टिळकांनी जिच्यावर टीका केली होती ती रखमाबाई भारताची पहिली महिला डॉक्टर बनली.

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई राऊत. आज रखमाबाई राऊत यांची जयंती. मात्र रखमाबाई राऊतांची इतिहासानं उपेक्षा केली आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी यांचे नाव प्रामुख्याने घेतली जातात.

मात्र रखमाबाई राऊत यांचं नाव दुर्लक्षित होतं. आपल्यापैकी अनेकांना रखमाबाई राऊत यांच्याबद्दल सहसा जास्त माहित नाहीये.

खरं तर रखमाबाई याचं जीवन संघर्षमय. तेवढंच उर्जादायी.  महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्याचं मोठ्ठ्ं योगदान अन् सगळ्यासाठी एक आदर्श असं आहे.

रखमाबाई यांचा जन्म 1864 साली जर्नादन सावे आणि जयंतीबाई यांच्यापोटी मुंबईतील गोरेगाव इथं झाला. मात्र त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. तेव्हा आईचं वय अवघं 17 वर्ष होतं आणि पदरातल्या रखमाबाई फक्त दोन वर्षाच्या होत्या. जयंतीबाई मुलीला घेऊन आपल्या वडिलांकडे माहेराला आल्या.

रखमाबाईचे आजोबां हरिश्चंद्र चौधरी हे इंग्रज दरबारी नोकरीला होते. थोडेस आधुनिकतेकडे झुकलेले होते. त्यामुळे आपली मुलगी जंयतीबाई आणि नात रखमाबाईचं आयुष्य सुखात जावं म्हणून त्यांनी जंयताबाईंच्या पुर्नविवाह मुंबईतील डॉ. सखाराम राऊत यांच्याशी लावून दिला.

राऊत हे ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक होते. ते आधुनिक विचारसरणीचे होते. त्यामुळे डॉ. राऊतांनी छोट्या रखमाबाईंचासुद्धा स्वीकार केला व रखमाबाई ‘सावे’ऐवजी ‘राऊत’ झाल्या. त्यामुळे रखमाबाईवर त्यांच्या दुसऱ्या वडिलांचा मोठा प्रभाव पडला.

त्याकाळी बालविवाह करण्याची पद्धत होती. म्हणून रखमाबाईचं लग्ऩ अवघ्या 9 व्या वर्षी दादाजी ठाकूर यांच्याशी लावून दिलं. मात्र जो पर्यंत मुलगी वयात येत नाही तो पर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा होती. त्यामुळे वयात येईपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या.

1883 मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. आपला बालविवाह झाला आहे याला त्याचा विरोध होता. तसंच दादाजी ठाकूर श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा यांच्याकडे राहत होते.

त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला.

त्याकाळी असा नकार देणं म्हणजे खुप धाडसाचं कामं होतं. मात्र रखमाबाई यांच्या पाठीशी त्याचे दुसरे वडिल खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे दादाजी ठाकूर यांनी रखमाबाई विरोधात कोर्टात खटला भरला. न्यायाधिशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर

‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून रखमाबाईंच्या बाजूनं निर्णय दिला.

कोर्टाच्या या निर्णयावर अनेक वृत्तापत्रातून टीका केली गेली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली होती.

मात्र दादोजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. त्यामुळे या खटल्याकडं अनेकांचं लक्ष लागलं होतं. न्यायाधिशांनी हा निकाल रखमाबाईंच्या विरोधात दिला. त्यांना एका महिन्यांच्या आत नवऱ्यांच्या घरी राहण्यास जायचं सांगितलं. मात्र त्या ढळल्या नाहीत. खंबीरपणे लढत राहिल्या.

ऱखमाबाई यांनी बालविवाह पद्धतीवर भाष्य करणारी आणि परंपरेला नाकारणारी भुमिका स्पष्ट करणारी पत्र टाईम्स ऑफ इंडिया मधून लिहिली. त्यावेळी अनेक समाजसुधारक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

विदेशातील ‘लंडन टाइम्स’, ‘सेंट जेम्स् गॅझेट’ अशा अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून हा विषय गाजू लागला.

लंडन टाइम्स’चे बिशप ऑफ चाल्टरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व व्हॉइसरॉय ऑफ हिंदुस्थान ह्यांच्या कानावर ही बातमी घातली. परिणामी हा खटला प्रिव्ही कौन्सिलसमोर पुन्हा नव्याने चालविण्याचं ठरलं.

या खटल्याच्या खर्चासाठी प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापनाही केली. 

मात्र त्यानंतर रखमाबाई यांच्या पतीनं माघार घेतली. शेवटी रखमाबाईंशी चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की लग्नाचा व कोर्टाचा खर्च म्हणून रुपये 2000 दादाजींना देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचा. त्याप्रमाणे 5 जुलै 1888 मध्ये हा वाद मिटविण्यात आला.

त्यामुळे देशातील कायदेशीररित्या घटस्फोट घेणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या.

या खटल्यातून मुक्त झाल्यानंतर रखमाबाई वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लडला गेल्या. तिथलंच्या ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन’ या कॉलेजात प्रवेश घेतला. 1891 व 1892 मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला.

तेथे त्यांनी शवविच्छेदन व अॅनेस्थेशिया या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ हॉस्पिटलमध्ये मिडविफ्री व स्त्रीरोगतज्ञ हा शिक्षणक्रम पूर्ण केला. नॅशनल डेंटल हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण घेतलं. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन’ येथे त्यांनी परीक्षेत ऑनर्स मिळविला. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर 1894 मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

मात्र त्यावेळी लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता. रखमाबाई खचल्या नाहीत त्यांनी पुढील परीक्षेसाठी ‘जॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजस् ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरा’ येथे प्रवेश घेतला. तिथं परिक्षा देऊन त्या पास झाल्या.

1894 मध्ये डाॅ. रखमाबाई राऊत ह्या नावाने त्या भारतात परतल्या.

मुंबईत परतल्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात रखमाबाईंनी मुंबईतील ‘कामा’ हॉस्पिटलमधून केली. तिथे त्या हाऊस सर्जन होत्या. त्यानंतर काही काळ त्यांनी गुजरातमध्ये काम गेलं. 1896 मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘कैसर ए हिंद’ हा बहुमान दिला.

याआधी आनंदीबाई जोशी भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या होत्या. परंतु लगेचच आजारपणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्या डॉक्टरकी करू शकल्या नाहीत. मात्र रखमाबाईंनी  डॉक्टरकी केली आणि निभावलीही.

1917 मध्ये त्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. रखमाबाई आयुष्यभर अविवाहित राहिल्या. 

शेवटपर्यंत महिलांच्या हक्कासांठी त्यांच्या न्यायासाठी झटत राहिल्या, लढत राहिल्या. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर स्वत:ला वाहून घेणाऱ्या या रणरागिणीनं 1955 साली वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

स्रीशक्ती विचाराचं घोंगावणारं वादळ जरी शमलं असलं तरी येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्यांनी दिलेला लढा आदर्शवान आहे. उर्जेचा अखंड ज्योत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.