हरगोविंद खुराना : झाडाखालच्या शिक्षणापासून ते नोबेलपर्यन्त मजल मारणारे जेनेटिक इंजिनियर

आदिम काळापासून मानवाचा सर्वात मोठा ध्यास असेल तर तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा. मात्र एका अर्थाने माणूस अमर आहे. केवळ माणूसच नाही तर सर्व सजीव अमर आहेत. त्यांच्या जीन्सच्या रूपाने.

अब्जावधी वर्षाच्या काळापासून गुणसूत्रांचा अव्याहत प्रवास सुरू आहे..

भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की,

मनुष्य देह हा केवळ निमित्तमात्र आहे, आत्मा अमर आहे. आत्मा कुठे आहे माहीत नाही.. पण आपण हे म्हणू शकतो की गुणसूत्रे अमर आहेत आणि ते अमर राहायला सजीव देह धारण करतात, एका अर्थाने आपल्याला कामाला लावतात मात्र आता विज्ञानाने या गुणसूत्रांचे अंतरंग ओळखून घेऊन त्यांना कामाला लावायचे ठरवले आहे.

मानवाला त्रास देणाऱ्या कॅन्सर, अल्झायमर, पार्किन्सन सारख्या आजारावर “जीन्स थेरपीचा” वापर करता येईल का यावर संशोधन सुरू आहे. अनेक आनुवंशिक रोगांचा बीमोड देखील जेनेटिक इंजिनीअरिंग मधून शक्य होईल.

जेनेटिक इंजीनियरिंग मधील भारतीय वंशाचे सर्वात मोठे नाव म्हणजे हरगोविंद खुराना..

नोबेल पुरस्कार यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा भारतातील काही मोजकीच नावे आपल्याला आठवतात. मोजकीच आठवतात कारण मोजक्याच लोकांना तो भेटला आहे. त्यामुळेच भारतीय नागरिक नसलेले, मात्र भारतीय वंशाचे असलेले नोबेल पुरस्कारार्थी देखील आपल्याला आपलेच वाटतात. हरगोविंद खुराना हे त्यापैकी एक.

आजपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे त्यानिमित्ताने त्यांना या लेखातून मानवंदना.

हरगोविंद खुराना यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ मध्ये रायपूर नावाच्या छोट्याशा गावात झाला असे मानले जाते. (जन्मतारीखचा घोळ इथे पण आहे.) हे रायपूर भारतातले नाही. पाकिस्तानमधील मुलतान भागामध्ये आहे.

म्हणजे हे आमचेच असा पाकिस्तानचा देखील क्लेम होऊ शकेल. गणपतराय आणि कृष्णादेवी खुराना (इंग्रजी स्पेलिंग खोराना असे का करतात काय माहित.. मला नाही आवडले खो घालायला) यांच्या पाच पोरातील शेंडेफळ म्हणजे हॅरी. वडील गावात तलाठी होते. विशेष म्हणजे तलाठी असून देखील गरीब होते.

(तो जोक आठवला…तलाठ्याचे पॉश घर बघून तहसीलदाराची बायको त्याला विचारते तुम्ही कधी तलाठी बनणार)

घरामधील सर्व भावंडात कामांची वाटणी झालेली हॅरीच्या गळ्यामध्ये सरपण आणायचे काम. जेमतेम १०० लोकसंख्या असलेल्या या गावात हॅरीचे घरच एकमेव साक्षर. गावात कुणाला पत्र आले, कुणाला पाठवायचे असेल तर ते काम पण हॅरीच्याच गळ्यात.

वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते, आणि स्वतच्या मुलांसोबत गावातील इतर मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गणपतराय यांना गावात खूप मान होता. त्यांनी एक शिक्षकी शाळा सुरू केली. शाळेला इमारत नाही. झाडाखाली वर्ग भरायचा. हॅरीने देखील याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले.

केवळ बारा वर्षाचा असताना गणपतराय यांचे निधन झाले. मोठा भाऊ नंदलालने घरची जबाबदारी उचलली. अभ्यासात हुशार असल्याने हॅरीने शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेताना स्कॉलरशिप मिळवली होती.

