मराठी डॉक्टरने लाखो चिनी माणसांचे प्राण वाचवले होते. चीनमध्ये त्यांचा पुतळा उभारलाय !   

चीनच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ज्या कुठल्या राजकीय नेत्याने भारताला भेट दिली त्या सर्वांच्या भारत दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम एक गोष्ट सामान्यतः सारखीच होती. ती म्हणजे मुंबईतील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेणं.

सप्टेबर २०१४ साली जेव्हा चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी देखील वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा पाळत डॉ. कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

manorama
चीनचे पंतप्रधान ली केकीआंग यांनी सप्टेबर २०१३ साली द्वारकानाथ यांच्या भगिनी मनोरमा यांची भेट घेतली होती

कोण होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस..?

१० ऑक्टोबर १९१० साली सोलापूर येथे जन्मलेल्या द्वारकानाथ कोटणीस यांनी मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमधून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. चाळीसच्या दशकात चीन आणि जपानमध्ये झालेल्या दुसऱ्या ‘सिनो-जापनीज’ युद्धात चीन सैन्यावरच्या उपचारादरम्यान ९ डिसेंबर १९४२ रोजी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.

‘सिनो-जापनीज’ युद्धादरम्यान चायनीज जनरल झु डे यांच्या विनंतीवरून जवाहरलाल नेहरू यांनी ५ भारतीय डॉक्टरांची टीम चीनच्या सैन्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पाठवली होती. त्यात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश होता.

यानिमित्ताने ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारताने जापानविरुद्ध स्वातंत्र्याचा संघर्ष करणाऱ्या चीनला मदतीचा हात दिला होता.

डॉ. एम. अटल यांच्या नेतृत्वाखालील ५ भारतीय डॉक्टरांची टीम चीनसाठी रवाना झाली होती. चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं कारण कुठल्याही आशियायी देशातून मदतीसाठी आलेली ही पहिलीच टीम होती. युद्धादरम्यानचं आपलं मिशन पूर्ण झाल्यानंतर इतर ४ डॉक्टरांची टीम भारतात परतली मात्र डॉ. कोटणीस यांनी चीनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

चीनी सैन्यासोबत काम. 

१९३९  सालापासून डॉ. कोटणीस माओ झोडांगच्या नेतृत्वाखालील सैन्यात काम करायला सुरुवात केली. अतिशय खडतर परिस्थितीत आणि दुर्गम प्रदेशात युद्धात जखमी होणाऱ्या सैन्यावर उपचार करण्याचं काम ते करत असत. या कामादरम्यान त्यांनी देहभान विसरून चीनी सैन्याची सेवा केली. असं सांगितलं जातं की युद्धाच्या दरम्यान त्यांनी जवळपास ८०० सैनिकांवर उपचार केले होते.

१९४० साली त्यांची नियुक्ती ‘बेथने इंटरनॅशनल पीस हॉस्पिटल’च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. याच हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी त्यांची गुओ किंग्लन या नर्सबरोबर ओळख झाली आणि ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊन या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे डिसेंबर १९४१ साली त्या दोघांनी लग्नही केलं.

लग्नानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी ‘इन्हूआ’ (Yinhua) असं ठेवलं. या नावातल्या Yin या शब्दाचा अर्थ ‘भारत’ असा होतो, तर Hua या शब्दाचा अर्थ ‘चीन’ असा होता. पण ‘इन्हूआ’च्या जन्मानंतर अवघ्या तीनच महिन्यात ९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. कोटणीस यांचा कामाच्या ताणामुळे एपिलेप्सीमुळे मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना माओ झोडांग म्हणाला,

“सैन्याने मदतीचा हात गमावलाय, देशाने आपला मित्र गमावलाय”

चीन मात्र अजूनही आपल्या देशासाठी दिलेल्या डॉ. कोटणीस यांच्या योगदानाला विसरलेला नाही. चीन सरकारने शिजाझूआंग प्रांतातील हेईबेई येथे त्यांचा पुतळा उभारलेला आहे.

भारत आणि चीन यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून डॉ.कोटणीस यांचं नाव इतिहासावर कोरलं गेलंय. उभय देशांनी डॉ. द्वारकादास कोटणीस यांच्यावर पोस्टाचा स्टँप देखील काढलाय. याशिवाय चायनीज लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. चायनीज लोक त्यांची आठवण हिरो म्हणूनच काढतात.

amar kahani

प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक व्ही.शांताराम यांनी १९४६ साली ‘डॉ. कोटणीस की अमर कहाणी’ या चित्रपटातून डॉ. कोटणीस यांचं कार्य जगासमोर आणण्याचं काम केलं होतं. व्ही. शांताराम यांनीच या चित्रपटात डॉ. कोटणीस यांची भूमिका केली होती.

२००९ साली ‘चीन आंतरराष्ट्रीय रेडीओ’ या बीजिंगस्थित सरकारी इंग्लिश  रेडीओ चॅनेलने एक ऑनलाईन सर्वेक्षण करून चीनमधील गेल्या शतकातील १० सर्वात  आदरणीय परदेशी व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली होती. या यादीत डॉ. कोटणीस यांच्या नावाचा देखील समावेश होता.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.