डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर आपल्याचं विद्यार्थांचा थिसिस चोरीचा आरोप झाला होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
शिक्षणाची ज्योत पेटवणारे क्रांन्तिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासारख्या महामानवांच्या जयंतीला शिक्षण दिन साजरा करण्याचे सोडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याची काय गरज असा सर्वसामान्य प्रश्न दरवर्षी उपस्थित केला जातो.
या प्रश्नांच्या मागोमागं डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्याचं विद्यार्थांचा थिसिस चोरला होता असा आरोपही केली जातो. वर्षांनुवर्षें शिक्षक दिनाच्या दिवशी हा आरोप केला जातो.
वास्तविक हा वाद डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या भारतीय दर्शन या पुस्तकाच्या दूसऱ्या भागावरून निर्माण झालेला वाद आहे. भारतीय दर्शन चा दूसरा भाग राधाकृष्णन यांनी न लिहता जदुनाथ सिन्हा नावाच्या विद्यार्थांच्या थिसिसमधून चोरला होता आणि पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं अस सांगितलं जातं. जदुनाथ यांच पुस्तक आणि राधाकृष्णन यांच्या भारतीय दर्शनचा दूसरा भाग यांच्यामध्ये काहीही अंतर नाही हे देखील स्पष्ट आहे.
१९२० सालात कलकत्ता येथून मॉडर्न रिव्ह्यू नावाचे एक मासिक प्रकाशित होत असे. जानेवारी १९२९ साली या मासिकेत जदुनाथ सिन्हा नावाच्या विद्यार्थाने हा दावा केला होता. त्याने लिहलं होतं की,
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी साहित्यिक चोरी करत त्यांच्या थिसीसच्या प्रमुख भागावरच डल्ला मारला आहे. भारतीय दर्शनच्या दूसऱ्या भागामध्ये आपल्या थिसिसचा वापर करण्यात आला आहे.
त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या अंकातून याबाबत जदुनाथने पुरावे प्रसिद्ध केल्यानंतर हा वाद चिघळला.
त्यावर राधाकृष्णन यांनी उत्तर देताना लिहलं होतं की,
दोन्ही पूस्तकांचा विषय एकच असल्याकारणाने योगायोगाने सामग्री मिळतीजुळती आहे. त्यांच्या हे उत्तर फेब्रुवारी आणि मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
त्यानंतर ऑगस्ट १९२९ साली राधाकृष्णन यांच्यावर जदुनाथ यांनी केस दाखल केली. याला उत्तर म्हणून राधाकृष्णन यांनी देखील जदुनाथ आणि मॉडर्न रिव्ह्यूचे संपादक रामनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर केस दाखल केली. त्यानंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मध्यस्थी करत कोर्टच्या बाहेर हे प्रकरण मिटवलं.
जदुनाथ सिन्हा यांचा नेमका दावा काय होता.
जदुनाथ सिंन्हा प्रतिष्ठित लेखक होते. त्यांनी दर्शनशास्त्रात BA आणि MA केलं होतं. त्यांचा मुलगा अजीत कुमार सिन्हा यांच्या मते, जदुनाथ यांची प्रशंसा त्यांचे प्रत्येक शिक्षक करत असत. कलकत्ता विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन करताना त्यांना फिलीप सैम्युल स्मिथ आणि क्लिंट मेमोरियल पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं.
त्यानंतर ते कलकत्ताच्या रिपोन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागले. त्यावेळी त्यांच्याकडे MA ची डिग्री नव्हती. पुढे जाऊन त्यांनी पीएचडी साठी इंडियन सायकॉलॉजी ऑफ परसेप्शन हा विषय कलकत्ता विश्वविद्यालयात जमा केला.
ज्या शिक्षकांनी त्यांचा हा थिसिस पाहीला त्यामध्ये डॉ. राधाकृष्णन यांच्याशिवाय बीएन सील आणि कृष्णचंद्र भट्टाचार्य नावाचे दोन अन्य शिक्षक देखील होते. या थिसीस साठी जदुनाथ यांना माऊंट मेडल ने देखील सन्मानित करण्यात आलं. त्यापूर्वीच प्रोफेसर असणाऱ्या राधाकृष्णन यांची भारतीय दर्शन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं.
या संपूर्ण प्रकरणाबाबत ऑल इंडियाचे रेडिओ न्यूजचे संपादक महेंद्र यादव म्हणतात की राधाकृष्णन यांनी जाणूनबजूनच जदुनाथ यांचा थिसीस पास करायला वेळ लावला होता. व त्यापूर्वी त्यांनी आपला थिसीस ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रकाशित केला होता. राधाकृष्णन यांचा थिसिस ऑक्सफर्डमधून प्रकाशित झाल्यानंतरच त्यांनी जदुनाथ यांचा थिसिस पास केला.
त्यानंतर जदुनाथ यांनी २० डिसेंबर १९२८ साली मॉडर्न रिव्हूच्या संपादकांना पत्र लिहून या सर्व गोष्टी उघड केल्या.
राधाकृष्णन प्रसिद्ध व्यक्ती असल्याने ही गोष्ट हायप्रोफाईल झाली, त्यानंतर दोन्ही बाजूने केस कोर्टात दाखल करण्यात आली. राधाकृष्णन महत्वाचे व्यक्ती असल्याने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या गोष्टीत मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला.
महेद्र यादव यांच्या मते कोर्टाबाहेर तडजोड करुन जदुनाथ यांना १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अस ठरवण्यात आलं होतं.
त्यानंतर हे प्रकरण इतिहासाच्या पानात गुंडाळण्यात आलं. यानंतरच्या काळात १९३४ साली जदुनाथ यांना कलकत्ता विद्यापीठाने सन्मानित केलं. इंडियन सायकॉलॉजी : परसेप्शन ॲण्ड इंडियन रिएलिजम हे पुस्तक लंडन येथून प्रकाशित करण्यात आलं.
त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहली.
संदर्भ : महेंद्र यादव व स्क्रोल, सत्याग्रह
हे ही वाच भिडू
- देवा काहीही कर पण पुढच्या जन्मात मला शिक्षकाचा पोरगा करु नको.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !
- वेळेत चिठ्ठी मिळाली असती तर अल्बर्ट आइन्स्टाइन बनारस विद्यापीठात प्राध्यापक असते