माय नेम इज “गोविंदाप्पा वेन्कटास्वामी उर्फ डॉ. व्ही.”
गुगलनं आज डॉ. व्ही अर्थात गोविंदाआप्पा वेन्कटास्वामींच डुडलं तयार केलं आहे. डुडलची चांगली गोष्ट म्हणजे आपल्या “नजरेत” आपलीच माणसं नव्यानं येतात. आत्ता इतकं मोठ्ठ नाव आणि त्याला ऊर्फ असणारं तितकचं छोटं नाव वाचून अनेकांनी डोळ्याच्या वरच्या भूवया उंचावल्या.
तर या नजरेच्या अर्थात भूवयांच्या खाली असणाऱ्या डोळ्यांच्या संबधातून भारतातलं सर्वात अभिमानाने घेतलं जाणारं नाव म्हणजे डॉ. ‘व्ही’ उर्फ गोविंदाप्पा वेन्कटास्वामी.
हे नाव भारतात जागतिक दर्जाच्या नेत्र शल्य चिकित्सेची सुरुवात करणारं व्यक्तिमत्व म्हणून फक्त देशातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यांची आज शंभरावी जयंती. नेत्र शल्य चिकित्सेसंदर्भात त्यांनी जे आभाळाएवढं काम उभारून ठेवलंय, त्यालाच सलाम करण्यासाठी गुगलने आपलं आजचं डूडल त्यांना समर्पित केलंय.
डॉ. ‘व्ही’ यांनी देशातील गोरगरिबांना नाहक आपली दृष्टी गमवावी लागू नये, यासाठी त्यांना परवडेल अशा किमतीत नेत्र उपचार उपलब्ध करून देण्यासाठी १९७६ साली ‘अरविंद आय हॉस्पिटल’ची सुरुवात केली होती. आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल पण हेच ‘अरविंद हॉस्पिटल’ आज नेत्र शल्य चिकित्सेसंदर्भातील देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं हॉस्पिटल समजलं जातं.
हॉस्पीटल सुरु करण्यासाठी जेव्हा बँका लोन दयायला तयार नव्हत्या, त्यावेळी वेन्कटास्वामी यांनी आपलं राहत घर तारण ठेवलं होतं. घरातील महिला सदस्यांनी त्यांच्या अंगावरचे दागिने विकून हॉस्पिटल सुरु करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव केली होती. आज मात्र या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय.
‘अरविंद आय हॉस्पिटल’च्या माध्यमातून प्रतिवर्षी जवळपास २ लाखांपेखा अधिक रुग्णांच्या डोळ्याचं ऑपरेशन करून त्यांना कायमचं दृष्टिहीन होण्यापासून वाचवलं जातं.
विशेष म्हणजे यापैकी बहुतेक रुग्णांवर अतिशय कमी शुल्कात किंवा अनेकांवर तर हे उपचार मोफत केले जातात.डॉ. गोविंदाप्पा वेन्कटास्वामी यांनी विकसित केलेल्या उपकरणाच्या आधारे हे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांची कार्यकुशलता इतकी विकसित झाली आहे की या मॉडेलमुळे सर्वात कुशल डॉक्टर एका दिवसात मोतीबिंदूचे १०० ऑपरेशन करू शकतात.
त्याचाच परिपाक असा की त्यांनी सुरु केलेल्या नेत्र शल्य चिकित्सेचं हे मॉडेल आज जगभरातील अनेक विकसित आणि विकसनशील देशांनी स्वीकारलंय. हॉर्वर्ड विद्यापीठाने तर आपल्या व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या मॉडेलचा समावेश केलाय.
अरविंद हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय स्वस्तात ही सेवा दिली जात असताना उपचारसेवेच्या गुणवत्तेशी कुठलीही तडजोड केली जात नाही. हॉस्पिटलमध्ये आलेला कुठलाही पेशंट केवळ उपचाराचे पैसे खिशात नाहीत, म्हणून परत जाता कामा नये. त्याला उच्च गुणवत्तेचे उपचार देणं हीच मानवसेवा. हे तत्व समोर ठेऊन ‘अरविंद हॉस्पिटल’च्या माध्यमातून काम केलं जातं.
१ ऑक्टोबर १९१८ रोजी तामिळनाडूतील एका छोट्याशा गावात अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोविंदाप्पा वेन्कटास्वामी यांनी अनेक खडतर अडचणींचा सामना करत चेन्नईतील स्टेनले कॉलेजमधून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. खरं तर त्यांना खेड्यापाड्यातील महिलांना प्रसूतीच्या अडचणींचा जो सामना करावा लागतो, तो दूर करण्यासाठी प्रसूतीतज्ञ व्हायचं होतं. पण संधेवाताच्या दुखण्यात बोटांचं अपंगत्व आलं आणि त्यांना प्रसुतीशास्त्राचा अभ्यास सोडून द्यावा लागला.
हे ही वाचा –
- त्यावेळी परदेशी साहेब जर जिल्हाधिकारी नसते तर, किल्लारी 52 गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नाश झाला असता.
- हा आहे, भारतातील सर्वात महागडा “मतदार”.
- ज्या मराठवाड्यातल्या पोराचं कौतुक इंग्लडच्या युवराजानं केलेलं, त्याचा आज मात्र रावण झालाय !
जवळपास २ वर्षे बिछान्यावर घालवल्यानंतर देखील त्यांनी हार मानली नाही आणि त्यानंतर नेत्र शल्य चिकित्सेचं शिक्षण घेतलं. त्यांच्या कामाचा झपाटा असा होता की आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोतीबिंदूची १ लाखांपेक्षा अधिक ऑपरेशन केली. शासकीय नोकरीतील निवृत्तीनंतर १९७६ साली त्यांनी ‘अरविंद आय हॉस्पिटल’ची सुरुवात केली. निस्वार्थ सेवाभाव हेच या हॉस्पिटलचं सूत्र होतं.
डॉ. ‘व्ही’ उर्फ गोविंदाप्पा वेन्कटास्वामी यांच्या या कामाची फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हेलन केलर आंतरराष्ट्रीय सन्मान, ‘सर्वांसाठी आरोग्य’साठी जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार यांशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
भारत सरकारने देखील त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. ७ जुलै २००६ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी मदुराई येथे त्यांचं निधन झालं.