एक शाळा अशीही, जिथं देशाचे राष्ट्रपती शिक्षक बनतात

शाळेत जायचं म्हंटल कि, सगळ्यात आधी आपल्याला कडक शिस्तीवाल्या मास्तरांची लयं भीती वाटते. त्यात ते शिकवणारे विषय जर आपल्या डोक्यावरून जात असतील. तर काय विचारूचं नका. पण देशात अशीही एक शाळा आहे जिथे थेट राष्ट्रपती शिकवतात.

ती शाळा म्हणजे डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय.

राष्ट्रपती भवनाच्या गेट नंबर ३१ च्या आत घुसलात कि तुम्हाला ही शाळा पाहायला मिळेल. जिथं देशाचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपती विद्यार्थ्यांचे वर्ग घेतात. हा, पण या शाळेत राष्ट्रपतींना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शिकवण्याचीही परवानगी आहे. 

तर, राष्ट्रपती भवनातील ही शाळा  १९४६ ला उघडण्यात आली होती. कारण या भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना घराजवळच शाळा मिळू शकेल. आर्चिबाल्ड पर्सिएल वेवेल हे त्यावेळचे भारताचे व्हाइसरॉय होते. आणि राष्ट्रपती भवनाला सुद्धा त्यावेळी व्हॉईसरॉय हाऊस म्हंटल जायचं.  पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर शाळेचे व्यवस्थापन दिल्ली प्रशासनाकडे आले.

दरम्यान, जेव्हा राष्ट्रपती भावनांची इमारत एडविन लुटियन्सच्या देखरेखीखाली बांधली गेली, तेव्हा येथे एकही शाळा नव्हती.

आता राष्ट्रपती भवनातली शाळा म्हंटल कि, तिथलं वातावरण सुद्धा तसंच शांत आणि शिस्तीचं. त्यात डायरेक्ट देशाचे राष्ट्रपतीचं  येऊन शिकवतात म्हंटल्यावर बात काही औरचं. आणि महत्वाचं म्हणजे देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींपासून सध्याच्या राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनीच इथं शिकवायची आपली ड्युटी पूर्ण केलीये. 

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद जेव्हा या केंद्रीय विद्यालयात  शिकवायला यायचे तेव्हा ते पूर्णपणे एक टिपिकल शिक्षक होऊन जायचे. शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी व्याकरण शिकवणं त्यांना आवडायचं. एवढंच नाही तर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पत्नी श्रीमती राजवंशी देवी या सुद्धा शाळेच्या यायच्या. इथलेच सगळेचं त्यांना ‘माँ’ म्हणायचे. शाळेतल्या  प्रत्येक कार्यक्रमात राजवंशी देवींची उपस्थिती असायची.

पुढे डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर डॉ. एस. राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झाले. पण ते फार क्वचितचं राष्ट्रपती भवनाच्या शाळेत जात असतं. जरी ते एक शिक्षक होते. पण ते मुघल गार्डनमध्ये मुलांशी भरपूर चर्चा करायचे.

त्यांनतर डॉ. झाकीर हुसेन हे देशाचे तिसरे राष्ट्रपती बनले.  राष्ट्रपती भवनात राहणारी बरीच मंडळी सांगतात कि, डॉ. झाकीर हुसेन सतत विद्यार्थ्यांना शिकायचे. एवढचं नाही तर शाळेच्या बोर्डाचे निकाल आणखी चांगले यावेत, याकडेही ते लक्ष दयायचे. त्यांच्यातला शिक्षक नेहमी जिवंत असायचा.

डॉ. झाकीर हुसेन जामिया मिलिया इस्लामियाच्या संस्थापकांपैकी एक होते. दरम्यान, त्यांना राष्ट्रपती पदाचा आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. दरम्यान डॉ. हुसेन यांच्या पत्नी श्रीमती शाहजहाँ बेगम सुद्धा अधूनमधून शाळेत मुलांना भेटायला यायच्या.

भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही.व्ही गिरी जरी शाळेतल्या विद्यार्थ्यांना रेग्युलर शिकवायचे नाही.  पण ते आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सरस्वतीबाईं एखाद्या खास प्रसंगी राष्ट्रपती भावनातल्या मुलांना भेटायचे आशीर्वाद द्यायचे.

त्यांच्यापाठोपाठ डॉ.फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती म्हणून आले. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ते आणि त्यांची पत्नी बेगम आबिदा अहमद शाळेत जायचे, मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.

पुढे, एन. संजीव रेड्डी आणि त्यांची पत्नी श्रीमती नीलम नगरथन्म्मा या राष्ट्रपती भवनात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना भेटायचे, शिक्षक दिनानिमीत्त त्यांना भेटवस्तू द्यायचे. 

त्यांच्यानंतर ग्यानी झैल सिंह राष्ट्रपती झाले. त्यांना सुद्धा या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायला आवडायचं. पण त्यांच्या पत्नी प्रधान कौर फार क्वचितचं कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसायच्या.  वेकटरामन यांच्या पत्नी श्रीमती जानकी वेंकटरामन या सुद्धा फार कमी वेळा एखाद्या समारंभात दिसायच्या. पण, रामस्वामी वेकटरामन नेहमी शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटायच्या. डॉ. शंकर दयाल शर्मा सुद्धा अधूनमधून मुलांसोबत भेटत असायचे.

दरम्यान, डॉ. के.आर नारायणन हे देशाचे दहावे राष्ट्रपती. पण ते एकमेव राष्ट्रपती आहेत ज्यांनी किंवा त्यांची पत्नी उषा नारायणन या कधीही राष्ट्रपती भवनाच्या शाळेत गेल्या नाहीत.

त्यांनतर मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम जेव्हा देशाचे ११ वे राष्ट्रपती झाले. तेव्हा मात्र या राष्ट्रपती भवनातल्या शाळेचं भाग्य खुललं. ते नेहमी या शाळेत यायचे, मुलांचे वर्ग घ्यायचे. ते एक शास्त्रज्ञ असल्याने अर्थातच ते विज्ञान विषयावर ते जास्त भर दयायचे. शाळेत विज्ञानाच्या विविध पैलूंवर चर्चा व्हायची. 

त्यांनी मुलांना त्यांच्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले. तो मुलांना मुघल गार्डनमध्ये बोलवायचे आणि तिथल्या वेगवेगळ्या वृक्ष आणि फुलांच्या प्रजातींबद्दल संपूर्ण माहिती सांगायचे.

पुढे भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रतिभाताई पाटील शाळेत मुलांना शिकवायच्या नाहीत पण अधून- मधून त्यांची तिथं चक्कर असायची. शाळेतल्या प्रत्येक समारंभांत त्या हजार असायच्या.

२०१६ साली प्रणव मुखर्जी यांनी १० वी आणि १२ वी च्या ६० मुलांचा वर्ग घेतला. त्या वर्गात मुलांनी राष्ट्रपतींना लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्यावर अनेक प्रश्न विचारले. प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी स्वतः शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या सुद्धा नेहमी राष्ट्रपती भवनाच्या शाळेत जायच्या. 

 २०१९ मध्ये राष्ट्रपती भवताली शाळा केंद्रीय विद्यालयाला देण्यात आली

तर देशाचे सध्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद नेहमी डॉ राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात दिसतात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही त्यांनी विद्यालयात भेट दिली होती. त्यांच्यासोबत पत्नी सविता कोविंदही होत्या. दोघांनीही शाळेच्या प्रयोगशाळांना भेट देण्याबरोबरच प्राथमिक वर्गातील मुलांसोबत वेळ घालवला. त्यांनी मुलांसोबत अनौपचारिक विषयावर चर्चा केली.

दरम्यान, त्यांनतर कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली. ज्याच्या परिणामी गेल्या जवळपास दीड वर्षांपासून देशातील सगळ्या शाळा बंद आहेत.

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.