तामिळनाडू सोडून हे अण्णा मुंबईत आले, त्यांचा डोसा आज दुबई, न्यूझीलंड मध्ये मिळतो..

साऊथ इंडियातून भारताला मिळालेली दौलत म्हणजे सिनेमे आणि डोसा. या दोन गोष्टी साऊथमध्ये बक्कळ आहे आणि त्या कधीही नष्ट होणार नाही इतपत त्या मजबूत आहेत. तर मेन विषय आहे डोसाचा.

डोसा प्लाझा हे दुकान किंवा त्याचा लोगो तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल, हा लोगो फक्त भारतातच नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा फेमस आहे पण या डोसा प्लाझाची सुरवात महाराष्ट्रातून झालीय त्याबद्दल जाणून घेऊया.

डोसा प्लाझा सुरु करणारे आणि त्याचे सर्वेसर्वा आहेत प्रेमी गणपती.

एकेकाळी मुंबईत हजार बाराशे रुपये घेऊन ते मुंबईत आले आणि तिथून पुढे आपल्या आयडियाच्या जोरावर प्रेम गणपतीने आपला व्यवसाय इतका वाढवला कि तो थेट सातासमुद्रापार गेला.

तामिळनाडूच्या एका गरीब परिवारातून प्रेम गणपती येतात आणि काहीतरी कामधंद्याच्या सोयीसाठी त्यांनी मित्रासोबत मुंबई गाठली. मुंबईत येऊन मित्राने बाराशे रुपयाच्या नोकरीचं आश्वासन दिलं. 

पण बांद्रा स्टेशनवर अचानक जवळ होते तितके पैसे एका चोरट्याने प्रेम गणपतीचं लक्ष नसताना चोरून नेले त्याच्याच मित्राने ज्याने त्याला मुंबईत नोकरीचं आश्वासन दिलं होतं. आता एवढ्या मोठ्या शहरात प्रेम गणपतीचं जवळचं कोणी नव्हतं.

लोकं आणि भाषा दोन्ही अनोळखी, आता इथून माघारी फिरायचं म्हणलं तरी जवळ पैसे नव्हते त्यामुळे तिथेच का बेकरीत प्रेम गणपती काम करू लागले. भांडी घासणे,झाडून पुसून घेणे अशी काम ते करू लागले.

दीडशे रुपये प्रमाणे प्रेम गणपती बेकरीमध्ये भांडी घासायचं काम करू लागले. अजून पैसे मिळावे म्हणून ते रात्री एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करू लागले तिथे वडा, इडली आणि डोसा ते बनवत असे. यामुळे प्रेम गणपती आणि धाब्याचा मालक दोघेही खुश होते. १९९२ साली बरेच पैसे जमल्यावर प्रेम गणपती यांनी भाडोत्री एक दुकान घेतलं आणि तिथे त्यांनी आपलं छोटेखानी हॉटेल सुरु केलं. 

नंतर एक हातगाडी बनवून घेऊन प्रेमी गणपती वाशी रेल्वे स्टेशनवर डोसा विक्री करून लागले. प्रेम गणपती यांच्या हातच्या डोस्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात आणि तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची चर्चा वाढू लागली.

१९९७ साली पुन्हा एकदा प्रेम गणपतीने अजून एक दुकान विकत घेतलं आणि तिथे दोन लोकांना हाताखाली घेऊन रेस्टोरंट सुरु केलं. या रेस्टोरंटचं नाव होतं प्रेम सागर डोसा प्लाझा. इथं विद्यार्थ्यांसोबतची ओळख प्रेम गणपतीला भरपूर पुढे घेऊन गेली.

सोशल मीडियाचा वापर करून प्रेम गणपती विविध व्हरायटीचे डोसे बनवायला शिकले. लवकरच ते २० प्रकारचे डोसे विक्री करू लागले आणि लोकांची गर्दीही वाढू लागली. २००५ येता येता प्रेम गणपतीने डोसा प्रक्रियेवर इतकं प्रभुत्व मिळवलं कि १०५ डोसे त्याने लॉन्च केले. मुंबईत डोसा प्लाझा म्हणून प्रेम गणपतीची मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग होऊ लागली. गावाकडील लोकांना बोलवून त्यांनी एक एक करून आउटलेट्स सुरु केले.

हे आउटलेट्स भारतात प्रचंड वेगाने उभे राहिले. भारतातल्या वाढत्या मागणीमुळे याची चर्चा परदेशातही होऊ लागली आणि हळूहळू प्रेम गणपतीने परदेशातही आपला व्यवसाय वाढवला.

आज घडीला देशभरात डोसा मध्ये व्हरायटी म्हणून प्रेम सागरच्या डोसा प्लाझाच्या चर्चा असतात. डोसा प्लाझामध्ये १०५ प्रकारचे डोसा तयार केले जातात आणि तेही वेगवेगळ्या फ्युजनमध्ये. 

भारतात डोसा प्लाझाचे ५० पेक्षाही जास्त आउटलेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलँड, दुबईसहित आणखी दहा देशात डोसा प्लाझा फेमस आहे. प्रेम गणपती आज डोसा प्लाझाच्या माध्यमातून कोटींची उलाढाल करतात.

वाशीच्या रेल्वे स्टेशनवर सुरु झालेला डोसा प्लाझा आज जगात फेमस झाला आहे तेही प्रेम गणपती यांच्या आयडियामुळे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.