झाडाखाली प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या हॅरीने माध्यमिक शिक्षण मुल्तान येथील डी. ए. वी. माध्यमिक शाळेत पूर्ण केले. लाहोर येथील पंजाब विश्वविद्यालयामधून १९४३ साली बी. एस. सी.ची पदवी मिळवली तर लगेहात १९४५ साली एम. एस. सी देखील पूर्ण केली.

संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिप एके स्कॉलरशिप यावरच पूर्ण केले त्यामुळे घरच्यांना तसा हॅरीचा त्रास नव्हता. शाळेत शिक्षक चांगले मिळाले, त्यामुळे काय शिकायचे आणि का शिकायचे ते वेळीच समजत गेले. माध्यमिक शाळेत रतनलाल तर कॉलेज जीवनात महानसिंग असे गुरुजन हॅरीला मार्गदर्शन करत होते.

Msc च्या पुढे संशोधन करायची हॅरीची ईच्छा होती. त्यासाठी देखील हॅरीला स्कॉलरशिप मिळाली. १९४५ मध्येच भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात संशोधन करण्यासाठी हॅरी इंग्लंडमध्ये दाखल झाला.

लिवरपूल विश्वविद्यालयामध्ये रॉजर जे. एस. बियर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संशोधन केले. (सरांचे आडनाव लयच भारी) तीन वर्षे खूप मेहनत घेऊन, संशोधन करून हॅरीने १९४८ मध्ये Phd ही डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. पुढील एक वर्ष पोस्टडॉक्टरल संशोधन करण्यासाठी डॉ. खुराना स्वित्झर्लंडला गेले. झ्युरिक शहरात फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रा. व्ही. प्रेलॉग यांच्यासोबत संशोधन केले.

झ्युरिक मधला काळ हरगोविंद खुराना यांच्या जीवनातील सगळ्यात कठीण काळ असावा.

कोणतीही शिफारस पत्र न घेता हा माणूस डायरेक्ट प्रेलॉग सरांकडे येऊन धडकला. मात्र कामाची तळमळ बघून त्याला फेलो म्हणून ठेवून घेतले गेले. पण पैशाचं काय. कारण स्कॉलरशिपचे पैसे तर संपत आले होते. पुढचे अकरा महीने प्रयोगशाळेत राहून आणि केवळ दूधभात खाऊन डॉ. खुराना यांनी जबरदस्त संशोधन केले. प्रेलॉग ग्रेट संशोधक होते. त्यांनी खुराना यांना घडवले. प्रेलॉगशी त्याचे खूप चांगले संबंध आयुष्यभर राहिले.

ज्ञानाचे गाठोडे सोबत घेऊन आणि खिसे मोकळे घेऊन डॉ. खुराना भारतात परतले..

स्कॉलरशिपसाठी केलेल्या बॉण्डनुसार सरकारी नोकरी करणे सक्तीचे होते पण नुकतीच फाळणी झाली होती. सरकारकडे नोकरी मिळायची बोंब. शेवटी स्कॉलरशिपचे पैसे परत करण्याबाबत तोडगा निघाला. एवढे पैसे कमवायचे तर युरोपात जाणे भाग होते. एक निष्फळ वर्ष असेच  दिल्लीमध्ये निर्वासितांच्या छावणीमध्ये काढले. त्यांचे अनेक नातेवाईक तिथेच होते. ह्याचे थोडे, त्याचे थोडे पैसे उसने घेऊन जहाजाचे भाडे भरले आणि परत विलायत गाठली.

केंब्रिज विद्यापीठात संशोधन सुरू केले.

मानवी गुणसूत्रे आणि त्यात असलेल्या विविध आम्लाविषयी संशोधन करण्यात ते लॉर्ड टॉड यांना सहाय्य करत होते. दोन वर्ष तिथे इतके सुंदर काम केले की टॉडचे मन जिंकले, त्यातूनच एक सुवर्णसंधी संधी भेटली.. जे स्वप्न त्यांनी अनेक वर्ष पाहिले होते.

स्वतःची प्रयोगशाळा असण्याचे..

कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्राध्यापकी करण्याची संधी मिळाली.. संशोधन करायला पूर्ण स्वतंत्रता.. वेळच वेळ आणि जय्यत प्रयोगशाळा… लॉर्ड टॉडनेच भाऊसाठी शिफारस केली होती… भाई की तो निकल पडी

देवाच्या अस्तित्वाला डार्विनच्या उत्क्रांतिवादाने जेवढे आव्हान दिले तेवढेच मेंडेल नावाच्या पाद्र्याने देखील दिले आहे. वाटाण्याच्या वेलींचे प्रयोग करून त्याने आनुवंशिकता सिद्धांत सिद्ध केला. प्रत्येक सजीवाचे मूल त्याच्या माता-पिता सारखेच कसे काय होते, नाकाच्या जागी नाकच कसे येते, डोळ्याच्या ठिकाणी डोळे कसे येतात हे प्रश्न मानवाला आदिम काळापासून पडले होते. आणि नक्कीच इतकी परफेक्ट रचना करणारा कोणी रचनाकार असेल अशी त्याची समज झाली होती.

मात्र विज्ञानाच्या साह्याने अनेक कोडी सुटत चालली आहेत. आधी असा समज होता की व्यक्तीचे सर्व अवयव आईच्या पोटात असतानाच, स्त्री पुरुष बीजाचे मिलन झाल्यावर लगेच तयार झालेले असतात आणि वेळेनुसार त्यांची केवळ वाढ होत असते.

१८ व्या शतकात कास्पर वूल्फने सिद्ध केले की काही अवयव आधी अजिबात अस्तित्वात नसतात, मात्र वेळ आली की तयार होतात. म्हणजेच असे काहीतरी लपून बसलेले असते जे वेळ आली की प्रकट होते, हा खेळ असतो गुणसूत्रांचा.

1610126717276090 0

१९५० चे दशक गुणसूत्रांच्या संशोधनात खूप महत्त्वाचे आहे.

बीडल आणि टॅटम या दोघा शास्त्रज्ञांनी याच काळात शोधून काढले की मानवी शरीरातील जनुके प्रोटिन्स तयार करतात. बार्बन मॅक्लिंटॉक या अनुवंशवैज्ञानिकेने मक्यातील जनुके गुणसूत्रांवरील जागा बदलू शकतात हे सिद्ध केले होते.

तसेच याच काळात रोझलिंड फ्रँकलिनचे संशोधन पळवून वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स या तिघा शास्त्रज्ञांनी डीएनएच्या रचनांचे मॉडेल जगापुढे आणले होते.  डीएनएचा मुख्य घटक न्युक्लिक ॲसिड असते ज्यात केवळ चार मुळाक्षरांचा (बेसेस) समावेश असतो. एडिनिन, सायटोसिन, गुआनिन आणी थायमिन यांची A C G T अशी चार मुळाक्षरे..

यांचा क्रम कसा निर्धारित होतो? तसेच यांच्या साह्याने प्रोटिन्सच्या २० घटकांची बाराखडी सांकेतिक रूपात नक्की कशी साठवली जाते ज्यामुळे आई वडिलांचे गुणधर्म पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात यासारखे प्रश्न आता उपस्थित झाले होते.

यावर संशोधन करणे म्हणजे अतिशय चिकाटीचे काम.. एकच शक्यता बरोबर येणार हे माहीत असताना हजारो शक्यता तपासून पहाव्या लागणार होत्या.

पण डॉ खुराणा म्हणजे सलग १२ वर्ष एकही सुट्टी ना घेणारा माणूस संशोधनाला पूर्णपणे वाहून घ्यायचा खुराना यांचा स्वभाव होता म्हणूनच ते यात यशस्वी होऊ शकले.

डॉ. खुराना यांनी डीएनएमधील केवळ एकाच मुळाक्षराची साखळी असलेला एक कृत्रिम जीन तयार केला. तो पेशींच्या प्रथिनांची निर्मिती करणार्‍या यंत्रणेत घुसवला आणि त्यापासून परत एकाच घटकाची साखळी असलेले प्रोटिन तयार होते हे सिद्ध केले.

डॉ. खुरानांच्या या शोधामुळे जीनपासून प्रोटिन तयार होणाच्या सांकेतिक लिपीची, पर्यायाने अनुवंशिकता कशी जपली जाते याची उकल करणे सोपे झाले.

