पाच वर्षाचे युद्ध संपवणारे ड्रोग्बाचे ते पाच गोल…

“लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य…”

समजायला अतिशय सोपी मात्र त्या मार्गावरून चालायला लागलं कि तेवढीच अवघड अशी हि ‘लोकशाहीची’ संकल्पना. हुकूमशाही शासनप्रणालीला सर्वोत्तम पर्याय असणारी लोकशाही, लोकांच्याच डोळ्यादेखत व्यक्तिसापेक्ष होत गेली. राज्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे वरचे मुद्दे पटणार देखील नाहीत पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करावी लागेल कि ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक संस्थेवर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा प्रभाव असतोच.

अशा प्रदेशांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती देखील याच व्यक्तींच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. आता या लोकांची यादी करायची ठरवलं तरी समोर येणारी नावे अशी असतील कि ते ‘हिरो’ कमी आणि ‘व्हिलन’ म्हणूनच जास्त शोभून दिसतात.

पण आफ्रिकेतल्या आयव्हरी कोस्ट देशाला मात्र असा एक हिरो मिळाला, आपल्याकडील साऊथ च्या पिक्चर मध्ये असणाऱ्या लार्जर दॅन लाईफ हिरोंपेक्षा मोठा, ज्याने केलेल्या फक्त एका मिनिटाच्या आवाहनानंतर त्याच्या देशात चार वर्षांपासून सुरु असलेलं गृहयुद्ध थांबलं होत.

आणि विशेष म्हणजे हा हिरो कोणी राजकारणी, समाजकारणी वगैरे नव्हता तर तो होता एक फुटबॉलर, ब्रिटिश फॅन्सनी आतापर्यंत सर्वात जास्त डोक्यावर घेऊन मिरवलेला आफ्रिकन खेळाडू दिदिएर ड्रोग्बा.

फुटबॉलचा विषय निघाला कि मेस्सी आणि रोनाल्डोच्या गोल चे आकडे फेकून मारण्याच्या सध्याच्या काळात ड्रोग्बा फुटबॉलर म्हणून कितीजणांच्या लक्षात आहे किंवा पुढे त्याला कितीजण लक्षात ठेवतील हे माहित नाही पण फुटबॉल ग्राउंडच्या बाहेरचा ड्रोग्बा आपल्याला विसरून चालणार नाही. मँचेस्टर युनायटेडचा लिजेंड एरीक कँटोनाचा एक quote आहे , (नांगरे-पाटील आणि पाटेकरांसारखे फुटबॉल मधले पण बरेच quote कँटोनाच्या नावाने फिरवले जातात त्यामुळे रेफरन्स चुकला असला तर समजून घ्या),

Being a man is far more important than being a champion.

माझ्या मते या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरलेला ड्रोग्बा एकमेव खेळाडू असेल.

इंग्लिश प्रीमिअर मध्ये खेळलेल्या सर्वोत्तम फॉरवर्ड्स पैकी एक ड्रोग्बा होता.

रोमन अब्रामोविच रशियन ऑइल मनी लंडन मध्ये घेऊन आला आणि Chelsea फुटबॉल क्लबचं नशीब बदललं. 2004 मध्ये Chelsea ने ड्रोग्बाला साईन केले आणि पहिल्या सिजन पासूनच ड्रोग्बा क्लबचा पोस्टर बॉय बनला. याच वर्षी त्यांनी प्रीमिअर लीग जिंकली, चँपियन्स लीगच्या सेमीफायनल पर्यंत Chelsea ने मजल मारली. Chelsea कडून पहिलाच सिजन खेळणाऱ्या ड्रोग्बाने त्यावेळी 16 गोल केले होते. तिथून पुढच्या 8-9 वर्षात ड्रोग्बाने Chelsea च्या फॅन्सना सेलिब्रेट करण्याच्या अनेक संधी दिल्या.

