ठिबकचा शोध लावून या माणसानं फक्त इस्रायलचं नाही तर अख्या जगाचं माळरान हिरवगार केलं

इस्रायल. जगाचा नकाशा जरी एखाद्याचा हातात दिला तरी त्याला हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण हा देश मुळात आहेच इतका लहान. लोकसंख्येच्या दृष्टीनं बघायचं म्हंटलं तर मुंबईच्या निम्मा. ओढून-ताणून इथली लोकसंख्या १ कोटीच्या वर जाणार नाही. हे जरी खरं असलं तरी सामान्य भारतीयांना आणि शेतकऱ्यांना इस्रायल माहीत आहे. त्याचं कारण म्हणजे इथली प्रगतशील शेती.

आपल्या भारतातील अनेक शेतकरी इस्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर जाऊन आलेले तुम्हाला आढळतील. अगदी गावात एक म्हणाला तरी चालेल.

तसं बघितलं तर इस्त्रायल म्हणजे वैराण, खडकाळ जमीन होती. पण ज्यू लोकांनी याचं अक्षरशः नंदनवन बनवलं आहे. या देशांत फक्त ६ इंच पाऊस पडतो. काही भागांत तर अवघा १ इंच. तरीही तिथं पाण्याची कमतरता नाही. वाळवंटात त्यांनी शेती फुलवली. इस्त्रायल आज युरोपला फुलांची निर्यात करतं. या सगळ्या प्रगतीला कारणीभूत आहे इथल्या कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं अत्युच्च तंत्रज्ञान, आणि त्याला जगात तोड नाही हे आपल्याला मान्य करावचं लागतं.

इस्रायलनं जगाला दिलेलं असचं एक अत्युच्च तंत्रज्ञान म्हणजे ठिबक सिंचन.

तसं पाहिलं तर जगात ठिबक सिंचनाचा पहिला प्रयोग हा जर्मनीमध्ये झाला होता, पण तरी देखील याच क्रेडिट इस्रायलला जातं. त्याचं कारण म्हणजे या देशानं केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास.

त्याचं झालेलं असं कि १८६० सालात जर्मनीत काही शास्त्रज्ञ थेट पिकांच्या मुळाशी पाणी कसं देता येईल, यावर संशोधन करत होते. त्यावेळी या संशोधनातून त्यांनी पहिल्यांदा मातीच्या भाजलेल्या पाईपमधून सगळ्यात आधी पिकाला पाणी देण्याचा प्रयोग केला गेला.

त्यानंतर पुढे तब्बल ८० वर्षांनंतर म्हणजेच १९२० मध्ये लहान छिद्र असलेल्या मातीच्या पाईप पिकांना पाणी देण्यास वापरले गेले. त्यावेळीच मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या प्रा. ओ. ई. रोब यांनी अशा लहान छिद्राच्या मातीच्या पाइपमधून जमिनीखाली पाणी द्यायचा पहिला प्रयोग केला.

पण ते दिवस म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडांचे होते. जो तो देश एकमेकांविरोधात संघर्षासाठी उभा राहिला होता. या संघर्षातूनच जवळपास ३ दशक ठिबक सिंचनाच्या पुढच्या संशोधनाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं. पण पुढे दुसर्‍या महायुद्धानंतर प्लास्टिकच्या पाईपचा वापर सुरू झाला.

त्यावेळी इकडं भारतात पण सिमेंट पाईपद्वारे पाणी वाहून नेण्याची पद्धती वापरली जात होती.

१९४८ पर्यंत स्वतंत्र इस्त्रायलची घोषणा झाल्यावर युरोप, उत्तर आफ्रिका आणि अमेरिकेतून ज्यू एकवटले. पण ते लोक काही हाडाचे शेतकरीच होते असं अजिबात नव्हतं. त्यात पाण्याचा आभावं, तिन्ही बाजूंनी कडवी अरब राष्ट्र. अशा वेळी इथल्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना जमिनीची पहाणी, पेरणी, मशागत, पाणीपुरवठा कसा करायचा हे अशी सगळी मुळाक्षरापासून शिकवलं.

इस्त्रायलला आणि सोबतच जगाला ठिबक सिंचनाची देणगी दिली ती पेशाने इंजिनीअर असलेल्या शिम्सा ब्लॉस यांनी. १९३० च्या दरम्यान त्यांनी त्यावेळच्या इस्रायलमध्ये दक्षिणी नेगेव्ह वाळवंटात पाणीपुरवठा करणार्‍या इस्रायल नॅशनल वॉटर कंपनीची स्थापना केली होती. त्याच दरम्यान ते जॉर्डन व्हॅलीमध्ये आधुनिक जलवाहिनीवर काम करत होते.

त्यावेळी त्यांना एका शेतकऱ्याने आपण पाणी दिलं नसताना देखील झाड वाढल्याचं निदर्शनास आणून दिलं. ब्लॉस यांनी उत्सुकतेनं खणून बघितलं तर एक पाईप लिकेज होती आणि त्यामाध्यमातून झाडाला पाणी मिळतं होतं. त्यानंतर त्यांनी यावर शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासाला सुरुवात केली. जवळपास २ दशक त्यांचा अभ्यास सुरु होता.