रॉबर्ट हॉली आणि मार्शल निरेनबर्ग या त्यांच्या सहकार्‍यांचे देखील त्यात तितकेच योगदान आहे. हा शोध अतिशय महत्त्वाचा होता, म्हणून या तिघांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1610126433278612 1

मधल्या काळात डॉ. खुराना यांच्या आयुष्यात एलिझाबेथ आली. दिसायला अतिशय सुंदर, सिनेमातील हिरोप्रमाणे असलेला “पंजाबदा हॅरी पुत्तर” स्वभावाने मात्र अतिशय संकोची, भिडस्त एवढा की त्याचे “कांदेपोहे” शिवाय लग्न होऊच शकले नसते.

पण स्विझरलँडमध्ये जन्मलेली एलिझाबेथ त्याची विकेट घेऊन गेली. १९४७ मध्ये प्राग मध्ये त्या दोघांची पहिली भेट झाली. पुढे पाच वर्षांनी त्यांनी लग्न केले आणि हॅरीचे आयुष्य स्थिर झाले. त्याच्या आयुष्यात एलिझाबेथ प्रेमासोबत चित्रकला संगीत यांना घेऊन आली. लवकरच या शात्रज्ञाचे घर विज्ञान, कला, तत्वज्ञान यांच्या पुस्तकांसोबत सुंदर चित्रांनी भरले आणि तीन गोंडस मुलांनी देखील..

1610126713302538 1

प्रसिद्धीपासून अतिशय दूर राहणारा हा शास्त्रज्ञ.

नोबेल भेटला तरी भाव ना खाणारा. अनुवंशिकतेचे गुपित उलगडणार्‍या या माणसाची स्वतःची अशी काहीच गुपिते नव्हती. साधे सोपे आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवणारा.पोहण्याची आणि ट्रेकिंगची आवड होती पण एकदा कामाला लागला की त्यांना कशाची शुध्द नसायची.

डोके हँग झाले की चालायला एकटेच बाहेर पडायचे आणि चालताचालता अनेक वेळा त्यांच्या डोक्यात नव्या कल्पना जन्म घ्यायच्या. स्वतः पेक्षा सहकाऱ्यांना पुढे करायचा स्वभाव. त्यामुळे त्यांचे देखील भरपूर प्रेम मिळायचे. संतांनी सांगितले आहेच .. प्यार दो… प्यार लो

१९६० मध्ये अमेरिकेत विस्कॉन्सिन विद्यापीठातील एंझाइम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांना बोलावण्यात आले.

सन १९६६ साली डॉ. खुराना यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. मध्यंतरी १९६३ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविले होते. १९६८ मध्ये त्यांना अमेरिकन सरकारने “अल्बर्ट लास्कर” पुरस्कार तर १९८६ मध्ये “नॅशनल मेडल ऑफ सायन्स” ने गौरवित केले.

पुढे शेकडो पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत, सांगत बसलो तर चव जाईल पोस्टची…

सर्वात मोठे नोबेल…

१९६८ मध्येच त्यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविंद्रनाथ टागोर आणि सी व्ही रमण यानंतर तिसऱ्यांदा भारतीयाचे नाव नोबेल यादीत आले होते. तब्बल ३८ वर्षाच्या दुष्काळानंतर… भारतात फुल्ल हवा.. सगळ्या पेपरमध्ये पहिल्या पानावर हीच बातमी.

हायकिंगला जाताना त्यांना एकटेच जायला आवडायचे. जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्यावेळेस संपूर्ण विद्यापीठातील सर्वात शेवटची व्यक्ती ते असतील ज्यांना ही बातमी कळली.

तेव्हा डॉक्टर हायकिंगसाठी दूर एका गावात निघून गेले होते. तिथे ना रेडिओ ना टेलिफोन.. एलिझाबेथ गाडी चालवत त्यांना शोधून घरी घेऊन आली, लगेच सेलिब्रेशन देखील चालू झालं. मित्रांच्या हातामध्ये शॅम्पेनचा ग्लास आणि डॉ. खुराना यांच्या हातामध्ये खडू… फळ्यावर शोधाबाबतची माहिती समजून देत पार्टीचा आनंद घेत होते.

1610126709765769 2

त्यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स जाहीर करण्यात आले तेव्हाची गोष्ट..

