कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही डॉ.अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला? तज्ञ सांगत आहेत कारण
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. के. के. अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची दुःखद बातमी येऊन धडकली. तीन दिवसांपूर्वीच तब्येत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेरीस मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आज दिवसभर सर्व स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मात्र या सगळ्या दरम्यान एक प्रश्न सगळीकडून विचारला जात आहे ते म्हणजे दोन महिन्यापूर्वीच लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील डॉ. अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला?
या बाबतची कारण देशभरातील विविध तज्ञ डॉक्टरांनी सविस्तर सांगितलं आहे.
गुडगावच्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर अरविंद कुमार, यांनी ABP न्यूज या हिंदी माध्यमांशी बोलताना सांगितलं कि,
मागच्या वर्षी जेव्हा कोरोना लसीकरणाच्या तिन्ही फेजमधील ट्रायल पार पडल्या तेव्हा त्यामध्ये काही निरीक्षण आम्ही समोर आणली होती. यात प्रामुख्याने लस घेऊन देखील २५ ते ३० टक्के लोक बाधित झाले. पण सगळ्या स्वयंसेवकांना लक्षण अगदी ना के बराबर होती. त्यामुळे इन्फेक्शन पासून ७० ते ८० टक्के संरक्षण मिळतं आहे.
सोबतच कोणालाही हॉस्पिटलमध्ये भरती किंवा ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स याची गरज लागली नव्हती. यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे मृत्यूदर देखील शून्य टक्के अपेक्षित धरला होता. हाच दावा दुसरी लाट येण्याआधी होता.
मात्र अलीकडेच मागच्या ६ आठवड्यांमध्ये लस घेतलेले पत्रकार, डॉक्टर्स, नर्स हे बाधित तर होतं आहेतच पण या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आता वेगळी असल्याचं दिसून येतं आहे.
त्यामुळे हा एक संशोधनाचा विषय आहे की,
दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत? कि अँटीबॉडीज तयार झाल्या, मात्र त्या पुरेश्या प्रमाणात तयार झाल्या नाहीत? कि ज्या प्रमाणात न्यूट्रिलाजिंग अँटीबॉडीज पाहिजे होत्या त्या तयार झाल्या नाहीत? सोबतचं चौथी आणि महत्वाची शक्यता म्हणजे ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या त्या या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारण नाहीत.
तर इंडियन मेडिकल असोसिएशचे जेष्ठ पदाधिकारी आणि फायनान्स सचिव डॉ. अनिल गोयल म्हणाले,
हृदयरोग तज्ञ डॉक्टर के.के. अग्रवाल यांच्या प्रकरणात वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. याच्यात एक मोठं कारण म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार, फुफुसाचे आजार, असे कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजार असणं. त्यामुळे रिस्क जास्त वाढते, आणि ते मृत्यूचं कारण बनतं.
लस घेतल्यानंतर देखील रिपोर्ट पॉजिटिव्ह येऊ शकतो.
त्यामुळे डॉ. गोयल स्पष्ट करतात कि, लस घेतल्यावर आपण बाधित होणार नाही, हा समज लोकांनी काढून टाकला पाहिजे. लस घेऊन कमीत कमी ७० ते ९० टक्के अँटीबॉडीज तयार होणं गरजेचं आहे. यानंतर लस घेतल्यावर देखील बाधित होण्यामागे एक मोठं कारण म्हणजे संबंधित व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असणं.
आंध्र प्रदेशच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरेला सुब्रमण्यम यांनी सांगितलं कि,
जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार गोष्ट स्पष्ट केली आहे कि, लस आपल्याला संरक्षण देतं, मात्र त्यानंतर आपण बाधित होणार नाही असं समजणं चुकीचं ठरू शकते. सोबतचं जर कोणतीही व्यक्ती कोरोना आजाराच्या इनक्यूबेशन पिरियडमध्ये लस घेतली तर त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊ शकतो.
सोबतचं डॉ. सुब्रमण्यम यांनी हे देखील स्पष्ट केलं कि, लसीकरण केंद्रावर आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते किंवा लस घेतल्याच्या तात्काळ आपल्याला लागण होऊ शकते, त्या परिस्थितीमध्ये देखील आपला रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊ शकतो.
दुसऱ्या लाटेत देशभरात आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे…
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे, तर पहिल्या लाटेत ७४८ डॉक्टरांचा मृत्यु झाला होता.
जर राज्यानुसार आकडेवारी बघायची म्हंटलं तर सगळ्यात जास्त म्हणजे ७८ मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश ३७, दिल्ली २८, आंध्र प्रदेश २२, तेलंगना १९, महाराष्ट्र १४, पश्चिम बंगाल १४, तामिळनाडू ११, ओरीसा १०, तर कर्नाटकमध्ये ८ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
विशेष गोष्ट म्हणजे यातील बहुतांश डॉक्टरांनी लस घेतली होती.
याचा अर्थ लसीकरण संशयास्पद आहे का?
तर मेदांताच्या एक्सपर्ट्सनी लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, या सगळ्या गोष्टीमुळे लसीकरणावर संशय घेण्याची काहीही गरज नाही. किंवा त्यातुन १०० टक्के संरक्षण नाही असं म्हणणं देखील चुकीचं ठरू शकत.
कारण मृत्यू आणि गंभीर इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी आज आपल्याकडे लस हे एकच मजबूत शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली वेळ आली कि लस घेणं गरजेचं आहे.
हे हि वाच भिडू