जगातील सर्वश्रेष्ठ गणितीतज्ञाची थिएरी खोटी ठरवणारा मराठी संशोधक

अठराव्या शतकात रशियन साम्राज्यात एक लिओनार्ड ऑयलर नावाचा महान गणितज्ञ होऊन गेला. तो होता मूळचा स्वित्झर्लंडचा पण रशियाच्या दरबारात त्याला मानाचे स्थान होते.

त्याकाळी जगातला सर्वश्रेष्ठ गणितीतज्ञ म्हणून त्याला ओळखले जायचे.

आयुष्यभरात त्यांनी गणित विषयात सुमारे ५०० अभ्यासपूर्ण ग्रंथांची भर घातली. π, ℮, ∑, log x, sin x cos x आणि f(x) या सात संज्ञा गणितविश्वात प्रचारात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याने अनेक अवघड समीकरणे उकलली होती

एकदा रशियन झार म्हणजेच तिथल्या सम्राटाने त्याला एक कोडं घातलं,

“सहा वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये प्रत्येकी सहा अधिकारी आहेत. हे सर्व अधिकारी वेगवेगळ्या पदावर आहेत. या 36 अधिकारयांना परेड ग्राउंडवर चौरस पद्धतीने उभे करायचे आहे, ज्यात प्रत्येक रो आणि कॉलम मध्ये प्रत्येक रेजिमेंटचा व प्रत्येक रँकचा एक तरी अधिकारी असेल.”

यालाच ऑर्थोगोनल लॅटिन चौरस म्हणून ओळखतात. ऑयलरने गणिती समीकरण मांडून हे सिद्ध केलं की

‘४ ट + ३ या क्रमाचे दोन परस्पर जात्य लॅटिन चौरस अस्तित्वात असणे शक्य नाही’

हे अनुमान त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी एक वर्ष आधी म्हणजे १७८२ मध्ये काढले होते. विशेष म्हणजे हे संशोधन करताना त्यांना वृद्धापकाळाने अंधत्व आलेलं होतं.

leonhard euler

जवळपास दोनशे वर्ष यावर अनेक संशोधकांनी अभ्यास केला पण कोणाला ही हे कोडं सोडवता आले नाही.

१९५९ साली न्यूयॉर्क येथील अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीत एक प्रबंध सादर करण्यात आला. यात लॅटिन चौरसावरील प्रश्नांची उकल करण्यात आली होती. खुद्द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात पहिल्या पानावर ही बातमी झळकली होती.

जगभरातल्या गणितीविश्वात खळबळ उडवणारे हे संशोधन केलं होतं आर. सी. बोस, ई. टी. पार्कर आणि एस.एस.श्रीखंडे यांनी.

दोन व सहा क्रमांच्या जोड्या सोडल्या तर इतरांसाठी ऑयलर यांची थियरी खरी नाही हे त्यांनी सिद्ध केले.

खुद्द ऑयलरचा अनुमान खोटे ठरवणारे गणितीतज्ञ म्हणून हे तिघेही प्रसिद्ध झाले.

यातले एस.एस.श्रीखंडे उर्फ शरदचंद्र शंकर श्रीखंडे यांचा जन्म मध्यप्रदेशमधील सागर इथला. तिथेच त्यांचं शालेय शिक्षण झालं. लहानपणापासूनच त्यांना गणिताची आवड होती. गणितामुळेच त्यांनी अनेक शिष्यवृत्ती व अनेक पुरस्कार मिळवले होते.

नागपूर विद्यापीठात Pure amd Applied Mathematics आणि physics या विषयात सुवर्णपदक प्राप्त करीत बी. एस्सी. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली व त्यांनी नागपूर कॉलेज ऑफ सायन्स येथे गणित व संख्याशास्त्र या विषयांचे अध्यापन करू लागले.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने देशातील मूलभूत विषयातील संशोधन वाढावे यासाठी काही संशोधकांना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले. यात श्रीखंडे यांचा देखील समावेश होता.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना येथे त्यांची भेट डॉ. आर. सी. बोस यांच्याशी झाली, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीखंडे यांनी १९५० साली डॉक्टरेट मिळवली. तिथेच ते पुढे प्राध्यापक झाले.

mcms

डॉ. बोस व डॉ. श्रीखंडे यांनी एकत्र येऊन अनेक सिद्धांत मांडले.

चयन गणितातील आलेख उपपत्ती (Graph Theory) या अत्यंत महत्त्वाच्या विषयात डॉ. श्रीखंडे यांनी स्वत:चा असा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. १६ शिरोबिंदू (Vertices), ४८ कडा (Edges) आणि ६ डिग्री असलेला ‘स्ट्राँगली रेग्युलर ग्राफ’ त्यांनी शोधून काढला.

तो ‘श्रीखंडे ग्राफ’ या नावाने ओळखला जातो. 

१९६० नंतर डॉ. श्रीखंडे मायदेशी परत आले. भारतात असतांना अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत देखील त्यांनी आपले संशोधनकार्य जोमाने सुरू ठेवले. ते बनारस हिंदु विद्यापीठात ५ वर्षे गणिताचे प्राध्यापक होते.

डॉ. श्रीखंडे यांनी मुंबई विद्यापीठात गणित विभागाची स्थापना केली व तिथे १३ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम पाहिलं.

मुंबई विद्यापीठातील सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज् इन मॅथेमॅटिक्सचे ते संस्थापक आणि १९७८ मध्ये निवृत्त होईपर्यंत संचालकही होते. १९८३–८६ या काळात ते अहमदाबाद येथील मेहता रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक होते. इंडियन नॅशनल सायन्स अकादमी, इंडियन अकादमी ऑफ सायन्स तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स, अमेरिका यांचे ते फेलो होते.

त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वारसा चालवत मोठ्ठ नाव कमावलं.

अमेरिकेत बोस्टन येथे सायन्स म्युझियममध्ये गणित विभागात बोस आणि श्रीखंडे या जोडगोळीने ऑयलरच्या समस्येची केलेली उकल मोठय़ा दिमाखात मिरवताना दिसते.

नुकताच २१ एप्रिल २०२० रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०२ वर्षाचे होते. ते स्वतःला गणिताचा एक विद्यार्थी समजायचे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आकडेमोडीशी काडीमोड घेतला नाही.

भारतातील सर्वात महान गणितीतज्ञामध्ये त्यांचा समावेश होईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.