डीएसके यांच्या प्रामाणिकपणाचा एक किस्सा 

डीएसके म्हणजे घराला घरपण देणारी माणसं. अगदी सामान्य घरातून समोर आलेले बिल्डर म्हणून पुण्यात एकेकाळी डी.एस.कुलकर्णी यांची ओळख करुन दिली जात होती. त्यानंतर दिवस फिरले. घराचे वासे फिरले आणि डी.एस. कुलकर्णी यांच्यावर वाईट वेळ आली. 

त्यांच्या खऱ्याखोट्याचं प्रमाणपत्र न्यायलय देईलच त्याबाबत आपण बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, तुर्तास हा किस्सा जूना आहे पण तितकाच खरा आहे. 

घरातील फोन स्वच्छ करुन त्यावर सुगंधी पट्टी लावून फोनमधून सुगंध निर्माण करणारी माणसं अशी टेलिस्मेल नावाची त्यांनी कंपनी सुरवातीला काढली होती. ही कंपनी बऱ्यापैकी नावारूपाला आली. त्यानंतर मिळेल ते काम करणं हे डी.एस. कुलकर्णी यांचा पिंड झाला.

कालांतराने म्हणजे १९८० च्या दरम्यान रास्ता पेठेतील एक जळका वाडा त्यांनी विकत घेतला. लोक या वाड्याला भूताचा वाडा म्हणत असत. असा वाडा घेवून त्यांवर अश्विनी टॉवर्सची निर्मीती करत डी.एस. कुलकर्णी यांनी डी.एस. कुलकर्णी ॲण्ड कंपनीचा मुहूर्त आखला. 

त्यानंतरच्या काळात पुण्यातील विश्वासू बिल्डर अशी ओळख त्यांना मिळत गेली. तोपर्यन्त तरी डी.एस.के यांनी कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये हात घातला नव्हता. 

कालांतराने कोथरुडमध्ये चंद्रलोकनगरी उभारली. वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू झाले अशाच काळात त्यांची नजर पुण्याच्या दूरवर असणाऱ्या डोंगररांगावर गेली. सिंहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या हिरव्यागार निसर्गरम्य टेकडावर विश्व निर्माण करण्याचा प्रोजेक्ट मनात आला आणि डी.एस.के. विश्वचा पाया रचण्यात आला. 

धायरीतून पुढे गेल्यानंतरच्या या भागात त्या काळात डेव्हलपमेंट झाली नव्हती. संपुर्ण हिरवागार असा हा भाग होता. जागेचा भाव कमी असल्याने इथे विश्व निर्माण करुन मध्यमवर्गीयांना परवडणारी उच्च श्रेणीतील घरे बांधता येतील अशी योजना आखण्यात आली. 

डीएसके यांच्या या योजनेला मात्र अनेकांचा आक्षेप होता.

पुण्यातून इतक्या दूरवर लोक रहायला येणार नाहीत असे सर्वसाधारण मत होते. जवळ बाजार नाही, दवाखाना नाही, शाळा नाही अशा अनेक समस्या होत्या तेव्हा इथेच सर्व गोष्टी उभा करायच्या अशी त्यांनी संकल्पना मांडली होती. 

१३० एकरांमध्ये हा प्रोजेक्ट पसरला होता. डीएसके विश्वची निर्मीती या सर्व अडथळ्यांना पार करून करण्यात आली. इथले फ्लॅट खपावेत म्हणून वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या. 

जंगली रोडवर असणाऱ्या ऑफिसमध्ये ग्राहक फ्लॅटच्या चौकशीसाठी येत असत. तिथून डिएसके यांच्या बसमधून त्यांना धायरीच्या पुढे असणाऱ्या डिएसके विश्व या प्रोजेक्ट साईडवर नेले जात असे. जाताना बसमध्ये डिएसके विश्वची चित्रफीत दाखवली जात असे. यामुळे ग्राहकांना प्लॅट पसंत पडू लागले. 

प्लॅट बुक करणाऱ्या पहिल्या २२०० ग्राहकांसाठी 1 BHK 3.5 लाख तर 2 BHK 4.5 लाखात  स्कीम आणण्यात आली. एका आठवड्यात विक्रमी अशी १,००० प्लॅटचे बुकींग डिएसके यांनी करुन दाखवले होते. 

