डॉ. कलाम आले अन् वैतागवाडीचा वैताग कायमचा गेला….

गोष्ट आहे 15 ऑक्टोंबर 2005 मधील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस होता. मात्र कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये न पडता ते रमले होते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडीमध्ये. हा सगळा आदिवासी पाडा. त्यावेळी इन-मिन 350 लोकवस्तीच गावं. महादेव कोळी समाजाचे बहुसंख्य लोक. भारतीय अॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन (BAIF) च्या उपक्रमाअंतर्गत एका कार्यक्रमासाठी ते आले होते.
गावच्या उजाड माळरानावर आदिवासी महिलांनी फुलवलेल्या आंब्याच्या बागेच कौतुक करण्यासाठीची ही भेट होती.
राष्ट्रपतींचा ‘दाैरा’ होणार म्हणून सरकारी व्यवस्थेच्या याेजना या गावाकडे वळाल्या. सगळे रस्ते चकाचक झाले. गावाला सणाचं रुप आलं. प्रत्येक घरापुढे सडा‐रांगाेळी काढण्यात आली. कलाम चाचांना गुलाबाचे फुल देण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी आणि त्यांना बघण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून लाेक वैतागवाडीला पाेहोचले.
गावात पक्के रस्ते नव्हते. पिण्याचे पाण्याचा आभाव. पाण्यासाठी गावातील महिलांना सायकलवर भांडी आणि हौद घेवून जावं लागत होतं. पावसाच्या दिवसांमध्ये केवळ शेती. इतर काळात दुसरीकडं कुठेतरी जावून दिवस ढकालयचं. इतकचं काय तर गावात प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या अगदी मुलभूत आरोग्य सुविधांची देखील वाणवा, अशी इथली परिस्थिती होती.
वैतागवाडीचे लोक मूळचे धोंगडेवाडीचे.
तेथील लोक नेहमी आजारी पडत असतं. म्हणून या आजारांना वैतागून त्यांनी धोंगडेवाडीपासून एक किलाेमीटरवर एक वस्ती वसवली. वैतागुन असल्यामुळं तिला ‘वैतागवाडी’ असे नाव दिलं होतं. ‘बायफ’ अर्थात भारतीय अॅग्राे-इंडस्ट्रीज फाऊंडेशनचं गावात आगमन झालं आणि गावाच्या माळरानाचा अक्षरश: कायापालट झाला. पण गावचा विकास मुळ प्रश्न अद्याप बाकी होता.
यावेळी डॉ. कलामांनी तिथं उभ्या असलेल्या गावातील महिलांशी गटाशी संवाद साधला. यावेळी त्यांना गावचं ‘वैतागवाडी’ नाव असल्याचे सांगितले. ‘त्यांनी तिथं उभ्या असलेल्या मा. खा वसंत पवारांना प्रश्न केला.
‘What is Meaning of Vaitagwadi’
पवार उत्तरले. ‘A Trouble or irritating Village’.
यावेळी खरतर गावचं नाव कलामवाडी’ किंवा ‘डॉ.अब्दुल कलाम नगर’ असं ठेवण्याची इच्छा गावकऱ्यांनी बोलून दाखविली होती. पण, त्याला त्यांनी प्रामाणिकपणे नाकार दिला. ते म्हणाले,
एखाद्या व्यक्तीचे नाव देऊ नका. राष्ट्राच्या आयुष्यापुढं व्यक्तीचं आयुष्य किती असतं? व्यक्तिपेक्षा राष्ट्र मोठं आहे.
त्यांनी दोन नाव सुचवली,
A Place of good people अर्थात सज्जनवाडी आणि Ray of Hopes अर्थात आशाकिरणवाडी. कारण या गावात अाशेचा किरण मला दिसताेय, महिलांनाही हे नाव आवडले. आणि डॉ. कलामांनी त्याक्षणी आपल्या भाषणात या गावचे नाव बदलत असल्याची घोषणा केली न्
वैतागवाडीची ‘आशाकिरणवाडी’ झाली.
कलाम नुसते पाेहाेचलेच नाहीत, तर ते वस्तीच्या नावातील ‘वैताग’ दूर करत तेथे आशेचा किरण घेऊन गेले. यानंतर गावाने विकासाची वाट धरली. त्यांनी नुसतं नावच बदललं नाही तर ग्रामस्थांना स्वावलंबी होण्याचं आणि आपलं नशिब बदलण्यासाठी परिश्रम घेण्याचा कानमंत्र दिला. गावात काजू आणि आंब्याची राेपे लावून त्यांनी आधुनिक शेती करण्याचा संदेशही दिला.
डॉ. कलामांच्या दौऱ्यानंतर केंद्र सरकारच्या ‘भारत निर्माण योजने’अंतर्गत गावात 10 हजार लिटरची पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. तिचा लाभ आजूबाजूच्या पाच गावांना देखील झाला. दारणा नदीतुन पाणी आणण्यात आलं. गावाला लागणारा 50% भाजीपाला आता गावातच पिकतो. आज या गावात प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पिण्याचं पाणी येत आहे.
इगतपुरी तालुक्यात दुष्काळ पडला तरी आशाकिरणवाडीत दुष्काळ पडत नाही.
पक्के रस्ते झाले. 1 हजार 200 एकरसाठी वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना आता दृष्टीपथात आहे. आजुबाजूच्या गावांना मिळून एक सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहिलं आहे.
- भिडू ऋषिकेश नळगुणे
हे ही वाच भिडू.
- डॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.
- अपयशामध्ये डॉ. अब्दुल कलामांनी जे केलं ते डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या प्रत्येक तरुणाने वाचायला हवं.
- अब्दुल कलामांमुळे तो ड्रायव्हर पुढे जावून इतिहासाचा प्राध्यापक बनला..