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची शैली विकसित करायला हवी. आपण  अनेक नेत्यांना भाषण करताना ऐकतो, बहुतेक जण भाषणाची सुरुवात ‘भाईयो और बेहनो’ अशी करतात, याउलट अटलजी मात्र आपल्या भाषणाची सुरुवात ‘बेहनो और भाईयो’ अशी करतात. छोटासाच फरक आहे, पण तो इतर सगळ्यांपेक्षा अटलजींना वेगळं करतो. तुमच्यातलं वेगळेपण प्रेक्षकांना तुमच्याकडे आकर्षित करतं.

५) आरशात बघत चला. 

कुठल्याही भाषणाला निघण्यापूर्वी एकदा स्वतःला आरशात बघून घ्यायची सवय लावून घ्या. केस नीट विंचरलेले आहेत की नाहीत, कपडे व्यवस्थित आहेत की नाही, हे बघणं महत्वाचं. या गोष्टी खूप छोट्या-छोट्या असतात पण त्या खूपच महत्वाच्या. तुम्ही जर खूप चांगली मांडणी करत असाल पण तुमची वेशभूषा विचित्र असेल तर त्यामुळे लोकांचं लक्ष तुमच्या भाषणाकडे न जाता, तुमच्या वेशभूषेकडेच जाण्याची शक्यता असते.

६) मुद्यांची विविधता हवी.

कुठल्याही विषयावर भाषण करताना त्याविषयीच्या बारीक-सारीक मुद्यांना तुम्हाला स्पर्श करता यायला हवा. एकच मुद्दा फार काळ रंगवून सांगण्याचा मोह टाळता यायला हवा. वक्ता म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेत सर्वच मुद्द्यांना कमी-अधिक प्रमाणात स्पर्श करणं जमायला हवं. आपल्याकडील असणारं संपूर्ण ज्ञान समोरच्याला दिल्याशिवाय थांबायचं नाही, असं ठरवून कधीच भाषण करू नका. कारण लांबी वाढली की भाषणाचा प्रभाव कमी व्हायला लागते.

७) व्यासपीठाचं भान हवं.

आपण कुठल्या ठिकाणी व्यासपीठावर आणि कुणासमोर बोलतोय यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शैलीत भाषण करणं आवश्यक असतं. संसदेत बोलणं आणि प्रचारसभांमध्ये बोलणं या दोन फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही ठिकाणी एकाच शैलीत भाषण करून नाही चालणार. संसदेसारख्या ठिकाणी बोलताना आपण जनतेसाठी बोलतोय आणि ही जनतेपर्यंत पोहोचणार आहे ती पत्रकारांच्या माध्यमातून त्यामुळे तुमचा मुद्दा पत्रकारांपर्यंत पोहोचतोय ना याचं भान ठेवणं आवश्यक.

८) डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका.

तुम्ही भाषण उत्स्फुर्तपणे करणार असाल किंवा लिहून आणलेलं बोलून दाखवणार असाल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हाला समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलता यायला हवं. त्यावरून सामोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेचा अंदाज येतो. तुमचं भाषण जर कंटाळवाणं होत असेल तर अशा वेळी तेच भाषण पुढे रेटून उपयोग नाही.

९) देहबोली महत्वाची. 

भाषण करणं म्हणजे प्रत्येकवेळी सभेची आणि शब्दांचीच गरज असते असं नाही. जेव्हा तुम्ही कुणालाही भेटता, त्यावेळी तुम्ही त्याच्याशी एक प्रकारचा संवादाच साधत असता. त्यामुळे कोणाशीही भेटताना तुमची देहबोली अतिशय महत्वाची असते. एखादा भेटायला आल्यानंतर आपण दुसऱ्याशी फोनवर बोलणं, पेपर वाचत बसणं, काही लिहिणं हा समोरच्याचा अपमान असतो. तुम्ही त्याला ५मिनिट देणार असाल तर ते व्यवस्थित द्या. एकदा का तुम्ही समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घेतलं की मग तुम्ही त्याचं काम करा अथवा नका करू, तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेणं, ही गोष्ट देखील त्याच्यासाठी महत्वाची ठरते.

आत्ता या गोष्टी आपणास सहज सोप्या साध्या वाटतीलही पण आजच्या राजकारणातल्या आरोप प्रत्यारोप आणि कंबरेखालीच भाषा पाहिली तर सहज लक्षात येईल सोप्या गोष्टी बोलणं किती अवघड असतं. 

हे ही वाचा – 

 

Leave A Reply

Your email address will not be published.