आपल्याकडे जसा श्रावण असतोय तसा ब्रिटन मध्ये ड्राय जानेवारी असतोय भिडू!

दारुबद्दल मी काय लिहावं गड्यांनो ! माझं आणि दारूचं नातं जर सांगायचंच झालं ना तर ‘जरा पावशेर मारुन, मी लिहितो भरभरुन’ असं काहीसं आहे ते. तिच्यावर कमी लिहणं म्हणजे दारुचा आणि पिणार्‍याचा तो अपमान केल्यासारख आहे.

त्यात आणि मागच्या चार वर्षात नवीन वर्षाचा जानेवारी महिना सुद्धा दारूचा अपमान करायला लागलाय. #DryJanuary च्या नावाखाली. आपल्या भारतीय तळीरामांना याविषयी काही माहीत नसेल म्हणून सांगतो.

तर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक चॅलेंज इंटरनेटवर सुरु झालं होतं ते म्हणजे DryJanuary. तसं लोकांनी तिकडं ढुंकून बघायला नाही. पण आपलं मीच जाऊन बघितलं काय विषय आहे म्हणून. जरा वैच शोधलं तर कळलं कि नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारू सोडायचा लोकांनी प्रण करायचा असतो म्हणून.

आता याच्या मागचा ठावठिकाणा शोधला तर समजतं हे खुळ हल्लीहल्ली म्हणजे मागच्या चार वर्षात दर जानेवारीला सुरू होत. आता ते बंद बी लगेच पडतंय म्हणा. पण लोकांनी उभ्यानं दावा ठोकलाय की या चॅलेंजमुळे दारु सुटतीय.

तर २०१४ मध्ये जेव्हा ब्रिटनच्या लोकांना दुसऱ्यांच्या कुचाळक्या करुन, इतरांची माप काढून जो वेळ शिल्लक राहिला होता त्यात त्यांनी हे चॅलेंज आणलं. थंडी पासून रक्षण करण्याच्या नावाखाली ब्रिटिशांनी दारु प्यायला सुरुवात केली. पुढं हाय क्लास ड्रिंक म्हणून गरीब भारतीयांच्या गळी दारू उतरवून आता या ब्रिटिश लोकांना वाटलं की आपण सतमार्गाला लागलं पाहिजे. म्हणून त्यांनी हे चॅलेंज सुरु केलं.

त्याचा परिणाम इंटरनेटच्या आणि  #DryJanuary हॅशटॅगच्या जोरावर अखिल ब्रिटिश पेताड्या संघटनांनी दारू सोडण्याचा निर्धार केला. त्यांनी आख्खा जानेवारी महिना सुखा सुखा म्हणजे दारू न पिता घालवला. २०१४ मध्ये ब्रिटनच्या १७००० एवढ्या लोकांनी जानेवारी महिन्यात दारू पिली नाही. दारु न पिल्यामुळे म्हणे ७२% लोकांची दारू सुटली.

त्यामुळे हा ड्राय जानेवारी महिना ब्रिटन मध्ये ट्रेडमार्क झाला ओ. या महिन्यात ब्रिटनचे लोक दारूला शिवत पण नाहीत. आपल्याकडचे लोक श्रावण पण एवढा कडक पाळत नसतील तेवढा तिथं जानेवारी महिना कडक पाळला जातोय.

आता याचे फायदे काय ?

तर यूनिवर्सिटी ऑफ ससेक्स यांच्या एका रिसर्चनुसार, तुम्ही रोज दारु पीत असाल तर पहिल्या आठवड्यात तुम्ही पुन्हा दारु पिण्याची शक्यता आहे. दारू पिण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. जर कोणी एका आठवड्यामध्ये दारू पीत नाही त्याला जाणवेल की त्याची झोपण्याच्या वेळेत बदल झाला आहे.

आता दुसऱ्या आठवड्यात दारू सोडल्यामुळे तुम्हाला चांगली झोप आणि हायड्रेट राहण्याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला उत्साही असल्याचे जाणवेल आणि तुमची स्कीन जी आधी सुजल्यासारखी दिसत होती ती चांगली दिसेल. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसेडिटीची समस्या असेल तर ती दोन आठवड्यात ठीक होईल.

तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा बीपी कमी होऊ लागेल आणि स्थिर होत जाईल. इतकेच नव्हे तर तुमच्या खूप कॅलरीज् देखील कमी होतील ज्यामुळे तुम्ही खूप बारीक दिसण्यासोबतच फिट देखील रहाल. ६ ग्लास वाईन पिण्यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये ३००० कॅलरीज वाढतात.

चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यात तुमची स्किन खूप चांगली होईल, ती आधी पेक्षा चांगली दिसू लागेल. चेहऱ्यावरील एक्ने आणि ड्रायनेस कमी होईल. इतकेच नाही, जर तुम्ही रोज दारू पिणारी व्यक्ती असाल तर तुमचे खूप पैसे देखील वाचतीलय. तुमचा मूड चांगला होईल आणि उर्जा असल्याचे जाणवेल.

मग हे चॅलेंज व्हायरल झालं आणि भारतात आलं ! आता आमच्याकडे श्रावण, दिवाळी, दसरा काय कमी म्हणून जानेवारी पण छळायला आला. पण भिडूनो, मी काय जानेवारी पाळणार नाही कारण,

दारु मला सोडत नाही,
मी दारुला सोडत नाही.
आमचं नातं आम्ही जपू आयुष्यभर
संपेल ते फक्त सरणावर गेल्यावर
मित्रांनो पोचवाल मला
चार खांद्यावरुन प्रवासाला
दोन बाटल्या भरलेल्या
असु द्या माझ्या सोबतीला !

Leave A Reply

Your email address will not be published.