Chelsea चा कुठलाच फॅन 2012 ची चॅम्पियन्स लीग विसरणार नाही, क्लबने जिंकलेली हि पहिली (आणि अजून तरी एकच आहे) चॅम्पियन्स लीग होती. ड्रोग्बा या लीगच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच होता. ड्रोग्बाचा 89 व्या मिनिटाचा इक्वलायजर आणि शेवटची विनिंग पेनल्टी संपूर्ण लंडन ने सेलिब्रेट केली होती.

ड्रोग्बा क्लब साठी जेवढा महत्वाचा होता त्यापेक्षा काकणभर जास्तच तो त्याच्या नॅशनल टीमसाठी महत्वाचा होता. देशाकडून फुटबॉल खेळणे बंद करून ड्रोग्बा ला तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी आजदेखील ड्रोग्बा आयव्हरी कोस्ट चा टॉप गोलस्कोरर आहे. ड्रोग्बाच्या कॅप्टन्सी मध्येच आयव्हरी कोस्ट पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाला.

जवळपास २० वर्षानंतर आयव्हरी कोस्टला आफ्रिकन कपचे विजेतेपद ड्रोग्बाने मिळवून दिले. फक्त आफ्रिकेतच नाही तर सगळ्या युरोप मध्ये आयव्हरी कोस्टला ओळख मिळाली होती आणि त्यामागे कारण एकच होत ड्रोग्बा. ड्रोग्बाचं क्लब आणि देशाकडूनचे फुटबॉल करिअर त्याला नॅशनल हिरो बनवायला पुरेसे आहे.

8 देशात खेळाला जाणारा ‘क्रिकेट वर्ल्ड कप’ जिंकून देशातील युवकांचे आयडॉल बनणारे खेळाडू आपल्याकडे असताना ड्रोग्बा त्यांचा नॅशनल हिरो बनण्यात काहीच अडचण नव्हती.

पण वरती उल्लेख केल्याप्रमाणे ड्रोग्बा फुटबॉलर म्हणून काय होता त्यापेक्षा त्याने माणूस म्हणून जे केले आहे त्यामुळे तो संपूर्ण आफ्रिकेचा हिरो बनला.

नार्कोज सिरीज बघताना नरेटर मार्खेज च्या Magical Realism चा उल्लेख करतो, त्याचं म्हणणं आहे कि Magical Realism बद्दल कोलंबियातून लिहलं जात कारण एस्कोबार ने आपल्या जीवनात अशा काही गोष्टी केल्या आहेत कि ज्या ऐकायला केवळ अशक्य वाटतात. ड्रोग्बा बाबतचे पण काही किस्से असे आहेत कि, प्रत्यक्ष जीवनात असं काही घडत असेल हे खरं वाटत नाही.

बहुतांश स्थलांतरित लोकांप्रमाणेच चांगल्या संधीच्या शोधात ड्रोग्बा वयाच्या 5 व्या वर्षी फ्रान्स ला आपल्या काकाकडे गेला. नैसर्गिक ऍथलिट असल्याने त्याला शाळेतूनच फुटबॉलच ट्रेनिंग मिळायला सुरुवात झाली. पण इतर खेळाडूंच्या तुलनेत जरा उशिराच म्हणजे वयाच्या 20 व्या वर्षी  ड्रोग्बाला प्रोफेशनल फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली.

फ्रान्स  मधल्या Guingmp, Marseille अशा क्लब्स कडून खेळायला सुरुवात करून पाचच वर्षात आपल्या टॅलेंट च्या जीवावर ड्रोग्बा Chelsea च्या नजरेत आला देखील होता. कोणत्याही फुटबॉलरच सर्वात मोठं असणार स्वप्न म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे, ते देखील ड्रोग्बाला फ्रान्स मध्ये राहूनच पूर्ण करता आलं असतं. फ्रान्स च नागरिकत्व स्वीकारून त्याला वर्ल्ड कप मध्ये भाग घेता आला असता. पण त्याने आयव्हरी कोस्ट मध्ये परतण्याचं ठरवलं.

