डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणाले, ” मी मक्केला जरूर येणार पण एकच अट आहे.. “
भारत एक खंडप्राय देश आहे. विविधता हि इथली ओळख आहे. कोट्यवधी लोकसंख्या आणि त्यांची कोट्यवधी मते. देशात प्रत्येकाने आपला आदर्श आपले वंदनीय आदरस्थान निश्चित केले आहे. पण तिहासात अशी मोजकी व्यक्तिमत्व होऊन गेली जी जात धर्म पंथ प्रदेश भाषा विचार याच्या सीमा रेषा ओलांडून पलीकडे जाऊन जनतेच्या प्रत्येक घटकासाठी वंदनीय ठरली.
या पैकीच एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
अब्दुल कलाम जन्मले रामेश्वर इथल्या एका गरीब मुस्लिम कुटूंबात. मात्र त्यांची जडणघडण होताना कधीही जातीधर्माचा स्पर्श झाला नाही. त्यांचे वडील व रामेश्वर मंदिराचे प्रमुख पुजारी चांगले मित्र होते. त्यांच्यात होणाऱ्या चर्चा रामेश्वरमधील अध्यात्मिक वातावरण याचा लहानग्या अब्दुल कलाम यांच्यावर चांगलाच परिणाम झाला.
हेच विचार अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर जपले. म्हणूनच भारताचे आघाडीचे वैज्ञानिक, मिसाईल मॅन पासून ते देशाच्या राष्ट्रपतीपद पर्यंत पोहचुनही आपली जबाबदारी सांभाळताना त्यांनी धार्मिकता कधी आड येऊ दिली नाही. त्यांच्यासाठी नेहमी राष्ट्र प्रथम हीच भावना राहिली.
असाच राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या देशप्रेमाचा किस्सा माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एकेठिकाणी सांगितलं आहे.
शिवराज पाटील यांचा आणि अब्दुल कलाम यांचा संबंध खूप जुना होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना डॉ. सतीश धवन हे अवकाश आयोगाचे अध्यक्ष होते आणि डॉ. कलाम हे वैज्ञानिक होते. त्यावेळी शिवराज पाटलांकडे अंतराळ विज्ञान खात्याचे राज्यमंत्रिपद होते. एसएलव्ही ३ यानाचे उड्डाण पहिल्यांदा अयशस्वी झाले, त्यावेळी ते राजीनामा देण्यास निघाले होते. इंदिराजीनी त्यांना परवानगी दिली नाही आणि त्यापुढे ते काम करीतच राहिले आणि यशाची शिखरे सर करीत राहिले.
कलाम यांच्या त्या अयशस्वी मोहिमेपासून ते त्यांच्या राष्ट्रपती पदापर्यंतच्या कारकिर्दीचे शिवराज पाटील जवळचे साक्षीदार होते.
गोष्ट आहे २००६ सालची. डॉ.अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. सौदी अरेबियाचे तत्कालीन राजे किंग अब्दुल्ला भारत दौऱ्यावर येणार होते.
खरं सौदी अरेबिया म्हणजे अरबी देशांमधील सर्वात महत्वाचा देश. तेलाच्या खाणीने संपृक्त असलेल्या सौदीचे राजे फक्त आशियाच नाही तर थेट अमेरिकेपर्यंत आपलं वजन राखून आहेत. भारताशी सौदी अरेबियाचे नाते पूर्वीपासून मैत्रीचेच आहे. नेहरूंच्या काळात १९५५ साली तत्कालीन सौदी राजे भारत भेटीला आले होते. मात्र त्यानंतर पुढच्या ५० वर्षात एकदाही सौदचे राष्ट्रप्रमुख भारतात आले नाहीत.
किंग अब्दुल्ला यांनी मात्र राज्यभर स्वीकारल्यावर भारताची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
याचे कारणच मुळात राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हे होते. राजकारणाशी थेट संबंध नसताना अल्पसंख्यांक समाजातून आलेले हे दोघेही आपल्या विद्वात्तेच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहचले होते याबद्दल संपूर्ण जगभरात त्यांच्याविषयी आदर होता.
किंग अब्दुल्ला यांचे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी दिल्लीला आगमन झाले. तो ऐतिहासिक दिवस होता. पहिल्याच भेटीत त्यांचे अब्दुल कलामांशी सूर जुळले. दुसऱ्या दिवशी राजपथावरील संचालनासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले.
शिवराज पाटील सांगतात,
सौदी अरेबियाचे राजे भारत भेटीला आले असताना राष्ट्रपती भवनात शाही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवराज पाटील गृहमंत्री म्हणून राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. अशाच गप्पा सुरु असताना सौदीच्या राजांनी डॉ. कलामांना सौदीला या, तुम्हाला मक्का-मदिनालाही जाता येईल, आम्ही तुमचे स्वागत करू, असे निमंत्रण दिले.
त्यावेळी डॉ. कलाम यांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले,
मी मक्का मदिनाच्या दर्शनासाठी सौदीला नक्की येणार आहे; परंतु माझा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर माझ्या स्वत:च्या पैशाने येणार आहे.
सौदीच्या राजांना देखील त्यांचे शब्द ऐकून त्यांचा अभिमान वाटला. शिवराज पाटील सांगतात,
‘एपीजे हे वैज्ञानिक होते. ते राजकीय व्यक्ती नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती म्हणून काम करीत असताना त्यांनी कुणालाही भेदाची वागणूक दिली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्यासोबत काम करतानाची ही आठवण मी कधीही विसरणार नाही, ती म्हणजे नीतीपाठ आहे.”
हे हि वाच भिडू.
- अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते
- फिल्डमार्शल माणेकशॉ कलामांना म्हणाले, राष्ट्रपतीजी माझी एक तक्रार आहे
- कलामांच्या या फोटो मागची स्टोरी वाचून अख्ख्या भारताची कॉलर ताठ होईल.