दाभाडे संस्थानाच्या या दवाखान्याचा लौकिक जगभर होता…
कोरोनाकाळात तळेगावच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचं नाव अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये झळकलं. या दवाखान्यात कोरोनाच्या परिस्थितीत अतिशय उत्तम सेवा पुरवल्या गेल्या होत्या.
आज एवढ्या भरभराटीस आलेल्या रुग्णालयासाठी ज्या माणसाने प्रचंड मेहनत घेतली त्याचा परिचय फार तोड्या लोकांना आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर येथे दवाखाना सुरु करून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम येथील एका माणसानं सुरु केलं होतं.
त्यांच्या कामाची कीर्ती देशभर पसरली होती. म्हणून महात्मा गांधीजी या दवाखान्याला भेट द्यायला स्वतःहुन आले होते.
डॉ. दि. स. सरदेसाई हे त्यांचं नाव.
त्यांना डॉ. भाऊसाहेब सरदेसाई याच नावानं पुण्यात ओळखलं जात असे. पुणे-मुंबई रस्त्यावर तळेगाव दाभाडे हे गाव लागतं. येथे दाभाड्यांचा जुना वाडादेखील आहे. याच गावात डॉ. दि. स. सरदेसाई यांनी आपला दवाखाना सुरु केला.
ते स्वतः एक कुशल नेत्ररोगतज्ञ होते. लंडनमध्ये त्यांनी आपलं उच्च महाविद्यालयीन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तिकडे काही काळ त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या.
हा १९३० चा काळ होता. जगभरात डॉक्टरी पेशाच्या लोकांना मोठी मागणी होती. परदेशांत त्यासाठी अनेक संधी उपलब्ध होत्या. त्यातही डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे फार कमी लोक होते.
असे असतानाही डॉ. दि. स. सरदेसाई यांनी आपली सेवा गोरगरीब ग्रामीण जनतेला पुरवण्याचा वास घेतला. शिक्षण व अनुभव घेऊन ते भारतात परत आले. थोड्याच काळात एक उत्तम डोळ्यांचा डॉक्टर म्हणूंन त्यांचं नाव भारतभर गाजलं.
आपल्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा लोकांना व्हावा म्हणून ते महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये फिरत व आपली सेवा देत.
या प्रवासात त्यांना तळेगाव हे मध्यवर्ती ठिकाण होतं. पुण्यामुबंईला येता जात लागणारे हे ठिकाण त्यांना कामाच्या दृष्टीने सोयीचे होते म्हणून त्यांनी येथेच दवाखाना उभारून सेवा देण्याचे नक्की केले.
त्यांचे मोठे बंधू म्हणजे ‘रियासतकार’ ह्या नावाने उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले महान इतिहासकार,’पद्मभूषण’, गोविंद सखाराम सरदेसाई हे थोर व्यासंगी इतिहासकार होते. त्यांचाही बंगला तळेगाव येथेच होता.
त्यामुळे त्यावेळी अवघ्या दोन खोल्यांमध्ये त्यांनी आपलं हॉस्पिटल सुरु केलं.
या छोटेखानी हॉस्पिटल ची ख्याती तळेगावच्या ग्रामीण भागामध्ये लवकरच पसरली. त्यामुळे थोड्याच काळात हे रुग्णालय रुग्णांच्या गर्दीमुळे कमी पडू लागले. महाराष्ट्रामध्ये त्याकाळी डोळ्यांच्या रोगासाठी कोणताच चांगला तज्ञ उपलब्ध नव्हता.
त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून लोक सरदेसाई यांच्या दवाखान्यांमध्ये गर्दी करू लागले. त्यामुळे त्यांना दुसरी जागा शोधावी लागली. तळेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळच पंचवीस एकर जमीन त्यांना दवाखान्यासाठी मिळाली.
ही जमीन त्यांना तळेगावचे संस्थानिक दाभाडे राजे यांच्याकडून 99 वर्षाच्या कराराने अतिशय कमी किमतीत मिळाली होती.
सरदेसाई यांनी आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यामध्ये अनेक रुग्णालयांचा अभ्यास केला होता. या अभ्यासाच्या अनुसार त्यांनी तळेगाव मध्ये असेच एक रुग्णालय उभे केले. दवाखाना उभारण्यासाठी त्यांनी वापरलेल्या कल्पना फारच लक्षणीय होत्या.
तळेगाव मध्ये उभारलेले हे रुग्णालय फक्त दवाखाना म्हणून राहिले नाही तर तिथे सर्व प्रकारची कामे सुरु झाली. या रुग्णालयात मोठे पक्के रस्ते उभारले गेले. बागा बनवण्यात आल्या. झाडांभोवती विटांचे पार तसेच रुग्णांसाठी बसण्यासाठी जागा, नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, पाण्याच्या टाक्या व स्वच्छ पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आले.
आधी ओसाड असणाऱ्या या जागेवरती एक नवीन छोटेसे शहर सुरु झाल्याचा अनुभव तळेगाववासियांना या काळामध्ये आला.
दर सोमवारी स्वतः डॉक्टर सरदेसाई आणि इतर नामांकित डॉक्टर या दवाखान्यांमध्ये येऊन आपली सेवा देत. मोतीबिंदू साठी या रुग्णालयाची मोठी ख्याती होती. तसेच आणि इतर आजारही करण्यासाठी येथील डॉक्टर प्रसिद्ध होते.
येथे विविध खेळ खेळण्यासाठी 1955 मध्ये एक मोठा हॉल बनवण्यात आला होता. येथे गाण्याचे, जादूचे तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जायचे. तसेच वेगवेगळ्या देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट आणि डॉक्युमेंटरी येथे दाखवल्या जात.
त्या काळामध्ये महाराष्ट्रात तर सोडाच पण भारतातही एवढं मोठं रुग्णालय कुठेच उपलब्ध नव्हतं. इतके कार्य करूनही सरदेसाई हे नेहमी नम्र राहिले.
त्यांच्या कार्याचा गौरव देशभर झाला. त्यामुळे महात्मा गांधीजींनी या रुग्णालयाला स्वतंत्र भेट दिली होती. येथील आवार आणि सुंदर परिसर पाहून त्यांनी सरदेसाई यांचे कौतुक केले होते.

या रुग्णालयाला त्यानंतर अनेक मान्यवर लोकांनी भेटी दिल्या आहेत. यामध्ये आचार्य अत्रे, बा. भ. बोरकर, गो. नी. दांडेकर आणि कवी भा. रा. तांबे यांचाही समावेश होतो.
मात्र या रुग्णालयासाठी सरकारने कोणताही पुढाकार घेतला नाही अशी खंत जाणकार नोंदवतात. डॉ. सुधीर फाटे यांनी यासंबंधी सविस्तर लेखन केलं आहे.
डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्याद्वारे आजही हे काम केले जाते.
डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय अनेक शिबिरे आयोजित करते. या शिबिराद्वारे उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया यासाठी विशेष सवलत उपलब्ध करून दिल्या जातात. परिसरात या रुग्णालयाचा मोठा लौकिक आहे.
14 ऑक्टोबर 1973 साली वयाच्या नव्वदाव्या वर्षी डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई हे निवर्तले.
या जागी अमेरिकेतील ‘मायो रुग्णालया’ सारखं एक मोठे केंद्र व्हावं ही त्यांची इच्छा होती.
ते स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.
हे हि वाच भिडू:
- जगभरात एका शस्त्रक्रियेला या मराठी डॉक्टरच्या नावाने ओळखलं जातं.
- भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मात्याला आत्महत्या करावी लागली होती.
- बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.