अस्सल राज्यपाल नियुक्त : डॉ. रफिक झकेरिया

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं सहावं नाव आहे ते डॉ. रफिक झकेरिया.

काही काही माणसं ही पुरस्कारांच्या पलिकडे पोहचलेली असतात. असामान्य कर्तृत्वातुन ते विद्वान, शिक्षणतज्ञ, लेखक, क्रियाशील विचारवंत आणि धुरंदर राजकारणी म्हणून घडलेली असतात. म्हणूनच ते कोणताही गर्व आणि अभिमान न बाळगता अखंड एक शहर वसवल्यानंतर, १२-१५ कॉलेज स्थापन केल्यानंतरही डाऊन टू अर्थच राहता. त्यामुळेच डॉ. रफिक झकेरिया असे नाव सांगत असताना अत्यंत आदराने ते नाव घ्याव लागते.

आपल्या देशातील पोरबाळ शिकली पाहिजेत, ज्ञानी झाली पाहिजेत, स्पर्धेत उतरायला हवीत म्हणून शिक्षण संस्था व माणसांचे जाळे त्यांनी अक्षरशः धाग्याने धाग्याने विणले.

जन्माने कोकणी मुस्लिम. नालासोपारामध्ये ५ एप्रिल १९२० रोजी जन्म. त्यांचे शिक्षण इस्माईल युसूफ महाविद्यालय, मुंबई येथून झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए. मध्ये सुवर्णपदक पटकावले.

अत्यंत हुशार असणाऱ्या या माणसाने लंडन येथून ‘भारतीय मुस्लिम राजकीय विश्लेषण’ या विषयावर M.A. Phd पूर्ण केली. त्याचप्रमाणे लिंकन्स इन इंग्लंड येथून बार-अ‍ॅट-लॉ ही पदवी प्राप्त करून मुंबई येथे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ते कार्यरत झाले.

सुरवातीच्या काळात झकेरियांनी भारतीय स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतला. भारतीय युवक कॉंग्रेसचे नेते, मुंबई कॉंग्रेसचे चिटणीस, अखिल भारतीय व महाराष्ट्र कॉंग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा १९६०-६२ या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य होते. पण त्यांचे कार्य सांगण्यासाठी ही दोन वर्ष मर्यादित नाहीत.

नंतरच्या काळात पंडित नेहरूंनी त्यांना राजकारणात आणले. आणि महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यासाठी काम करण्याची सूचना केली. औरंगाबादसह मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. त्यामुळे या विभागाला न्याय देण्यासाठी डॉ. झकेरीया यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता आहे, नेहमी हे त्यांनी हेरले.

पंडीत नेहरू, महात्मा गांधी आणि मौलाना आझाद यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. झकेरिया औरंगाबादला आले. १९६२ साली ते येथून उभारले आणि सलग तीन टर्म ते आमदार म्हणून निवडून येत गेले.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात त्यांनी महसुल, नगरविकास, आरोग्य, पर्यटन अशा विविध खात्यांचा कार्यभार पाहीला.  पुढे १९७८ ते ८४ या दरम्यान राज्यसभेचे सदस्य राहिले.

मात्र फक्त राजकारणी इतक्यापुरतीच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. ते मुळचे आणि हाडाचे शिक्षणतज्ञ होते. औरंगाबादला आल्यानंतर डॉ. झकेरिया यांनी औरंगाबाद शहर म्हणून उभे केले
(औरंगाबाद विषयीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

सोबतच या शहरात त्यांनी शिक्षणाची मोठी चळवळ उभी केली. कट्टर नेहरूवादी विचारांच्या डॉ. झकेरिया यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि उत्तम नावारूपास आणल्या.

मौलाना आझाद महाविद्यालय नावाने एक छोटेखानी विद्यापीठच त्यांनी १९६३ मध्ये १४४ मुलांना सोबत घेवून स्थापन केले. महाविद्यालयाला नॅकने ए तर मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाला ए प्लस दर्जा दिलेला आहे. महाविद्यालयाला त्याकाळात इंदिरा गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांसारख्या विभूतींनी भेट दिली आहे.

मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हून औरंगाबाद कॉलेज फॉर वुमन्स उभे केले. त्याचेच नामांतर पुढे डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्स असे झाले. आज येथे जवळपास चार हजारहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत.

अखंड मराठवाड्यात उर्दु शिकवणारे एकही कॉलेज नव्हते. हे पाहून त्यांनी १९७० मध्ये उर्दुला केंद्रीत ठेवून पण सोबतच इतर भाषांचे शिक्षण देणाऱ्या मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. यात उर्दु भाषेसाठी ७० जागा आणि मराठी सोबतच इतर भाषांसाठी ५० जागा उपलब्ध करुन दिल्या. आज जवळपास २३० मुलं इथे शिक्षण घेवू शकतात.

१९७४ मध्ये फार्मसी कॉलेजची स्थापना केली. यात देखील ६० मुलांच्या क्षमतेला मान्यता देण्यात आली. पुढे याचे कॉलेजचे नामांतर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी असे करण्यात आले. १९८५ मध्ये हॉस्पिटलशी संलग्न झाल्याने मुलांना इथे प्रात्यक्षिक शिक्षण घेता येवू लागले.

नंतरच्या काळात मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या शिक्षणासाठी हिंदुजा टेक्नॉलॉजी सेंटर, इंन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅजेजमेंट, टॉम पॅट्रिक आयटी कॉलेज, हॉरनिमन कॉलेज ऑफ जर्नालिझम अशी तांत्रिक कौशल्यांवर आधारित शिक्षण देण्यासाठी कॉलेजची स्थापना त्यांनी केली.

डॉ. झकेरिया जामिया अलिगड विद्यापीठाचे २५ वर्षे कुलगुरू होते.

त्यांनी भारतीय बाबी, इस्लाम व ब्रिटिश साम्राज्यवादावर बहुतांशी लिखाण केले आहे. त्यांच्या गाजलेल्या इंग्लिश ग्रंथसंपदेत ‘ए स्टडी आॅफ नेहरू’ व ‘द मॅन हू डिव्हायडेड इंडिया’, ‘राइज ऑफ मुस्लिम इन इंडियन पॉलिटिक्स’, ‘मोहंमद अ‍ॅण्ड कुरआन’, ‘दि स्ट्रगल विदीन इस्लाम,’ ‘कन्फलिक्ट बिटवीन रिलिजन अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’, ‘इंडियन मुस्लिम्स : व्हेअर दे हॅव गॉन राँग’, ‘कम्युनल रेज इन सेक्युलर इंडिया’ या ग्रंथांचा समावेश होतो. असे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिले.

डॉ. झकेरिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघात १९६५, १९९०, १९९६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या मरणोपरांत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी संदेश देताना ‘देशभक्त, राष्ट्रवादी, महान तत्त्ववेत्ता’ असे गौरवोद्गार काढले.

त्यांची दोन लग्न झाली होती. दुसऱ्या पत्नी पद्मश्री फातिमा झकेरिया या संडे टाइम्स आॅफ इंडियाच्या बरीच वर्ष संपादक होत्या. त्यांनीच डॉ. झकेरिया यांचा वारसा पुढे चालवला. तर फरीद झकेरिया हे त्यांचे चिरंजीव अमेरिकेत पत्रकार म्हणून काम करतात.

डॉ. झकेरिया यांची अंतिम इच्छा देखील शिक्षणाच्या पवित्र भुमीसोबत एकरुप होण्याची होती. ९ जुलै २००५ला त्यांच्ता मृत्युनंतर इच्छेनुसार त्यांना मौलाना आझाद कॅम्पसमधील त्यांच्या ‘मजार’मध्ये विसावण्यात आले.

अशा या राज्यपाल नियुक्त सदस्य होवून पुन्हा राजकारणात गेलेल्या पण समाजभान न विसरलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी यांच्या मजारवर डॉ. मो. इक्बाल यांनी लिहिलेला एक शेर आहे. तो झकेरिया यांच्या अतुल्य कामगिरीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.

‘‘कोई बज़्म हो, कोई अंजुमन ये शुआर अपना कदीम है
जहां रौशनी की कमी हुई वहां एक चराग़ जला दिया॥

लवकर भेटूया पुढच्या भागात…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.