तीन पैशाचा तमाशा ! एका आगळ्या वेगळ्या नजरेतून !!

पु. ल. देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. २०१९ हे त्यांच जन्मशताब्दी वर्ष. या अपूर्व योगायोगाच्या निमित्ताने  पु.लं.ना आदरांजली म्हणून वीणा ढोले आणि रश्मी पांढरे या निर्माती द्वयीन्नी सध्या महाराष्ट्रभर २२ यशस्वी प्रयोग करून गाजत असलेल्या त्यांच्या “अपूर्व मेघदूत” मधले काही दृष्टिहीन कलाकार आणि काही नवीन दृष्टिहीन कलाकार घेऊन त्यांच्या आरलीन संस्थेतर्फे “तीन पैशाचा तमाशा” या नाटकाची  एक सामाजिक उपक्रम म्हणून निर्मिती केली आहे. सावी फाऊंडेशन पुरस्कृत या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दृष्टी क्षीणतेपासून ते दृष्टी हीनतेपर्यंत दृष्टीदोष असणारे २७ अंध कलाकार काम करत असून संकल्पना आणि  दिग्दर्शन स्वागत यांचे आहे.

काही नाटकं आणि त्यांचे विषय कधीच कालबाह्य होत नाहीत. जगाच्या उगमापासून ते अंतापर्यंत कोणत्याही कालखंडात हे विषय तितकेच खरे असतात. काळ बदलला असे एकीकडे वाटत असतानाच काही मूलभूत मानवी स्वभाव आणि संकल्पना मात्र समाजात तशाच असलेल्या दिसतात. पु.ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक याच पठडीतील. इ.स. १९७८ सालचे हे नाटक आजही मनाला तितकेच  भिडते.

बर्टोल्ड ब्रेख्तच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ या जगप्रसिद्ध नाटकाचं पुलंनी केलेले मराठी रूपांतर म्हणजे “तीन पैशाचा तमाशा”. माणसांच्या दुनियेत सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी चालणारी अमानुषता, त्यातून होणाऱ्या दुःखाविषयीची सहानुभूती ह्या मूळ प्रवृत्तीतून उभी राहिलेली ही नाट्यकृती पु.लं.नी आपल्या खास शैलीत हसवत, गाणी गात आणि भेदक थट्टा करत लिहिली आहे.

हे नाटक करण्याची परवानगी पुलं तुम्हाला देणार नाहीत, पुलंनी परवानगी दिली तरी सुनीताबाई देणार नाहीत, भले भले ज्या नाटकाला हात लावण्याचे धाडस करीत नाहीत ते नाटक करण्याचा वेडेपणा करू नका.

असे सांगून नाट्य सृष्टीतील काही प्रस्थापितांनी एकोणीस वर्षांपूर्वी काही नाट्यवेड्या मंडळींच्या उत्साहावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला होता.

पण पुलंकडून नाटकाची रीतसर परवानगी मिळवून ९ मार्च २००० रोजी मुंबईत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ४४ दृष्टिहीन कलाकारांचा सहभाग असलेल्या “तीन पैशाचा तमाशा” नाटकाचा प्रयोग दिमाखात पार पडला. पण हा काही पहिला प्रयत्न नव्हता, स्वागत नावाचा एक ध्येयवेडा माणूस दृष्टीहीन कलाकारांना रंगभूमीवर आणण्याच्या जिद्दीने झपाटतो काय आणि ८८ दृष्टीहीन कलाकारांना घेऊन १९९७ साली ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ नावाचा नाट्यप्रयोग करतो काय.

राज्यात ठिकठिकाणी या नाटकाचे २६ प्रयोग झालेत, पुढे या नाटकाची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली. या उज्ज्वल यशापासून प्रेरणा घेऊन स्वागत यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’ हे पु. ल. देशपांडे यांचे संगीत-नृत्य नाटक, रंगभूमीवर आणले होते.

साधारण  १९७८-७९ साली थिएटरअकॅडमी, पुणे या संस्थेने जब्बार पटेल यांच्या दिग्ददर्शनाखाली डोळस कलाकारांना सामावणारा प्रयोग सादर केला होता. या नाटकात कुठेही आक्रस्ताळेपणा, बटबटीतपणा, उपदेशाचे डोस नाहीत आणि म्हणूनच कदाचित हे नाटक आपल्याला अंतर्मुख करते.

