भारतीय खेळाडूंचं स्वागत बघून अटलजी म्हणाले, ” आपण पाकिस्तानातही निवडणूक जिंकू शकतो.”

भारत पाकिस्तान सामन्यांची रंगत तर आपल्या सगळ्यांना माहितीचं आहे. या सामन्यांच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ नसायची, सगळीकडे घराघरात मॅच बघण्याचा उत्साह ओसंडून वाहत असायचा. पाकिस्तानला हरवल्यानंतर रस्त्यांवरून लोकं चक्क बाईक रॅली काढायचे इतकी उत्सुकता आणि धमाल भारत पाकिस्तान सामन्यांमध्ये असते. ऍशेज सिरीजपेक्षा हायहोल्टेज असणारा सामना म्हणजे भारत पाकिस्तान.

मात्र १९९९च्या अगोदर दीर्घकाळ बंद पडलेल्या या सामन्यांची सुरवात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नव्याने केली आणि प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा एकदा आनंदाची लाट उसळली होती. नक्की काय होता हा किस्सा-

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाचा भयंकर परिणाम भारत पाकिस्तान या दोन देशांवर झाला होता. दीर्घकाळ दोन्ही देशातले क्रिकेटचे सामने बंदच राहिले, भारतही त्याकाळी पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच खेळला नव्हता. प्रेक्षकांमध्ये मात्र हे सामने पुन्हा सुरु करण्यात यावे अशी चर्चा आणि उत्सुकता होती.

२००४ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन देशांमधील शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी क्रिकेट हे उत्तम माध्यम आहे असा विचार केला. वाजपेयींनी पाकिस्तानला एक ऐतिहासिक भेट दिली या भेटीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलताना त्यांनी भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा एकमेव पर्याय आहे देशांचे संबंध सुधारवण्यासाठी असा प्रस्ताव मांडला. याला दोन्हीकडून संमती मिळाली.

भारत सरकारने सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाच वनडे आणि तीन कसोटी क्रिकेट सामने खेळण्याची परवानगी दिली. अटल बिहारी वाजपेयींच्या या निर्णयाचं दोन्ही देशातून जोरदार स्वागत झालं.

वाजपेयींमुळे ठरलेला हा दौरा इतका गाजला दौऱ्यातील प्रत्येक खेळाडूची इनिंग पाहण्यासारखी होती. वीरेंद्र सेहवागने वैयक्तिक रचलेला ३०९ धावांचा डोंगर असो किंवा सचिन, द्रविड आणि गांगुली यांच्या अविस्मरणीय खेळ्या असो. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचा भारताने दारुण पराभव केला आणि वनडे, टेस्ट अशा दोन्ही सिरीजवर कब्जा केला.

ज्यावेळी या दौऱ्याचं आयोजन केलं गेलं त्यावेळी भारतीय संघाला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक बॅट भेट म्हणून दिली होती आणि त्या बॅटवर लिहिलं होतं, खेल हि नहीं दिल भी जितिये. शुभकामनाए.

तत्कालीन भारतीय संघाचे मॅनेजर रत्नाकर शेट्टी एका मुलाखतीत सांगतात कि, भारतीय टीमच्या पाकिस्तान दौऱ्याआधी सुरक्षेची पाहणी करण्यासाठी गेलो असता त्यावेळी पाकिस्तानमधले लोक एअरपोर्टवर, रस्त्यावर आणि पब्लिक प्लेसेसवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या गौरवाचे आणि कौतुकाचे बोर्ड घेऊन उभे होते. ज्यावेळी शेट्टींनी हि घटना वाजपेयींना सांगितली तेव्हा ते हसून म्हणाले कि आता हि स्थिती पाहून आपण पाकिस्तानमध्ये पण निवडणूक सहज लढू शकतो.

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय संघाला त्यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. वाजपेयींनी त्यावेळी भारतीय संघासोबत तासभर चर्चा केली आणि संघाला शुभेच्छा म्हणून बॅट दिली. ज्यावेळी निरोप घेऊन भारतीय संघ जात होता त्यावेळी वाजपेयींनी भारतीय संघाला शुभेच्छा म्हणून हम होंगे कामयाब हे गाणं मोठ्या आवाजात वाजवलं होतं.

पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन भारताने पाकिस्तानला वनडे सिरीजमध्ये ३-२ आणि टेस्ट सिरीजमध्ये २-१ ने पराभूत केले होते. हा दौरा प्रचंड गाजला. प्रदीर्घ काळानंतर क्रिकेट सामने आणि त्यातही भारताने पाकिस्तानला नामोहरम केले यामुळे देशवासीयांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

भारताने हा दौरा जिंकल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांनी फोन करून भारतीय संघाची पाठ थोपटली आणि त्यांचं अभिनंदन केलं. भारताचा कर्णधार सौरव गांगुलीसोबतही त्यांनी दौऱ्याविषयी बरीच चर्चा केली.

दोन देशातील संबंध मैत्रीपूर्ण करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी निवडलेला क्रिकेटचा मार्ग चांगलाच चर्चित राहिला आणि वाजपेयीचं पुष्कळ कौतुकही झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.