गुजरातमध्ये भाजीवाल्याकडं ३५० किलो ड्रग्ज घावलेत आणि कनेक्शन लागतंय पाकिस्तानशी

महाराष्ट्रातलं वातावरण तापलंय ते ड्रग्जमुळं. आता आर्यन खाननं ड्रग्ज घेतले की नाही, हे फिक्समध्ये कळणं राहिलं बाजूला आणि दुसराच दंगा सुरू झाला. दोन्हीकडून बॉम्बबाजी सुरू झाली आणि ड्रग्ज हा शब्द सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला.

आता पुन्हा एकदा वातावरणाला तडका बसणार आहे आणि कारण मात्र सेमच आहे, ड्रग्ज. विषय काय झालाय, तर गुजरातमध्ये एका भाजीवाल्याकडं ड्रग्ज घावलेत, आणि थोडेथिडके नाय तर ३५० किलो ड्रग्ज.

यात महाराष्ट्राची पण लिंक आहे भिडू, कारण हा जो भाजीवाला कार्यकर्ता आहे तो आहे मुंब्र्याचा. त्याच्याकडं तब्बल १७ किलो मेफेड्रोन आणि हेरॉईन सापडलंय. देवभूमी द्वारका पोलिसांनी ही कारवाई केली असून सापडलेल्या ड्रग्जची किंमत आहे तब्बल ८८ कोटी २५ लाख. पोलिसांनी या आरोपीकडून १९ पाकिटं, तर आणखी दोघांना अटक करून त्यांच्याकडची ४७ पाकिटं जप्त केली आहेत.

पोलिस काय म्हणतायत?

राजकोट रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप सिंह म्हणाले, ‘ड्रग्ज प्रकरणात ४४ वर्षीय आरोपी शेहजाद घोषीला अटक करण्यात आली आहे. तो महाराष्ट्रातल्या ठाण्याचा रहिवासी आहे. तीनच दिवसांपूर्वी तो खंभालियामधल्या आरती गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. त्याची हालचाल संशयास्पद असल्याच टिप आम्हाला मिळाली. ड्रग्ज घेतल्यानंतर, तो पुन्हा ठाण्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत होता, तेव्हाच आम्ही त्याला ताब्यात घेतलं.’

‘त्याच्या बॅगेत एकूण १९ पाकिटं सापडली. ज्यात ११ किलो हेरॉईन आणि ६ किलो मेफेड्रोन होतं. याची बाजारातली एकूण किंमत ८८ कोटी २५ लाख इतकी आहे. शेहजादवर याआधी एक हत्येचा गुन्हाही दाखल झालेला आहे. त्याच्या चौकशीनंतर आणि दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे ड्रग्जची ४७ पाकिटं सापडली. त्यांना हे ड्रग्ज पाकिस्तानमार्गे मिळाल्याचा आम्हाला संशय आहे,’ अशी माहितीही पोलिसांनी दिली.

आता यावरून राजकारण तर तापणार ना शेठ-

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट एनसीबीलाच लक्ष्य केलंय. ते म्हणाले, ‘द्वारकेत ड्रग्ज सापडणं ही चिंतेची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी एक ग्रॅम, अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम वगैरे ड्रग्ज पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली आहे, त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा.’

‘याआधीही गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते, तेही साधारण २५ ते ३० हजार कोटींचे. आता त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो ड्रग्ज सापडलेत, त्याची किंमत १०० कोटींच्या आसपास आहे. आता त्यामध्ये गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील तर त्या लोकांनी पाहावं आता. गुजरातमध्ये एनसीबीचं पथक नक्की काय काम करतंय, हे सुद्धा देशाला कळावं,’ असंही राऊत म्हणाले.

त्यामुळं आता तपासात आणखी कुणाचं नाव सापडतंय का? आणि ड्रग्ज प्रकरणाची लिंक खरंच पाकिस्तानशी लागतेय का? याकडं सगळ्या देशाचं आणि विशेषतः मुंबईचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.