या नाटकाचे दिग्दर्शक स्वागत यांची भेट घेतली, तेव्हा ते या प्रवासबद्दल भरभरून बोलले.

डोळस व दृष्टिहीन कलाकारांपैकी दृष्टिहीन कलाकारांना दिग्दर्शन करताना अनेक अडचणी येतात. मुख्य म्हणजे त्यांना रंगमंच म्हणजे काय? मागचा पडदा, विंगा, प्रेक्षक कुठे आहेत, कोणत्या विंगेतून प्रवेश करायचा, कुठे जायचं, समोरचा कलाकार कुठे आणि किती अंतरावर आहे, रंगमंचावरील इतर कलाकार कुठे आहेत, कोणत्या वाक्याला कोणाकडे वळून बोलायचं, तो कलाकार उभा आहे की बसलेला आहे, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष स्पर्शाने समजावून सांगाव्या लागतात, स्वागत सर सांगत होते.

त्यानंतरची मोठी अडचण म्हणजे हातवाऱ्यांची! आपण जसे बोलताना हातवारे करतो, तसे दृष्टिहीन करीत नाहीत. त्यामुळे त्यांना कायिक अभिनयाचेही शिक्षण द्यावे लागते. प्रत्येक वाक्याच्या भावार्थाप्रमाणे हातांचा व बोटांचा वापर कसा करायचा, हे मी करून दाखवत होतो. मग ते माझ्या हाताला स्पर्श करून मी कसं केलं, हे चाचपडून पाहात व नंतर तसं करून दाखवत. नृत्याच्या बाबतीतही असेच स्पर्शाने शिकवावे लागते. परंतु या कलाकारांची आकलनक्षमता उत्तम असल्याने ते सर्व गोष्टी पटकन आत्मसात करू शकले.

एक मात्र नक्की, की दिग्दर्शक म्हणून तुमच्या नाटकाविषयीच्या संकल्पना अतिशय स्पष्ट लागतात. एखाद्या प्रसंगातल्या हालचाली ठरवल्यानंतर त्यात बदल करून चालत नाही. संपूर्ण नाटक दिग्दर्शकाने आधी ‘व्हिज्युलाईज’ करणे गरजेचे आहे. मी नाटकातील बारीकसारीक हलचालींचेही टिपण, आरेखन करतो. चित्रपटाचे जसे ‘शॉट डिव्हिजन’ करतात, तसे मी आधी नाटकाच्या प्रत्येक प्रसंगाचे, त्यातील प्रत्येक कलाकाराच्या प्रत्येक हालचालींचे आरेखन करतो. त्यामुळे कलाकारांचा गोंधळ होत नाही.

संगीत ही या नाटकाची खूप जमेची आणि तितकीच आव्हानाची बाब! हे आव्हान समर्थपणे पेलले आहे  गुणी तरुण संगीतकार बिपिन वर्तक यांनी. जे स्वतः दृष्टिहीन आहेत. संगीत संयोजनची जबाबदरी अरविंद हसबनीस यांनी सांभाळली आहे. यातील गाणी अरविंद हसबनीस,  शरयू दाते, शंतनू हेर्लेकर, बिपिन वर्तक, नलिनी कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांनी गायली आहेत. तर गुणी दृष्टिहीन गायक कलाकार अद्वैत मराठे आणि प्रवीण पाखरे हे पहिल्यांदाच रेकॉर्डिंग साठी गायले आहेत.

या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरच नव्हे तर जिथे जिथे मराठी नाट्य रसिक आहेत तिथे तिथे प्रयोग करण्याचा आणि त्यातून निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

 या २७ अंध कलाकारांचा “तीन पैशाचा तमाशा” चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी  १२.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होतो आहे. दृष्टीहीनांनी सादर केलेला प्रयोग डोळसपणे पाहण्यासाठी पुणेकर नाट्य रसिकानी ही संधी चुकवू नये.

  • मोनालिसा वैजयंती विश्वास

हे ही वाच भिडू.