याच काळात डीएसके विश्वच्या गृहप्रकल्प विक्री मोहिमेत त्यांनी प्लॅट बुक करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू केली. विशिष्ट दिवसात प्लॅट बुक करणाऱ्या लकी ड्रा सोडतप्रमाणे आकर्षक बक्षीस देणारी ही योजना होती. 

मात्र अशी बक्षिसे प्लॅट बुक झाल्यानंतर मिळणार का? हमखास बक्षीसच्या नावे फसवणूक तर होणार नाही असे प्रश्न बुकींग करणाऱ्यांच्या मनात असत. कार, बाईक, वाशिंग मशीन अशी बक्षीसांची जंत्री होती.

या बक्षीसांची एकूण किंमत २.५ कोटींच्या घरात जात होती. 

ग्राहकांचा विश्वास बसावा म्हणून DSK यांनी 2.5 कोटींचा चेक पुण्यातील ग्राहकांचे हितसंबधं जोपासणाऱ्या ग्राहक पेठेकडे सुपूर्त केला. एखाद्याला घोषीत झालेले बक्षीस DSK यांच्याकडून मिळाले नाही तर तो व्यक्ती ग्राहक पेठेत जावून हे बक्षीस घेवू शकत होता.

ही बक्षीसे राखीव ठेवलेल्या 2.5 कोटींच्या चेकमधून देण्याचे अधिकार ग्राहक पेठेकडे देण्यात आले होते. 

ठरल्याप्रमाणे सर्व प्लॅट धारकांना DSK यांच्याकडून बक्षीस मिळाले. इतक्या ग्राहकांपैकी एकही व्यक्ती मला DSK यांच्याकडून बक्षीस मिळाले नाही म्हणून ग्राहक पेठेकडे गेला नाही. सुमारे तीन वर्ष झाली आणि हा चेक तसाच राहिला. 

चेक परत देण्याची वेळ आली तेव्हा ग्राहक पेठेने डीएसके यांच्या प्रामाणिकपणाचा जाहीर सत्कार करण्याचे नियोजन केले. ग्राहक पेठेचे प्रमुख बिंधुमाधव जोशी यांनी जाहीर कार्यक्रमात डीएसके यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व सकाळचे प्रतापराव पवार यांच्या हस्ते अडीच कोटींचा चेक DSK यांना परत करण्यात आला. 

संदर्भ : शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके (उत्कर्ष प्रकाशन, लेखक प्राचार्य श्याम भुर्के) 

हे ही वाच भिडू.

5 Comments
 1. Upen says

  ३५ वर्षे ज्या माणसाने डिपॉझिट धारकांना न चुकता दर महा व्याज व मुद्दल परत केली, अशा माणसाला संपवून टाकलं. काय करायला गेला आणि काय झालं ! खूप वाईट वाटलं.

 2. Usha Tiwari says

  डी एस के मधूकोष मध्ये त्यांनी दोन विंग ताब्यात दिल्या आहेत आणि अडचणी मुळे तिसरी विंग बाकी आहे पण ते मार्गदर्शन व्यवस्थित करत होते. पण दुर्दैवाने मराठी माणूस यशस्वी होऊ देऊ नये यासाठी काही जण यशस्वी झाले.

 3. उमेश थोरात says

  चांगले व्यक्ती आहेत ते… अशी वेळ कशी त्यांच्यावर आली देव जाणे परमेश्वर त्यांना या संकटातून बाहेर काढेल ही आशा व्यक्त करतो..

 4. D.R.Potdar says

  मी या भुतलावर असे पर्यंत DSK ना पूर्वीचे वैभव व सचोटी चे प्रमाणपत्र मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना DSK प्रती खूप आदर व अभिमान आहे मला

 5. Omprakash says

  मला पण माझे ३.५०लाख व्याजा सह परत मिळाले पण भरपूर मनस्ताप झाला मी जवळ रोज सहा महिने १.३०ते ४.३० व बुधवारी सकाळी १०ते ७.३०,८ असा जंगली महाराज रस्त्यावरील आॉफीस मध्ये सायकलीवरुन जात होतो

Leave A Reply

Your email address will not be published.