मान्सूनच्या अंदाजासाठी अमेरिकेवर अवलंबून असणाऱ्या भारताला डॉ. गोवारीकरांनी स्वावलंबी केलं

आपलं राजकारण, आपलं समाजकारण अगदी टाटा, अंबानीच्या बिझनेसपासून ते गल्लीतल्या एखाद्या पोरगीचं लग्न पण पाऊसावर अवलंबून असतय. 

म्हणजे कसं तर मान्सून योग्य असेल तर पिकपाणी उत्तम आणि पिकपाणी उत्तम असेल तर पुढची सगळी साखळी उत्तम. इतकं साधं गणित असतय. थोडक्यात सगळा भारत मान्सूनवर जगतो अस म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.

आत्ता हे सगळं शाळेतच शिकवलं जातं. पण आपल्याला शहाणपणा शिकवत नाहीत. म्हणजे कसं तर इतक्या सगळ्या गोष्टी मान्सूनवर अवलंबून असल्या तर यंदाचा पाऊस कसा असेल, किती असेल याचा अंदाज, संशोधनाची दिशा आपणाला शिकवली जातं नाही. शिकवायचं जावुदे आपणाला त्याचा काडीचाही फरक पडत नसतो.

आत्ता हे सगळं तुम्हाला का सांगतोय तर मान्सूनचा अंदाज लावण्याचं काम आपल्याकडे ३०-३२ वर्षांपासून होवू लागलं. त्यापूर्वी हा अंदाज लावण्याचं काम अमेरिकेतूनच चालायचं. 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गिल्बर्ट वॉकर नावाच्या अधिकाऱ्यानं देशाच्या तीन भागांसाठी स्वतंत्र अंदाज देणं सुरू केलं.

द्वीपकल्पीय भारत, ईशान्य भारत आणि वायव्य भारत असे ते तीन भाग होते.

कालांतराने अमेरिकेतील एका नावाजलेल्या विद्यापीठाने भारतातील हवामानाचे अंदाज वर्तवायला चालू केलं. हा अंदाज लावला की पूर्वीपासून भारताच्या पंतप्रधानांना थेट अमेरिकेतून पत्र पाठवून हा अंदाज सांगितला जात असे.

पण झालं अस की,

१९८५ आणि १९८६ साली या अमेरिकेच्या त्या नावाजलेल्या विद्यापीठाने दिलेला पावसाचा अंदाज साफ फसला.

या दोन्ही वर्षी भीषण दुष्काळ पडला. १९८७ सालीसुद्धा दुष्काळाने आपले रूप दाखवले.

अमेरिकेच्या भरोश्यावर मान्सूनचा अंदाज लावणं हा सपशेल गंडलेला कार्यक्रम होता. पण ही गोष्ट सर्वात प्रथम एका मराठी माणसाच्या लक्षात आली व त्यानेच मान्सूनचा योग्य अंदाज लावण्याची जबाबदारी उचलली.. 

या माणसाचं नाव म्हणजे,

डॉ. वसंत गोवारीकर

डॉ. वसंत गोवारीकर पुर्वी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम करत होते. त्या वेळी भारताच्या अवकाश संशोधन शास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले होते. १९६७ साली ते थुंबा येथे रुजू देखील झाले. पुढे १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले.

त्यानंतर म्हणजे १९८६ सालात महत्वाचा टर्निंग पॉईन्ट आला, 

१९८६ साली डॉ. गोवारीकर यांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार पदी नियुक्ती झाली. ‘मौसम विज्ञान विभाग’ हा विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा एक भाग आहे.

प्रथा-परंपरेप्रमाणे अमेरिकेतून भारताच्या पंतप्रधानांना मान्सूनचा अंदाज सांगणार पत्र १९८७ च्या मे महिन्यात आलं. यामध्ये १९८७ चा मान्सून चांगला होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र १९८७ च्या मान्सूनबद्दल अमेरिकेने वर्तवलेल्या अंदाजाबद्दल डॉ. गोवारीकर साशंक होते आणि दुर्दैवाने झालेही तसेच.

१९८७ चा मान्सून अमेरिकेच्या अंदाजाप्रमाणे चांगला होण्याचे सोडाच, सबंध शतकातील सर्वात वाईट अशा तीन मान्सूनपैकी तो एक ठरला..!

मान्सूनसारख्या महत्वाच्या गोष्टीवर अमेरिकेवर अवलंबुन असावं विशेष: म्हणजे इतका सपशेल गंडेल कार्यक्रम असताना त्यांच्या अंदाजावर विसंबून रहावं हे पटण्यासारखं नव्हतं.

त्यानंतर डॉ. गोवारीकर आणि त्यांची टिम कामाला लागली.

भारताचे हवामान खात्याचा इतिहास देखील शंभराहून अधिक वर्षाचा होता तसेच देशातल्या मान्सून अंदाजाची तंत्र विकसित करणारा हा जगातील पहिला देश होता. भारताच्या हवामानाविषयी शंभराहून अधिक वर्षांची साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध होती.

