मराठी तरुणाने ओव्हरीज ट्रान्सप्लांट यशस्वी करून अमेरिकेत झालेल्या अपमानाचा बदला घेतला
एखादी खोटी गोष्ट सतत सतत सतत लोकांना सांगितली की, काहीवेळानं लोकांना तीच गोष्ट खरी वाटायला लागते असं हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स म्हंटला होता….?
अजिबात नाही ! लबाड इंग्रजांनी खरं तर या थियरीची सुरुवात केली होती. त्यांनी भारतीयांना सतत रंगावरून, भाषेवरून, प्रथा परंपरांवरून हिणवलं.. आणि हे धादांत खोटं भारतीयांना खरंच वाटायला लागलं. त्यामुळे मग पूर्वीचा असो वा आत्ताचा इंग्रज, भारतीयांचा अपमान करण्याची एक ही संधी हे गोरेटेले लोक सोडत नाहीत. पण आपण पण कसलेले आहोत. त्यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची एक ही संधी आपण सोडत नसतोय.
अशाच एका अपमानाचा बदला डॉक्टर असलेल्या महाराष्ट्रीयन तरुणाने घेतला होता….पण कसा ?
तर ही गोष्ट आहे ८० च्या दशकातली. हृदयरोपणाच्या तंत्रातले पितामह असलेले अमेरिकन डॉक्टर एकदा मुंबईच्या के.ई. एम मध्ये लेक्चर द्यायला आले होते. त्यावेळेला दुर्दैवानं त्यांच्यासाठी उपलब्ध केलेला स्लाईड प्रोजेक्टर बंद पडला. आता एकच प्रोजेक्टर बंद पडेल असं नाही तर एका मागोमाग एक असे पाच ते सहा प्रोजेक्टर बंद पडत गेले. हा सर्व प्रकार बघून ते अमेरिकन हृदयरोग तज्ञ म्हंटले की,
भारताला हृदयरोपणाच्या ज्ञाना आगोदर स्लाईड प्रोजेक्टरच्या ज्ञानाची खरी गरज आहे. तिथे जवळच बसलेला एक तरुण या वाक्यानं हडबडला. त्या वाक्यांनी त्याचं काळीज चिरत गेलं आणि त्यादिवशी त्याने आपल्या मनाशी शपथ घेतली की,
मी आयुष्यभरात अवयव रोपणातलं एक तरी तंत्र हिंदुस्थानात संशोधन करून या फिरंग्यांना स्वीकारायला लावीन.
तो तरुण म्हणजे डॉक्टर प्रवीण म्हात्रे…
डॉक्टर प्रविण म्हात्रे यांनी जगात पहिल्यांदाच ओव्हरीज अवयव रोपण करण्याचं तंत्र शोधून काढलं होतं. ट्रान्सप्लांट करता येण्याची शस्त्रक्रिया त्यांनी २००२ सालीच यशस्वी करून दाखवली. स्त्रीरोग शास्त्रातला हा चमत्कारच होता. कारण तोपर्यंत तरी संबंध जगात ओव्हरीज ट्रान्सप्लांट होऊ शकतील यावर कुणाचा विश्वास नव्हता.
अमेरिकन डॉक्टर तर असं मानायचे की अशा प्रकारचे ट्रान्सप्लांट करण्याकरता माणसाला नाही म्हटलं तरी किमान पाच ते सात वर्षे लागतील. पण डॉक्टर प्रविण म्हात्रे यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं आणि तेही अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणात.
डॉक्टरकी करत असणार्या प्रवीण म्हात्रे यांनी एमडी पर्यंतच्या सर्व परीक्षा डिस्टिंक्शन आणि गोल्ड मेडल ने पास केल्या. गायनाकोलॉजिस्ट असलेल्या म्हात्रेनी ओव्हरीज या विषयावर संशोधन करायचं ठरवलं होतं.
स्त्रियांच्या शरीरातल्या ओव्हरीज स्त्रियांच्या शरीरातला महत्त्वाचा घटक असतो. स्त्री वयात आल्यावर तिच्या शरीरात बदल होतात. तिची वाढ व्हायला लागते आणि ती प्रजनन करायला लागते. यासाठी तिच्या शरीरात ओव्हरीज असाव्या लागतात. पण काही मुलींच्या शरीरात जन्मताच या ओव्हरीज नसतात आणि त्यामुळे मुली वयात येण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. अशा मुलींचे प्रमाण जास्त आहे. कर्नाटकात तर सुदृढ मुलीच्या लग्नात अशा मुली घर कामासाठी भेट देण्याची पद्धत होती. फक्त हार्मोन्स देऊन फार फार तर मुलीला शारीरिक गोलाई प्राप्त करता येत होती. या जन्मजात वैगुण्यावर जगात कुठं ही उपाय नव्हता.
एमडीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांच्या तोंडी परीक्षेत पाच परीक्षकांनी त्यांना ओव्हरीज नसल्या तरी काय उपाय करशील असा प्रश्न केला होता. त्यावर म्हात्रे तात्काळ उत्तरले,
मी ओव्हरीज ट्रान्सप्लांट करीन.
तेव्हा ते स्त्री रोग तज्ञ असलेले वरिष्ठ परीक्षक म्हटले, मुला तू हुशार आहेस पण या बाबतीत मात्र तू मुर्खांच्या नंदनवनात राहतोस.
हे ऐकून म्हात्रेंनी हेच अवयव रोपण करण्याचा निर्णय घेतला. प्रवीण म्हात्रे यांनी यावर तंत्र शोधून काढलं. त्यांच्या या शोधासाठी त्यांना बीबीसीने मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केल.
आपला अपमान झाला म्हणून हळहळत न बसता त्याचे उट्टे काढण्यासाठी डॉ. म्हात्रेंनी मेहनत तर केलीच पण वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान हे नेहमीच पूर्वेकडून पश्चिमेकडे जातं हे ही सिद्ध केलं.
हे ही वाच भिडू
- देशात पहिल्यांदा कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून स्टार्ट अप उभं केलं आणि लाखो रुपये देखील कमवले..
- या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय
- कोरोनाच्या काळाला संधी मानली आणि स्वतः च हेल्थकेअर स्टार्टअप सुरू केल