१९४८ मधेय त्यांनी इंग्लंडमधून आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइप्स या प्रयोगासाठी विकत आणल्या, अखेरीस १९५० मध्ये त्यांना आपल्या प्रयोगाला यश आलं, आणि जगात आधुनिक ठिबक सिंचनाच्या युगाची सुरुवात झाली, त्यांनी आपल्या येश्यायाहू या मुलासोबत स्वतःची ठिबक सिंचनाचा सल्ला देणारी फर्म सुरु केली. मात्र अजून हि त्यांना हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करता आलं नव्हतं.

शिम्सा ब्लॉस यांनी हे यश मिळालं १९५२ मध्ये. त्यावर्षी त्यांनी पहिल्यांदा शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केलं की, झाडाच्या बुंध्यात कमी दाबानं थेंब थेंब पद्धतीने पाणी दिलं तर झाडाची वाढ अन्य सिंचन पद्धतीच्या तुलनेत त्वरेनं व अत्यंत जोमदार होते. या प्रयोगासाठी त्यांनी वाटणा हे पीक निवडलं होतं. याच जोडीला त्यांनी इतर कडधान्य, तेलबिया व फळझाडांवर देखील आपला प्रयोग चालवला होता.

१९५२ मध्येच ब्लॉस यांनी ठिबक सिंचन पद्धतीच्या या प्रयोगाचं जगात पहिल्यांदा पेटंट घेतले. पुढे ठिबक सिंचनासाठीच्या नेटाफिर्म या पहिल्या कंपनीची देखील सुरुवात केली. 

पुढे १९६३ मध्ये डॉ. के. डार्टर यांच्यासह त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी प्लास्टिकच्या नळ्यांच्या साह्याने ठिबक पद्धतीची रचना, डिझाईन करून निरनिराळ्या पद्धतीच्या तोट्यांवर संशोधन व प्रयोग केले. त्यात प्रत्येक तासाला किती पाणी झाडाला मिळावं याबाबत गणिती पद्धतीचा वापर करून तोट्यांची रचना केली व त्यावर प्रयोग केले.

त्याविषयी जवळपास शंभरावर संशोधनात्मक लेख लिहून ते सादरही करण्यात आले. इस्राईलमध्ये या रोपट्याची भराभर वाढ होऊन ते लवकरच ऑस्ट्रेलिया, अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत पसरले. १९७१ मध्ये इस्रायलच्या तेल अवीव शहरात ठिबक सिंचन पद्धतीबाबत आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्या वेळी जवळपास २४ प्रबंधांचे वाचन झाले.

पुढे १९८५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात अशीच एक आंतरराष्ट्रीय सिंचन परिषद झाली. त्यात सुमारे २५० प्रबंधांचे सादरीकरण झाले. विशेष म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीचा अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या स्मेल इरिगेशन कंपनीने खरा प्रसार केला.

भारतात या प्रयोगाचा विस्तार केला तो जळगावच्या भवरलाल जैन अर्थात जैन ग्रुपने

भवरलाल जैन यांनी अमेरिकेतील फ्रेस्नो येथे १९८४ साली हे ठिबक सिंचन हे तंत्रज्ञान पाहिले होते, त्यानंतर हे तंत्रज्ञान म्हणजे भारताला वरदान ठरेल या बाबत त्यांना शंका नव्हती. त्यांनी परत येतानाच सोबत ठिबकची पुस्तके, माहितीपत्रके, नमुने (नळ्या, तोट्या इ.) यांची शिदोरी घेऊन आले.

उद्योग समूहातील तांत्रिक सहकार्‍यांना याचा सखोल अभ्यास करायला लावला आणि १९८६ साली ऑस्ट्रेलियन कंपनी सोबत करार करून हे तंत्रज्ञान भारताच्या शेतीत प्रत्यक्ष उतरविले.

जैन यांनी फक्त हे ठिबक सिंचन आणलचं नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी हे ठिबक वापरण्याबद्दल प्रवृत्त केलं. जैन इरिगेशनच्या या ठिबक मुळे महाराष्ट्राच्याच नाही तर अख्या भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती झाली. ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानामुळे पिकाच्या उत्पादकतेत ४०% ते ५०% नी वाढ झाली.

पण हे आपल्याला मान्य करावंच लागेल कि ठिबकच्या या प्रयोगाने आज अख्ख्या जगातील शेती तग धरून राहिली आहे. कमी पाणी असले तरी आज ठिबक सिंचनामुळे शेतीतून उत्पन्न काढणे शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी पिकांना पाटचारी, दांडाने पाणी दिले जायचे. ठिबक संच हे फक्त मोजक्या शेतकर्‍याकडे असायचे; परंतु आजच्या स्थितीत बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनशिवाय शेती करू शकत नाहीत. ठिबक सिंचन काळाची गरज बनली आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.