प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला डोसा किंग त्या एका घटनेमुळे बरबाद झाला

या जगात प्रसिद्धीसाठी लोकं जीवापाड मेहनत घेतात ( रील वैग्रे वाले सोडून द्या ), आपलं नाव करतात अगदी परदेशातही फेमस झालेले लोकं आपल्याकडे आहेत. आजचा किस्सा आहे भारताच्या डोसा किंगचा जो विदेशातही फेमस झाला खरा पण त्या एला घटनेमुळे त्याच्या सगळ्या प्रसिद्धीला कलंक लागला आणि त्याचा शेवट दुर्दैवी झाला.

१९७३ पासून या गोष्टीची सुरवात होते ती तामिळनाडूच्या तुटीकोरिन मधून. तुतीकोरिनच्या एका गावामध्ये एक शेतकरी कांद्याची शेती करायचा आणि त्याच्याच मुलगा होता पी राजगोपाल. शेती करण्याचा त्याचा प्लॅन नव्हता म्हणून तो चेन्नईत आला. चेन्नईमध्ये केके नगरात त्याने किराणा दुकान थाटलं आणि ते तब्बल ८ वर्ष चालवलं. सगळं व्यवस्थित चालू होतं.

एके दिवशी एक ज्योतिषी फिरत फिरत त्याच्या दुकानावर आला आणि त्याने राजगोपालला सांगितलं की तू किराणा दुकान बंद करून त्याऐवजी रेस्टॉरंट सुरू कर तुला भरपूर फायदा होईल. राजगोपालने ज्योतिषाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने रेस्टॉरंट सुरू केलं आणि त्या रेस्टॉरंटला नाव दिलं सर्वना भवन.

हा तो काळ होता जेव्हा भारतीय लोकं बाहेर जाऊन खायला भाव देत नसायचे तरीही पी राजगोपालने डेरिंग करून हा व्यवसाय सुरू केला होता. डोसा, इडली, वडा, पुरी विकायला त्यानं सुरुवात केली. चांगल्या पध्दतीने विक्री करण्याचं त्याचं ध्येय होतं.

गुणवत्ता आणि खप यामुळे तरी ग्राहक वाढतील म्हणून त्याने सगळ्या पदार्थांची किंमत १ रुपया केली. कामगारांना चांगला पगार दिला आणि पहिल्या काही दिवसातच त्याचा १० हजाराचा तोटा झाला. पण तरीही त्याने नेटाने आपलं काम चालू ठेवलं.

पण काही दिवसांनी त्याच्याकडे ग्राहक वाढू लागले. राजगोपालच्या रेस्टॉरंटला लोकं प्रथम पसंती देऊ लागले. हळूहळू नफा होऊ लागला आणि सर्वना भवन फेमस होऊ लागलं. राजगोपालने आपल्या दुकानात ज्योतिषाचाही फोटो लावला. सर्वना भवन इतकं फेमस झालं की लोकांना राजगोपालचं मूळ नाव जाऊन डोसा किंग नाव लक्षात राहू लागलं. सफेद पॅन्ट शर्ट आणि कपाळावर चंदनाचा टीका ही त्याची ओळख भरपूर फेमस झाली.

२० वर्षाच्या आतच विदेशातही डोसा किंगने शाखा सुरू केल्या. सौदी अरब,थायलँड, ओमान, कतार, आफ्रिका, फ्रांस, जर्मनी आणि अनेक देशमध्ये डोसा किंग प्रसिद्ध झाला. या काळात राजगोपालने दोन लग्न केले पण एकही टिकू शकलं नाही. ज्योतिषाने त्याला तिसरं लग्न कर म्हणून सांगितलं.

याच काळात राजगोपालच्या कंपनीत एक असिस्टंट मॅनेजरच्या मुलीने उधार काही पैसे मागितले. या मुलीने संत कुमार नावाच्या मुलाशी लव्ह मॅरेज केलेलं होतं. राजगोपालला ती मुलगी आवडली आणि तो तिला फोन करणे, भेटवस्तू पाठवणे असे प्रकार करू लागला.

राजगोपालला त्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्या मुलीने पोलिसात तक्रार केली पण काहीच फरक पडला नाही. शेवटी राजगोपालने त्या मुलीच्या नवऱ्याला संत कुमारला धमकी दिली पण ते ऐकत नाही म्हणल्यावर राजगोपालने संत कुमारच अपहरण केलं. काही काळानंतर संत कुमार त्यांच्या तावडीतून सुटला आणि पोलिसांनी तक्रार घेतली पण काही दिवसांनी पुन्हा संत कुमारच अपहरण झालं आणि थेट प्रेत सापडलं.

त्या मुलीने सगळा दोष राजगोपालला दिला आणि कोर्टात अपील केली.

पुढे पोलिसांनी राजगोपालला अटक केली. राजगोपालने सगळं प्रकरण कबूल केलं. राजगोपालला ५५ लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा मिळाली. यातले ५० लाख त्या मुलीला देण्यात आले. नंतर राजगोपाल गंभीर आजारी पडला आणि पुढे तो दवाखान्यात भरती झाला. या घटनेतल्या इतर आरोपींना १०-१० वर्षांची शिक्षा झाली आणि राजगोपालला जन्मठेप.

विदेशातही प्रसिद्ध असलेला पी. राजगोपाल उर्फ डोसा किंग वासनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारे बरबाद झाला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.