केनियामधला दुष्काळ किती भयानक आहे, हे या जिराफांच्या फोटोवरुन समजतंय

जिराफ हा प्राणी म्हणलं की डोळ्यांसमोर डायरेक्ट बालपण येतं. भारतात न आढळणारा प्राणी म्हणून पुस्तकात अनेकदा त्याचं नाव लिहिलं. वह्यांच्या मागं ते ‘अमेझिंग फॅक्ट्स’ यायचं त्यातही सगळ्यात जास्त गोष्टी या जिराफाच्या नावावरच असायच्या.

म्हणजे जिराफाची उंची किती आहे, तो इतका उंच असला तरी व्हेजीटेरियन आहे. त्यांना काही दिवसांतून एकदाच पाणी प्यावं लागतं, ते झोपतातही उभ्यानंच आणि पिल्लांना जन्मही उभ्यानंच देतात. जिराफाचं पिल्लू जन्माला आल्यावर फक्त तासाभरात चालायला लागू शकतं. अशा कित्येक खऱ्या-खोट्या गोष्टी आपण वाचल्या, पाहिल्या आणि ऐकल्याही.

लहानपणच काय, तर हातात नुकताच मोबाईल आलेल्या वयातही लय लोकांनी जिराफ सेक्स उभं राहून करतात की कसं, हे पण सर्च केलंय. उगं ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय पॉईंट?

तर तो काय आपला विषय नाही. तुम्हाला जरा जिराफाची आठवण करून द्यावी म्हणून हे सगळं सांगितलं. आपला विषय एकदम गंभीर आहे. तो म्हणजे केनियामध्ये झालेली जिराफांची अवस्था.

केनियामध्ये सध्या दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची दाहकता एका फोटोमुळं समोर आली आहे. दुष्काळाचा त्रास जसा माणसांना सोसावा लागतो, तसा प्राण्यांनाही. माणूस तरी आपली समस्या किंवा त्रास बोलून दाखवू शकतो, तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन त्यावर उपाय काढू शकतो. पण मुक्या प्राण्यांना आपली स्थिती सांगताही येत नाही.

केनियामधल्या जिराफांची अवस्था एका फोटोमुळं समोर आली आहे. फोटोजर्नालिस्ट एड राम यांनी हा फोटो शेअर केला आहे, या फोटोत सहा जिराफांचं शव दिसतंय….

 

दी गार्डियन या वर्तमानपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार केनियामधल्या बोर-अल्गी अभयारण्यातला हा फोटो आहे. जिराफ जवळच्या कोरड्या झालेल्या पाणवठ्यामध्ये पाणी प्यायला गेले होते, मात्र पाणी कमी असल्यानं ते चिखलात अडकले. अन्न आणि पाणी नसल्यामुळं त्यांच्यात बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकदही नव्हती. त्यामुळं तिथं अडकूनच त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

केनियातल्या वेबसाईटनुसार या दुष्काळाचा सगळ्यात जास्त धोका जंगली प्राण्यांना आहे. कारण जंगलात पाणी आणि अन्नाची कमी आहे. त्यामुळं त्यांना या वातावरणात तग धरणं अवघड जातंय. प्राणीच नाही, तर पशुपालनावर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसलाय. जवळपास चार हजार जिराफांना आपले प्राण गमवावे लागल्याचा दुर्दैवी अंदाज वर्तवण्यात येतोय.

केनियातल्या दुष्काळाचा परिणाम जसा प्राण्यांना भोगावा लागतोय, तसा माणसांनाही. केनियाच्या उत्तर भागात सप्टेंबरपासून सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडलाय. साहजिकच पावसाशिवाय या भागात अतिशय भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांना उपासमारीलाही सामोरं जावं लागत आहे. संयुक्त राष्ट्रांनीही याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यानुसार, ‘अजूनही केनियामधल्या २९ लाख लोकांना मदतीची गरज आहे.’ 

त्यामुळं विपुल प्रमाणात अभयारण्य आणि वन्यजीव संपत्ती असणाऱ्या केनियामधून जंगली प्राणी, पशुपालनाचा व्यवसाय आणि काही प्रमाणात माणसंही या दुष्काळाच्या कचाट्यात सापडणार का? याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.