कोका कोलाला देशाबाहेर घालवून जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकारी कोला आणला होता.

तर भिडूनो गोष्ट आहे १९७७ ची. हा या गोष्टीत साल महत्वाचं आहे. कारण तुम्हाला पुढे कळेलच.

तर झालं असं होतं की त्यावर्षी इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी मागे घेतली होती. तेव्हा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले तर होतेच पण स्वतः इंदिराजी सुद्धा रायबरेली येथून पडल्या होत्या.

हा जयप्रकाश नारायण यांनी छेडलेल्या आंदोलनाचा विजय होता.

त्यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या जनता पक्षात भारतातले अनेक विरोधी पक्ष सामील झाले होते. यात संघाच्या वाजपेयींपासून ते समाजवादी विचारसरणीच्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या पर्यंत अनेक नेत्यांचा समावेश होता.

या सगळ्याच नेतृत्व करत होते मोरारजी देसाई. ते भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले.

गंमत म्हणजे मोरारजी हे आयुष्यभर काँग्रेस मध्ये होते. गांधीवादी विचारसरणीचे ते पाईक होते.

यालाच अनुसरून त्यांनी पंतप्रधान बनल्यावर भारतात स्वदेशी चळवळीच पुनरुज्जीवन करायचं ठरवलं.

त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस.

त्यांची ओळख बंदसम्राट अशी होती. फर्नांडिस यांच्या एका हाकेवर मुंबईचे कामगार अख्ख शहर बंद करतील एवढी त्यांची ताकद होती.

या जॉर्ज फर्नांडिस यांनी त्याकाळी मल्टिनॅशनल कंपन्यांच्यासाठी एक पॉलिसी आणली,

जर भारतात उद्योग चालवायचा असेल तर ६०% शेअर्स भारतीय पार्टनरला द्यायचे व तुमचे प्रॉडक्ट्स कसे बनवता याची टेक्नॉलॉजीसुद्धा हस्तांतरित करायची.

भारतात उद्योग काहीजणांनी हा नियम मान्य केला मात्र आयबीएम आणि कोकाकोला याला तयार झाले नाहीत.

कोका कोलाच म्हणणं होतं की त्यांची कोल्ड्रिंकची एक सिक्रेट रेसिपी आहे आणि ती कोणाशीही शेअर करू शकत नाहीत.

जॉर्ज फर्नांडिस यांनी कोका कोलाला गाशा गुंडाळायला लावला. अमेरिकी भांडवलवादाच प्रतीक मानली जाणारी कोका कोला भारतातून हद्दपार झाली.डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. पण खरी अडचण पुढे होती.

कोका कोला गेला पण जाताना भारतीयांना कोल्ड्रिंकची चटक लावून गेला.

स्वातंत्र्योत्तर जन्मलेल्या तरुण पिढीला कोक पिणे हे फॅशनेबल वाटायचं. फिल्मस्टार्स करीत असलेली जाहिरात बघून आपल्यालाही कोक पिताना हिरो झाल्यासारख वाटायचं.

शिवाय आपला देश उष्णकटिबंधात येत असल्यामुळे थंडावा निर्माण करणाऱ्या कोल्ड्रिंकचा खप सुद्धा मोठा होता.कोका कोलाची जागा भरून काढावी लागणार होती.

तेव्हा जनता सरकारने ठरवलं आपण सरकारी कोला बनवायचा.

मोरारजी देसाई यांनी सेंट्रल फूड अँड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हैसूर या संस्थेला कोल्ड्रिंक बनवण्यासाठी रेसिपी फॉर्म्युला बनवण्याचे आदेश दिले. त्यांनी ते बनवले देखील.

पुण्याच्या मॉडर्न बेकरीशी करार करून हे कोल्ड्रिंक बनवण्यास सुरवात देखील केली. पण मुख्य प्रश्न नावाचा होता. या कोल्ड्रिंकला नाव काय द्यायचे यावरून स्पर्धा घेतली गेली.

जनता पक्षाचेच खासदार हरी विष्णू कामत यांनी ही स्पर्धा जिंकली व १० हजार रुपयांच बक्षीस पटकावलं. त्यांनी सुचवलेल नाव होतं,

Double 77 म्हणजेच ७७ !

इंदिरा गांधींच्या हुकूमशाही राजवटीच्या पराभवाच प्रतीक असलेलं वर्ष १९७७ वरून सरकारी कोल्ड्रिंकला हे नाव देण्यात आलं. डबल सेव्हन ची आक्रमक पणे जाहिरात केली गेली. यांची टॅग लाईन होती,

For The Good Times!”आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर अच्छे दिन.

पण डबल सेव्हनला कधी अच्छे दिन बघताच आले नाहीत. कोका कोला पेक्षा भारी म्हणून बाजारात आलेल्या या सरकारी कोलाला पब्लिकने नाकारले. या ऐवजी स्वदेशीच असलेल्या थम्स अप, कॅम्पा कोला यांनी कोकच मार्केट काबीज केलं.

अशातच १९८० साली भारतीय जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या जनता सरकारचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. इंदिरा गांधींना लोकांनी धडाक्यात निवडून आणले.

पण सत्तेत परतलेल्या इंदिरा गांधींनी आपल्या पराजयाची आठवण करून देणाऱ्या व आधीच तोट्यात चालत असलेल्या डबल सेव्हनला बंद करून टाकले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.