ड्रोग्बा नॅशनल टीम मध्ये आला त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव असणारे दोनच खेळाडू टीम मध्ये होते. आजपर्यंत आयव्हरी कोस्टची टीम वर्ल्ड-कप साठी क्वालिफाय देखील झाली नव्हती, आफ्रिकन कप मध्ये साखळी फेरीच्या वरती टीम पोहचू शकत नव्हती. ना चांगल्या कोचचे मार्गदर्शन होते ना सपोर्टर्स म्हणून देशवासीयांचा पाठींबा मिळत होता.

जी अवस्था फुटबॉल टीमची होती तशीच अवस्था सध्या देशाची देखील झाली होती.

2002 पासून देशात गृहयुद्ध सुरु होत, सरकारविरुद्ध बंड पुकारलेल्या एका गटाने देशातील मुख्य शहरांवर ताबा मिळवला होता. सैनिकी कारवाईच्या जोरावर हि शहरे परत मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न चालला होता. आयव्हरीयन सैन्य आणि बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या युद्धात हजारो माणसे मृत्युमुखी पडली होती. एकाबाजूला गृहयुद्धात सामान्य माणसांचा बळी घेणारा देश अशी ओळख होत असताना ड्रोग्बा च्या निमित्ताने का होईना जगभरातल्या फुटबॉल चॅनेल्स वरती दिसणारा आपल्या देशाचा झेंडा आयव्हरी कोस्ट मधल्या लोकांना समाधान देत होता.

युरोपमध्ये ड्रोग्बाची लोकप्रियता त्याच्या घरच्या फॅन्स ना सुखावत होती. ड्रोग्बाच्याच अनुभवाच्या जोरावर नॅशनल टीम चा परफॉरमन्स देखील सुधारत होता. देश जरी दोन भागात विभागाला गेला असला तरी ड्रोग्बा युरोप मध्ये अजून आयव्हरी कोस्टचाच खेळाडू म्हणून ओळखला जात होता. नॅशनल टीम मध्ये देखील दोन्ही बाजूच्या खेळाडूंचा समावेश होता त्यामुळे या अराजकतेच्या काळात फुटबॉल हा एकच दुवा होता ज्याने देशाला जोडून ठेवलं होत.

2002 पासून गृहयुद्धात होरपळत असणाऱ्या आयव्हरी कोस्टला शेवटी जल्लोष करण्याची संधी फुटबॉलनेच दिली. 2006 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकप ची पात्रता फेरी सुरु होती, आयव्हरी कोस्ट ला पहिल्यांदाच वर्ल्ड कप मधला आपला सहभाग नजरेत दिसायला लागला होता.

8 ऑक्टोबर 2005 ला सुदान विरुद्ध आयव्हरी कोस्टचा वर्ल्ड कप मधील प्रवेश ठरवणारा महत्वाचा सामना होता. राजकीय नेत्यांपासून बंडखोरांपर्यंत सर्वजण टिव्ही समोर बसले होते आणि टीम ने पण त्यांना निराश केलं नाही सुदान वरती 3-1 असा विजय मिळवून आयव्हरी कोस्ट त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्ड कप साठी पात्र झाला. त्या दिवसासाठी का होईना देश युद्ध विसरून गेला होता.

सध्या देशाच्या झालेल्या वाटण्या विसरून संपूर्ण देश एकत्र येऊन आपला विजय सेलिब्रेट करत होता. आणि याच सेलिब्रेशनच एका ऐतिहासिक घटनेत रूपांतर करण्याचा निर्णय ड्रोग्बा ने घेतला.

