जम्मूमध्ये झालेला पहिलाच ड्रोन हल्ला भारताच्या सुरक्षायंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय

रविवारी दहशतवाद्यांकडून जम्मूतल्या हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाला त्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाला सैन्य तळांवर हल्ला झाला आणि गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारचा ड्रोन हल्ल्याचा मार्ग दहशतवाद्यांनी प्रथमच वापरला आहे. त्यात जम्मूच्या जेंव्हा मिलिट्री स्टेशनवर रविवारी पहाटे ड्रोन दिसताच लष्काराकडून त्या ड्रोनवर फायरिंगही केली पण लागलीच ड्रोन गायब झालं.

सध्या लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु असून या ड्रोनचाही शोध घेत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे रडार बसवण्यात आले आहेत. हे रडार अगदी लहान पक्षाएवढ्या आकाराचा ड्रोनही शोधुन काढू शकतो. आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणेकडे इतकी अद्ययावत तंत्रज्ञान असूनही मग आपल्या नजरेला जम्मूमधील एअरबेसवर हल्ला केलेलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा मिलिट्री स्टेशनवर हल्ला केलेलं ड्रोन का दिसलं नाही ?

मागे झालेले २६/११ च्या हल्ल्यापासून ते पठाणकोट हवाई दलावर झालेला बेस हल्ला तसेच उरी येथील १२ ब्रिगेडच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यांपर्यंतच्या हल्ल्यातील माध्यम हे थेट किंवा आत्मघातकी बॉम्ब तसेच इतरही प्रकार होते.

परंतु काल-परवा झालेल्या हल्ल्यांचे माध्यम पाहता हे छोटी-छोटी ड्रोन शोधणे मात्र अवघड काम होऊन बसलंय.

अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही अशाप्रकारचे ड्रोन हल्ले होणे आणि त्याचाही मागोवा न मिळणे म्हणजे देशाची सुरक्षितता धोक्यात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणून विकसित केलेले ड्रोन आजकाल कुठेही अगदी सहजपणे मिळू शकतात.  शिवाय हल्लेखोरांसाठी स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे ड्रोन हल्ला आहे. कारण थेट हल्ला करणे खर्चिक असते आणि त्यात जोखीमही असते आणि मनुष्यबळ हि लागते. पण ड्रोन हल्ल्यांसाठी आणि त्याच्या ट्रेनिंगसाठी फार वेळही द्यावा लागत नाही.

ड्रोनला जवळपास ४० किमी अंतरावरून रिमोट कंट्रोल करता येते त्यामुळे हल्लेखोर नेमका सीमारेषेच्या आतून हे हल्ले घडवतोय का सीमारेषेच्या बाहेरून घडवतोय ते ही डिटेक्ट करायला यंत्रणेला वेळ लागू शकतो. त्यामुळे तेवढ्या त्या कालावधीत ते रडारच्या नजरेतून सुटण्याचा धोकाही  असतो. त्यामुळे, यापुढेही दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.

त्यामुळे मनुष्याने संशोधन केलेले तंत्रज्ञान आता त्याच्याच सुरक्षिततेला आव्हान देतंय असं म्हणायला हरकत नाही.

जरी ड्रोन्सच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञानाचा मार्ग अस्तित्त्वात आहे पण जर  ते जीपीएस द्वारे चालवले जात असतील तरच . त्यामुळे हे ड्रोन सीमारेषेच्या बाहेरून सोडण्यात आले कि आतून, त्याचा रूट कोणता होता हे अजून शोधता आले नाही.

आणि जर ड्रोन सीमेपलिकडूनच आले असतील, रात्रीच्या वेळी स्फोटके टाकून ड्रोन पुन्हा सीमेपलिकडे गेले असतील किंवा मग एखाद्या ठिकाणी उतरले असतील तर मग ते रडार यंत्रणेच्या नजरेतूनही ते कसे सुटले, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

कारण ज्या-ज्या भागात हे ड्रोन हल्ले झाले तिथे अनेक महत्वाची कार्यालये आहेत. तसंच या हल्यावरून प्रतीत होतं कि शत्रूने सैन्य तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचं तर स्पष्ट झालंच परंतु त्यांनी या  स्फोटाच्या माध्यमातून जम्मू परिसरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलं आहे.

एअरफोर्सच्या बेसवर झालेले हल्ले हे ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे यामागे जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२००३ मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननुसार लाहोरमध्ये मेरीलँडचा रहिवासी अली असद चांदिया याने लष्कराला ड्रोन, नाईट-व्हिजन उपकरणे आणि वायरलेस व्हिडिओ कॅमेरे खरेदी करण्यास मदत केली. हे ड्रोन मात्र घुसखोरीच्या मार्गांच्या पाहणीसाठी  होते अशी माहिती मिळाली होती.

तसच सुरक्षा यंत्रणांना याचीही माहिती मिळाली होती कि, काहीच महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हिज्बुल मुजाहिदीनच्या मदतीनं पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीनं काही ड्रोन आणले आहेत.

त्यावेळी एक ५/६ किलो वजनाचा एक आयईडी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जप्त केला होता.

आणि मग या हालचालींवरून असा संशय दाट होत गेला कि, ड्रोन बनवण्याचं सुट्टं साहित्य छुप्या मार्गाने जम्मू काश्मीर परिसरात आणून त्याचा वापर हा हल्ल्यासाठी केला जाऊ शकतो. मग इतके ठोस पुरावे आणि माहिती असतांनाही आपण हे हल्ले टाळू शकलो नाही. तसंच शत्रुंसाठी हे हल्ले केवळ एक प्रयोग असू शकेल आणि यानंतर या स्वस्त आणि सोप्या मार्गाने अजूनही अनेक हल्ले करण्याच्या तयारीत हल्लेखोर असतील आणि हे हल्ले रोखण्यात आपण कितपत यशस्वी होतो हे आपल्या सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.