व्हाईट हाऊसमधून पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती देण्यासाठी कॉल आला होता. दुर्दैवाने तेव्हा डॉ. खुराना कॉल अटेंड करू शकले नाहीत. ज्याने कॉल उचलला त्याने यांच्यासाठी टेबलवर एक चिठ्ठी ठेवली. आपल्याच तालात मग्न असलेल्या खुराना यांनी ती बरेच दिवस पाहिली देखील नाही. इकडे व्हाईट हाऊसमधील आयोजकाची हवा टाईट. त्याला वाटले डॉक्टर येत नसतात.. आपण त्यांची आधी परमिशन घ्यायला हवी होती.. आता काय करायचे..

भीतभीतच त्याने पुन्हा फोन केला तेव्हा खरा प्रकार समजला.

१९७० मध्ये डॉ. खुराना यांना मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या जगविख्यात संस्थेने त्यांना अल्फ्रेड सोलन विभागाचे प्राध्यापक पद दिले होते. ही त्यांची शेवटची नोकरी.. तब्बल ३७ वर्षे इथे काढली त्यांनी.

डॉ. खुराणा यांनी इथे एक वेगळी यंत्रणा तयार केली. अशी यंत्रणा जिथे संवाद साधताना कुणालाच अडचण येणार नाही. केवळ विद्यार्थी आणि शिक्षकच नाही तर प्रयोगशाळेत संशोधन करणारे शास्त्रज्ञ, नवीन आयडियाच्या शोधात असलेले उद्योजक आणि संस्थेचे माजी विद्यार्थी… सगळ्यांना एकमेकाच्या अनुभवाचा फायदा या व्यवस्थेत होत होता.

या व्यवस्थेमुळे संस्थेकडे जगभरातील विद्यार्थी आकर्षित होत होते, २७ देशातील शास्त्रज्ञ एकाच वेळी काम करत होते. १९९३ मध्ये नोबेल मिळवणारा मायकेल स्मिथ हा देखील डॉ. खुराना यांचा विद्यार्थी.

डॉ. खुराना यांची केबिन नेहमी टापटीप ठेवलेली असे. प्रत्येक शास्त्रज्ञाची तसेच संशोधकांची माहिती त्यांनी व्यवस्थित फाईल मध्ये ठेवलेले असे. तुम्ही कोणतेही नाव घ्या, त्याची फाईल ते एका मिनिटांमध्ये ते काढू शकत होते. प्रशासकीय बाबी, नवीन शास्त्रज्ञांना मार्गदर्शन यासोबतच त्यांचे वैयक्तिक संशोधन देखील सुरू राहिले.

१९७२ मध्ये त्यांनी पहिला कृत्रिम जीन बनवला. १९७६ मध्ये कृत्रिम जीनला एका जीवाणू पेशीमध्ये कार्यान्वित करण्यात आले. या शोधामुळे आता लवकरच क्लोनिंग युग येणार होते. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये क्लोनिंग करण्यास सुरुवात झाली. यातूनच जन्म घेतला मानवी जिनोम प्रोजेक्टने.

1610126707065599 3

आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत २३ गुणसूत्रांच्या जोड्या म्हणजेच ४६ गुणसूत्रे असतात. प्रत्येक जोडीत एक एक अशी २३ आईकडून मिळालेली तर २३ वडिलांकडून. येताना प्रोटीनच्या रुपात सांकेतिक संदेश सोबत घेऊन आलेले.

या ४६ गुणसूत्रांवर असलेली ३ अब्ज मुळाक्षरे तो संदेश घेवून आलेली असतात. ही मुळाक्षरे गुणसूत्रांवर कोणत्या क्रमाने गुंफलेली असतात याचा शोध घेण्यासाठी १९९० मध्ये अमेरिकच्या पुढाकाराने सर्व जगातील २० प्रयोगशाळांच्या (त्यात अमेरिकेच्या १२ आहेत अन भारतातील एकही नाही) सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला.