आपल्या नॅशनल चॅनेलचा लाईव्ह कॅमेरा ड्रेसिंग रूम मध्ये बोलावून घेतला, स्वतःच्या हातात माईक घेतला आणि संपूर्ण टीमला सोबत घेऊन सगळ्या आयव्हरी कोस्ट ला आवाहन केलं,

“दोन्ही बाजूला विभागल्या गेलेल्या लोकांना आज आम्ही दाखवून दिल आहे कि आपण आतासुद्धा एकत्र राहू शकतो. समान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्रितरित्या ते साध्य करू शकतो. आजचा दिवस ज्याप्रमाणे आपल्या सर्वाना एकत्र घेऊन आला आहे तसाच जल्लोष आपण पुढे देखील करत राहू. आम्हाला शांततेत फुटबॉल खेळायचं आहे गोळ्यांच्या आवाजात नाही त्यामुळे सर्वांनी आपल्या हातातील शस्त्रे खाली ठेवा. देशात निवडणुका घ्या, सगळं काही ठीक होईल.”

गेले तीन वर्षे सुरु असलेल्या युद्धाला सगळेच कंटाळले होते फक्त गरज होती त्यांना कोणीतरी वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची आणि यासाठी सगळ्या देशाचा गळ्यातील ताईत असणाऱ्या ड्रोग्बा शिवाय योग्य व्यक्ती दुसरी कोणीही नव्हती. ड्रोग्बा आणि टीमच्या या आवाहनानंतर आठवड्याभरातच सरकार आणि बंडखोरांच्यात चर्चा सुरु झाल्या आणि दोन्ही गटांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर आयव्हरी कोस्ट मधलं युद्ध जरी तात्पुरतं थांबलं होत, तरी दोन्ही गटातील तणाव तसाच होता. हा तणाव कमी करण्याचा ड्रोग्बा चा प्रयत्न अजून सुरूच होता.

२००६ चा ‘आफ्रिकन प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार ड्रोग्बाला मिळाला.

आफ्रिकन फुटबॉल मधला हा सर्वात मोठा सन्मान होता, आपला हा आनंद त्याने देशवासीयांसोबत साजरा करायचं ठरवलं. पण यासाठी त्याने आयव्हरी कोस्ट च्या राजधानीच ठिकाण किंवा आपलं जन्मस्थान निवडलं नाही तर हि ट्रॉफी घेऊन ड्रोग्बा Bouake या शहरात गेला.

हे शहर सध्या बंडखोरांच हेडक्वार्टर होत, कोणत्याही राजकीय व्यक्तीला येथे प्रवेश नव्हता पण ड्रोग्बा ला त्यांनी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. ड्रोग्बाला बघण्यासाठी बरीच गर्दी जमा झाली होती आणि त्यांच्यासमोर ना तो स्वतः बद्दल बोलला ना त्याला मिळालेल्या ट्रॉफी बद्दल. बंडखोरांच्या गर्दीसमोर केलेल्या भाषणात पुन्हा एकदा त्याने आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची कशी गरज आहे हे पटवून दिल.

देशाच्या प्रगती आणि विकासासाठी युद्ध कायमस्वरूपी थांबण्याची गरज त्याने पटवून दिली. ड्रोग्बाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश मिळत होत, कोणत्याही क्रायसिस मिटवण्यासाठी गरज असणाऱ्या संवादाला सुरुवात झाली होती. पण यानंतर ड्रोग्बाने जे केले ते ना आजपर्यंत भल्याभल्या राजकीय डिप्लोमॅट जमलं होत ना शांती सेनेच्या नावाखाली येणाऱ्या सैन्यांना जमलं होत.

2007 मध्ये आयव्हरी कोस्ट विरुद्ध मादागास्कर हि ऑफिशिअल मॅच आयव्हरी कोस्ट मध्ये होणार होती. हि मॅच ड्रोग्बा ने  Bouake शहरात खेळायची ठरवली. बंडखोरांच्या राजधानीत स्वतः ड्रोग्बाने जाणं गोष्ट वेगळी होती, कारण त्याला तिथे कोणता धोका नव्हता.

दुसऱ्या देशाची टीम, मॅच बघायला येणारे दोन्ही बाजूंचे फॅन्स यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं अत्यंत जबाबदारीच काम होत. बऱ्याच लोकांचा या गोष्टीला सुरक्षेच्या दृष्टीने विरोध होता. पण ड्रोग्बाच्या मध्यस्थीमुळे सरकार आणि फुटबॉल फेडरेशन दोघेही या मॅच साठी तयार झाले. हि मॅच बघायला देशातील दोन्ही बाजूचे लोक आले होते. इतकंच नाही तर आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष आणि बंडखोरांचे प्रमुख दोघेही स्टेडियम वरती उपस्थित होते.