पण नेमके प्रारुप नव्हते. आता त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचे ठरले.

१९८८ च्या सुरुवातीला १६ (त्यावेळी १५) प्राचलांवर (पॅरामीटर) आधारित ‘मान्सून प्रारूप’ विकसित केले.

डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मार्गदर्शनाखाली पावसाचा अंदाज देण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे प्रारूप म्हणजे भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी विकसित केलेलं पहिले प्रारूप होते. त्यात पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. वाचस्पती थपलियाल यांचा प्रमुख वाटा होता.

विशिष्ट महिन्यांमध्ये या सोळा घटकांच्या नोंदी घेऊन त्यावरून भारतातल्या पावसाचा अंदाज बांधला जावू लागला.

यामध्ये अरबी समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्या पृष्ठभागाचे तापमान, युरेशियामध्ये होणारी बर्फवृष्टी, युरोपातले तापमान असे वेगवेगळे घटक विचारात घेतले गेले. प्रशांत महासागरात घडणाऱ्या ‘एल निनो’ परिणामाचा प्रभाव भारतातल्या पावसावर होतो, हे पहिल्यांदा या प्रारूपामध्ये लक्षात घेतले गेले.

पुढच्याच वर्षी पुन्हा अमेरिकेचे पत्र आले. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अमेरिकेने पुन्हा भाकित केले. १९८८ चा भारतातील मान्सून ‘अवर्षणापेक्षा बरा’ एवढाच होईल असे त्यांनी जाहीर केले.

याच्या अगदी बरोबर उलट डॉ. गोवारीकर यांचा ‘मान्सून प्रारूपा’वर आधारलेला अंदाज होता. आणि त्यांनी तो उघडपणे बोलूनही दाखविला.

पंतप्रधानांच्यासमोर त्यांनी विस्ताराने सादरही केला.

हवामान खात्याला हे सर्वच नवीन होते. त्यांच्या शंभराहून अधिक वर्षांच्या जीवनामध्ये एक नवीन इतिहास घडू लागला होता. कारण रात्रीच्या हिंदी व इंग्रजी बातम्यांच्या मधल्या वेळामध्ये १९८८ चा मान्सून उत्कृष्ट होणार असल्याचे मौसम विज्ञान विभागाने जाहिर केले.

साऱ्या देशाच्या साक्षीने एवढे स्पष्ट व निःसंदिग्ध विधान मौसम विज्ञान विभागाच्या पारंपरिक प्रतिमेत बसणार नाही याची डॉ. गोवारीकरांना जाणीव होती. पण विज्ञान हा अंतिमतेकडे जाणारा, न संपणारा शोध आहे असे म्हणत.

हवामान खाते वैज्ञानिक संकल्पनेवर आधारलेले होते. त्यानुसार त्यांच्या अंदाजामागची सर्व शास्त्रीय कारणे स्पष्टपणे देशासमोर मांडण्यात गैर काही नाही, हे त्यांच्या सहकाऱ्यांनाही पटले. दूरदर्शनच्या मोक्याच्या वेळात १९८८ चा मान्सून उत्कृष्ट होणार असल्याच्या डॉ. गोवारीकर यांच्या अंदाजामागचे वैज्ञानिक विश्लेषण सांगितले गेले.

अखेरीस दोन परस्परविरुद्ध अंदाजांमध्ये अडकलेला १९८८ चा मान्सून १ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकला. ठरलेल्या वेळात तो देशभर पसरला.

मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये जितका पाऊस सर्वसाधारणपणे पडतो, त्यापेक्षा जास्त पावसाने वेळच्या वेळी हजेरी लावली. मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजाप्रमाणे १९८८ चा मान्सून नुसताच उत्कृष्ट झाला नाही, तर या शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट मान्सूनपैकी तो एक ठरला. अमेरिकेचे भाकित पुन्हा एकदा चुकले.

तेव्हापासून आपल्या मान्सूनविषयी भाकित करणे अमेरिकेने सोडून दिले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनी याबद्दल हवामान खात्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

१९८८ ते २००१ अशी तेरा र्वष ‘गोवारीकर प्रारूप’ वापरून पावसाचा अंदाज दिला गेला आणि हा अंदाज अचूक ठरला.

पण, २००२ साली पडलेला दुष्काळ ओळखण्यात सोळा घटकांच्या प्रारूपाला अपयश आलं. त्यामुळे २००३ सालापासून पुन्हा नवं प्रारूप स्वीकारण्यात आलं. पण नंतर विकसित करण्यात आलेल्या प्रारूपांमध्ये देखील गोवारीकरांनी विकसित केलेल्या प्रारूपाचा आधार घेण्यात आला होता हे देखील तितकच महत्त्वाचं!

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.