या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे अनेक असाध्य रोगांवरचा उपाय सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पास यशस्वी करण्यात डॉ. खुराना यांचा मोठा वाटा आहे. आजवर इन्सुलीनच्या जीनचे स्थान कळलेले आहे. त्यामुळेच ऊतीच्या साह्याने त्याला मानवी पेशीमधून कापून काढून तिचे यीस्टसारख्या जंतूत रोपण करून प्रयोगशाळेत मानवी इन्सुलीन तयार करता येऊ लागले आहे. मात्र अजून अनेक जीन्सचे मानवी शरीरातील स्थान कळलेलं नाही. त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

मानवी शरीरातील सर्व निरोगी पणाचे तसेच आजारीपणाचे गुणसुत्रीय मूळ शोधणे शक्य झाल्यास मानवाचे आयुर्मान नक्कीच वाढवता येईल. मानवाला स्वतःच्या क्लोन निर्माण करता येईल. भविष्यात त्याला कधीही हृदय, किडनी, यकृत अशा कोणत्याही अवयवांची गरज लागली तर त्याला स्वतःचाच क्लोन मधील अवयव उपलब्ध असेल. ज्याच्या आयुष्यामध्ये ही वेळ आलेली असेल, तो नक्कीच त्या वेळेस डॉक्टर हरगोविंद खुराना यांचे उपकार मानेल.

तसे क्लोनिंगचे प्रकार आपल्याकडे खूप काळापासून चालू आहेत.

आठवा कौरवांची कथा.. क्लोनच कशाला, आपण तर अगदी मळापासून, घामापासून किंवा इतर कोणत्याही गोष्टीपासून जीव जन्माला घालतोय. आता देश महासत्ता बघायचा असेल तर पंतप्रधानांचे देखील दहा बारा क्लोन तयार केले पाहिजेत.. बिचारे आत्ताच दिवसातील आठ तास काम करून दमतात.. अजुन किती तरी देश त्यांच्या पदस्पर्शापासून वंचित आहेत.

1610126703509266 4

डॉ. खुराना यांचे जीवन तसे जास्त घडामोडीचे नाही.

आयुष्याची सुरुवात सत्यजीत रे यांचा गरीब सिनेमा आहे.. नंतर आयुष्यात ना डेव्हिड धवनची कॉमेडी… की अनुराग कश्यपचा थ्रीलर.. कुणाशी वाकडे नाही.. की कुणाशी वाद नाही. कधी आपल्याला डावलले जाते याची भावना नाही, की कोणती महत्त्वाकांक्षा नाही..

त्यांना जेव्हा स्वतःची प्रयोगशाळा मिळाली, कदाचित त्याच वेळेस त्यांच्या सर्व महत्त्वकांक्षा पूर्ण झाल्या असाव्यात.. नंतर ते कशासाठीच आग्रही नव्हतेच.. आपण भले आणि आपले संशोधन भले. २००७ पर्यंत म्हणजेच वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत ते कार्यरत होते. ९ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला..

“मानव असो अथवा कोणताही सजीव.. प्रत्येक जण हा प्रोटीनचा बनलेला आहे आणि प्रत्येकाकडे ज्या पद्धतीचे प्रोटिन असेल त्या पद्धतीने त्याची क्षमता असते” असे म्हणणाऱ्या डॉ. हरगोविंद खुराना यांनी अनेक युवकांची क्षमताबांधणी करून दिली आहे.

अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे phd पूर्ण करून गेले आहेत. ८५ व्या वर्षी निवृत्ती घेतली असली तरी विज्ञानामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याबद्दल ते जाणून घ्यायला अगदी शेवटपर्यंत उत्सुक असत.

मृत्यूच्या काही तास आधी जेव्हा ते दवाखान्यात बेडवर झोपून होते, तेव्हादेखील ते ग्लुकोज आणि मेंदू याबद्दलची चर्चा करत होते.

विज्ञानाशी मैत्री केली की ते आयुष्यभर निभावते. डॉ. हरगोविंद खुराना यांना देखील विज्ञानाने अखेर पर्यंत साथ दिली.

कोणी म्हणतात ना की विज्ञान संपल्यावर अध्यात्म चालू होते. पण आता तुम्हीच पाहा… आमचे विज्ञान कधी संपतच नाही .. अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत..

जय विज्ञान जय मानवता.

लेखक : 

डावकिनाचा रिच्या

संपर्क : marathirichya@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.