महाराष्ट्राच्या ऊसाच्या शेती मागचं खरं डोकं इथं आहे..

महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण हे उसाभोवती फिरतं हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. महाराष्ट्रात असणारे ऊस कारखाने, ऊस कामगारांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झडत असतात. पण आज जरा विषय वेगळाय म्हणजे जिथून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादनाला चालना मिळाली, उसाच्या जाती जिथून ठरवल्या जातात अशा केंद्राबद्दल आणि हे केंद्र सुरु करून शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणणाऱ्या माणसाबद्दल.

शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणि महाराष्ट्रात ऊसाला भाव मिळवून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. रघुनाथ दत्तात्रय रेगे.

सिंधुदुर्ग मध्ये जन्मलेल्या रघुनाथ रेगेंनी उच्च शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या ऊस पीक उत्पादनात मोठी क्रांती घडवून आणली. लंडन विद्यापीठाची पीएचडीची डिग्री मिळवून त्यांनी विपुल संशोधन करण्याचं कार्य सुरु केलं.

भारतात आल्यावर त्यांची पहिली नेमणूक झाली ती सिंधमधल्या सक्कर धरणावर. १९३२ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असं केंद्र उभारलं. ते म्हणजे फलटण मधील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र सूरु केलं. हे केंद्र महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणणारं ठरलं. 

डॉ.रेगे यांनी या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात उसाच्या पिकाचा सखोल अभ्यास केला. या केंद्रावर काम करत असताना त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या पिकाविषयी तक्रारी यायच्या. दुष्काळावर सिंचनाचा उपाय म्हणून मुठा कालवे व नीरा कालवे सुरू करण्यात आले, पण लवकरच जमिनी क्षारपिडीत होत व पाण्याच्या बारमाही वापरासाठी निवडलेले ऊस पीक तोट्यात जात आहे, पुंड्यासारख्या जाती खतामुळे लोळत व उत्पादनवाढ होत नाही अशा अनेक तक्रारी त्यांच्याकडे येऊ लागल्या.

रेगे यांनी उसाखालील जमिनींच्या प्रकारानुसार मुळांची वाढ, खत कोठे, किती व केव्हा घ्यावे, दिलेल्या खताचा ऊस पिकाकडून उपयोग वा निचऱ्यातून ऱ्हास, तसेच ऊस पिकाला पाणी किती लागते याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला व पडलेला पाऊस धरून ११५ एकर इंच पाणी १२ महिन्यांच्या पिकाला पुरेसे आहे असे सिद्ध केले.

या केंद्रात त्यांनी  लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, आंतरपिके, पाणी व  व्यवस्थापन, ठिबक व तुषारसिंचन पद्धती, तण व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जैविक खते, माती, पाणी व रसायनशास्त्र अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंबंधी मोलाचे संशोधन केले.

पुंड्या व इतर फुले येणाऱ्या व खताला प्रतिसाद न देणाऱ्या जातींवर डॉ.रेगेंनी प्रयोग केले गेले. नंतर कोईमतूर व हेन्नाळ (म्हैसूर) येथून नवीन सुधारित जाती येऊ लागल्या व त्यांची महाराष्ट्रासाठी योग्यतेची पडताळणी पाडेगाव केंद्रात सुरू करण्यात आली. त्यातून उपयुक्त सिद्ध झालेली सी.ओ. ४१९ ही जात डॉ. रेगे यांनी शिफारस केली व ती बरीच वर्षे दख्खन पाटबंधारे क्षेत्रात टिकून राहिली.

त्यांचे वैशिष्ट्य असे की, आपल्या संशोधनाचे निष्कर्ष ते साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करून तपासून घेत. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने व ऊस शेतकऱ्यांना पाडेगाव केंद्राच्या संशोधनाचा ऊस लागवडीत प्रत्यक्ष उपयोग व फायदा जाणवे व त्यामुळे त्यांनी केलेल्या छोट्या व मोठ्या शिफारशी शंका न घेता सर्वत्र कार्यान्वित होत.

या केंद्रामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्रातील ऊस लागवड व साखर कारखाने अग्रस्थानी राहिले व महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजत राहिले.

डॉ.रेगेंमुळे हि किमया झाली होती. १९४१मध्ये ब्रिटिश सरकारने डॉ. रेगे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रावबहादूर ही पदवी सन्मानाने बहाल केली.

ऊस उत्पादकांमध्ये घसट वाढावी, महाराष्ट्र ऊस उत्पादनात आघाडीवर जावा म्हणून डॉ.रेगेंनी ऊस उत्पादनाच्या स्पर्धा सुरु केल्या.  १९३१ पूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या ऊस पिकास शास्त्रीय बैठक देऊन व संशोधन करून ते संशोधन शेतकऱ्याला पोचवून ऊस पिकास महाराष्ट्रात भक्कम पायावर उभे केले.

१९५३ साली निवृत्त झाल्यावर पॅरी कंपनी (मद्रास) येथे ते सल्लागार म्हणून व ईस्टर्न शिपिंग कॉर्पोरेशनच्या वालचंद कारखान्यात १९६३पर्यंत कार्यरत राहिले. ऊसाच्या जाती शोधून त्यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे करता येईल ते ते संशोधन त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात डॉ.रेगेंचं नाव अगत्याने घेतलं जातं.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे देशात सगळ्यात महत्वाचं केंद्र मानलं जातं. देशभरातून शेतकरी या केंद्राला भेट द्यायला येतात.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.