श्रद्धाळू राजेंद्रप्रसाद यांनी जिन्यावरुन घसरलेल्या जवाहरलाल नेहरूंना अंगठी गिफ्ट केली होती…

आपल्या देशातले वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जातात. राजकारणापलीकडची ही ओळख त्यांना आणखी लोकप्रिय ठरवते हे नक्की. उदाहरण द्यायचं झालं, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माणसांना लक्षात ठेवण्याची क्षमता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीयांशी असलेले मैत्रीचे संबंध, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यंगचित्रं अशा एक ना अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. या आवडी-निवडींचा काही जणांना फायदा होतो, तर काही जणांच्या आयुष्यात किस्से घडतात.

असाच एक किस्सा घडला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यात. दोघेही देशाचे पहिलेवहिले मोठे नेते. पण दोघांचे स्वभाव मात्र अगदी टोकाचे होते. नेहरूंचे विचार पहिल्यापासून पुरोगामी होते. त्यांची लाईफस्टाईलही कायम चर्चेचा विषय असायची. तर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शिक्षक म्हणून काम करत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, मग ते वकील झाले आणि त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या साधेपणामुळं जितके ओळखले जायचे तितकेच त्यांच्या श्रद्धाळूपणामुळंही. याच श्रद्धाळूपणामुळं त्यांच्यात आणि नेहरूंमध्ये अनेकदा खटकेही उडायचे. एकदा तर प्रजासत्ताक दिनाच्या तारखेवरूनच दोघांमध्ये वाद झाला होता.

डॉ. प्रसाद यांची २४ जानेवारी १९५० या दिवशी देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. ठरल्याप्रमाणं त्यानंतर दोन दिवसांनीच देश प्रजासत्ताक झाल्याची घोषणा होणार होती. मात्र प्रसाद यांनी या गोष्टीला विरोध केला. यामागचं कारण होतं प्रसाद यांचा भविष्य आणि फल-ज्योतिष यांच्यावर असलेला विश्वास. प्रसाद यांना काही ज्योतिष मंडळींनी सल्ला दिला होता की, ‘देश प्रजासत्ताक झाल्याची घोषणा करण्यासाठी २६ जानेवारी हा शुभ दिवस नाही. त्यामुळे हा दिवस टाळण्यात यावा आणि एखाद्या दुसऱ्या दिवशी घोषणा करण्यात यावी.’

ही गोष्ट समजल्यावर नेहरु चांगलेच चिडले. त्यांनी थेट राष्ट्रपती प्रसाद यांना पत्रच लिहिलं. ज्यात ते म्हणाले, ‘कोणा ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणं राष्ट्रीय कार्यक्रम निश्चित करणं मला मान्य नाही. या कारणामुळं असुविधा निर्माण होतीलच, पण सोबतच सगळ्या देशात आपलं हसं होईल. ज्या ज्योतिषांनी तुम्हाला हा सल्ला दिला असेल, ते भारतातल्या लक्षावधी लोकांचे प्रतिनिधी निश्चितच नाहीत, आणि आम्ही त्यांच्याकडे देशाचे सारथ्य अजिबात जाऊ देणार नाही.’ या पत्रानंतर ठरल्याप्रमाणं २६ जानेवारीलाच देश प्रजासत्ताक झाल्याची घोषणा झाली.

पण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या जोडगोळीत काय फक्त वादच नव्हते, तर जिव्हाळ्याचे संबंधही होते.

एकदा पंतप्रधान नेहरू संसद भवनात चालत होते, तेवढ्यात ते जिन्यावरुन घसरले. त्यांच्या गुडघ्याला जखमही झाली. राष्ट्र्पतींपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांच्या श्रद्धाळू स्वभावानुसार काही जणांनी त्यांना सल्ला दिला, की नेहरूंनी आपल्याजवळ एक हिरा बाळगावा, त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होतील. नेहरूंचा स्वभाव प्रसाद यांना चांगला माहिती होता. नुसता हिरा तर सांभाळणं कठीण होतंच.

त्यांनी एका अंगठीत तो हिरा बसवला आणि आपल्या सचिवांमार्फत ती अंगठी नेहरूंकडे पाठवली. सोबतच एक संदेशही पाठवला, ‘पंतप्रधानांनी ही अंगठी सदैव आपल्या जवळ बाळगावी.’

अपेक्षेप्रमाणं नेहरूंनी ती अंगठी स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘मी अंगठी किंवा दागिने वापरत नाही. राष्ट्रपतींना मी जिन्यावरुन घसरल्याचं कुणी सांगितलं हे मला सांगा, म्हणजे मी आणखी काही वेळा जिन्यावरुन पडतो आणि राष्ट्र्पतींकडून आणखी अंगठ्या मिळवतो.’

हे असं बोलल्यानंतरही, नेहरूंनी अंगठी स्वीकारली. त्यांनी भले ती बोटात घातली नाही, पण प्रसाद यांच्या विनंतीला मान देऊ अंगठी आपल्या जवळ मात्र बाळगली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.