बहुतेक आजूबाजूला युद्ध सुरु नसताना भेटण्याची हि या नेत्यांची पहिलीच वेळ होती. हे नेते फक्त भेटलेच नाहीत तर स्टेडियम उपस्थित फॅन्स बरोबर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रगीत देखील गायले. या क्षणाला सर्वांच्याच लक्षात आलं होत कि आता हे गृहयुद्ध थांबणार. शेवटी 5-0 ने आयव्हरी कोस्ट मॅच जिंकली. या मॅच पेक्षा दुसऱ्या दिवशी आयव्हरी कोस्ट मधल्या एका पेपर ची हेडलाईन खूप महत्वाची होती ,

“पाच वर्षाचे युद्ध संपवणारे पाच गोल”

Screen Shot 2018 11 30 at 8.52.31 PM

वरील तिन्ही घटना एवढ्या विस्तृत मुद्दाम सांगितल्या आहेत, आयव्हरी कोस्ट मधील पहिलं गृहयुद्ध 2007 मध्ये संपलं. पुन्हा एकदा त्या देशाला युद्धाला तोंड द्यावं लागलं होत. पण या सगळ्या परिस्थितीत ड्रोग्बाने केलेला प्रयत्न आणि त्याला मिळालेले यश या गोष्टी केवळ अशक्य वाटणाऱ्या आहेत.

फक्त एका मिनिटाच्या आवाहानाने 5 वर्षाचे युद्ध थांबणे, एकमेकांचा जीव घेण्याची संधी शोधात असणाऱ्या माणसांना एका फुटबॉल मॅच साठी एकत्र आणून राष्ट्रगीत गायला लावणं या खरंच पिक्चर मध्ये शोभणाऱ्या गोष्टी आहेत.

एक माणूस तो हि खेळाडू देशातील सामाजिक परस्थितीवरती इतका प्रभाव पाडू शकतो हे कधी कधी पटत नाही. बरेच फुटबॉलर चॅरिटी करतात, ड्रोग्बा त्यात देखील मागे नाही. आज ड्रोग्बाच्या स्वतःच्या पैशाने चालत असलेली ५ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आयव्हरी कोस्ट मध्ये आहेत जिथला संपूर्ण उपचार मोफत आहे. पण त्याच्या चॅरिटी पेक्षा आयव्हरी कोस्ट आणि आफ्रिकेमध्ये शांतता टिकून राहावी म्हणून त्याने जे प्रयत्न केले आहेत, करत आहे त्यामुळे तो खरा चॅम्पियन ठरतो.

2010 चा फुटबॉल वर्ल्ड कप आफ्रिकेत होणार होता, पायाच्या इंज्युरी मुळे ड्रोग्बा त्या वर्ल्ड कप मध्ये खेळायची शक्यता कमी होती त्यावेळी खुद्द नेल्सन मंडेला नी ड्रोग्बा ची भेट घेऊन सांगितले होते,

“आफ्रिकेत होणारा वर्ल्ड कप तुझ्याशिवाय वर्ल्ड कप वाटत नाही.”

यावरून लक्षात येत कि फक्त आयव्हरी कोस्ट साठीच नाही तर ड्रोग्बा संपूर्ण आफ्रिकेचा हिरो होता. काही महिन्यापूर्वी तो रिटायर झाला.

द डार्क नाईट पिक्चर च्या शेवटी पोलीस ऑफिसर गॉर्डन बॅटमॅन कडे बघून आपल्या मुलाला सांगतो कि,

“he is the hero Gotham deserve”

ड्रोग्बा पण असाच हिरो आहे जो आयव्हरी कोस्ट डिजर्व करत होता.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.