६ लग्न- १६ मुले, आता पोटगीत ५५०० कोटी खर्च करणाऱ्या दुबईच्या राजाची कहाणी

दुबई काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जगातल्या सर्वात उंच इमारती, सर्वात मोठ्ठ सोन्याच मार्केट, जगभरातल्या सेलिब्रिटींच दूसरं घर, थोडक्यात काय तर दुबई शहर हे बाप आहे.

अर्थातचं या शहराच्या श्रीमंतीमागे एकदा उत्तर मिळेलं तेलाचा पैसा. ते खरंच आहे म्हणा पण भिडू त्यासाठी सुद्धा डोकं लागतं. आणि ही डोकॅलिटी आहे मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम संयुक्त अरब अमिराती देशाचे पंतप्रधान, उप-राष्ट्रपती व दुबई अमिरातीचे ते शासक आहेत. 

या माणसानेच दुबईचा कायापालट केला आहे. २००६ पासून ते दुबई आणि संयुक्त अरब अमिराती देशाचे शासक आहेत. या माणसाची एक सवय आहे यांना कोणतीही गोष्ट १०० टक्केच लागते. त्यांना सुमार, मध्यम गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यांना त्यांचा देश जी काही गोष्ट करतो ती एकतर एकमेव असली पाहिजे नाहीतर नंबर एक असली पाहिजे.

आपण एखाद्या महिन्याचे नियोजन करतो जास्ती जास्त एखाद्या वर्षाचे नियोजन करतो पण हा माणूस एका दशकाचे नियोजन करतो. या माणसाने नियोजन आणि अविरत कामातून दुबईला आज या उंचीला नेऊन ठेवले आहे.

या माणसाने वाळवंटात फुलांच ‘मिरॅकल’ नावाचं जगातील सर्वात मोठं गार्डन उभं केलं. जगातील सर्वात उंच पंच तारांकित हॉटेल ही त्यांनी दुबईत बनवून घेतले, एवढं नाही आपल्या इथं जगातील सर्वात मोठे Disney land पाहिजे म्हणून त्या कंपनीकडे गेले, पण त्यांनी नाही म्हंटल्यावर भिडूचा इगो दुखावला. त्यांनी त्याच दिवशी सांगितले, मी दुबई लँड बनवणार आहे जे Disney land च्या अडीच पट मोठे असेल. तसचं २०३० पर्यंत २५ टक्के इमारती थ्रीडी प्रिंटींगने बनवण्याची योजना त्यांनी आखलीये.

असे हे जगावेगळे राजा सध्या घरगूती भानगडीत चांगलेच अडकलेत. ज्यामुळे त्यांना साधासुधा नाही तर ५ हजार ५०० कोटींचा दणका बसलाय.

झालं असं की, शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम आणि त्यांची पत्नी आणि जॉर्डनच्या राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांच्यात न्यायलयीन लढा सुरु आहे. दोघांनी सुद्धा कायदेशीर घटस्फोट घेतलाय. त्यानंतर मुलांच्या कस्टडी प्रकरणामध्ये शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना ७३० मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ पाच हजार ५०० कोटी रुपये द्यावी लागणार आहेत.  

हया आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यभराच्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाने एवढी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणतायेत.

न्यायमूर्ती फिलिप मूर यांनी निकाल देताना म्हंटलं की,

 शेख यांच्याकडूनच या तिघांच्या जीवाला धोका आहे. हया बिंत अल हुसैन स्वत:साठी पैसा मागत नाहीय. तिला केवळ तिच्या सुरक्षेसाठीचा मोबदला हवाय. लग्न मोडल्याने जे नुकसान झालं आहे त्याचा मोबदला तिला हवा आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार, शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना २५१ मिलियन पाउंडची रक्कम पुढील तीन महिन्यांमध्ये हया बिंत अल हुसैन यांना द्यावी लागणार आहे.

दरम्यान, ब्रिटनमधल्या कुठल्याही घरगुती भांडणाच्या प्रकरणात ही सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. पण तरी ही रक्कम हया बिंत अल हुसैन यांनी मागितलेल्या रक्कमेपेक्षा फार कमी आहे. हया यांनी १.४ बिलियन पाउंडची मागणी केली होती. जी कमी करून न्यायालयाने ५ हजार ५०० कोटी रुपये केली आहे.

न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे हया बिंत अल हुसैन यांचा मोठा विजय असल्याचं मानलं जातयं.

 

Webtitle: Dubai king has to pay 5500 crore as a Compensation to her wife and childrens in divorce settlement

 

Leave A Reply

Your email address will not be published.