ब्रिटिश पंतप्रधानच्या एका निर्णयामुळे बंगालमध्ये ३० लाख लोक मरण पावले होते….

आजवरच्या इतिहासात बंगालचा दुष्काळ हे जगाने पाहिलेलं सगळ्यात भयाण वास्तव होतं. आजच्या बरेच वर्ष अगोदर बंगालमध्ये आजचा बांगलादेश, भारताचा पश्चिम बंगाल, बिहार आणि उडीसा ] भीषण दुष्काळ पडला होता. यात भुकेच्या अभावाने जवळपास २५ ते ३० लाख लोकं मरण पावले होते. हा काळ होता दुसऱ्या विश्वयुद्धाचा ज्यात देशात अन्नधान्याची कमतरता इतकी झाली कि लोकं मरायला लागली होती.

दुसऱ्या विश्व युद्धाच्या काळात अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या आणि जपानी आक्रमणामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची काळाबाजारी होऊ लागली होती. यामुळे गावखेड्यांमध्ये गोष्टी महाग झाल्याने लोकं गाव सोडून शहराच्या वाटेवरून जाताना दिसले. इतिहासानुसार असं म्हटलं जात कि ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिलच्या आदेशानुसार भारतात अन्नधान्याची पाठवणी बंद करण्यात आली होती आणि भारतीय लोकांना उपाशी मारण्याची मोहीम म्हणून याकडे पाहिलं जात होतं.

याकाळात म्यानमारवर जपानने कब्जा केल्याने तिकडून येणाऱ्या तांदुळाची आयात बंद झाली होती आणि ब्रिटन सरकारने युद्धात सैन्यासाठी हे धान्य गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. जपानी आक्रमणाला घाबरून बंगालमध्ये बोट आणि बैलगाड्या नष्ट करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे वाहतुकसुद्धा कोलमडली होती.

याकाळात सरकारने चर्चिलला विनंती केली होती कि अन्नधान्याची आयात-निर्यात सुरु करावी पण चर्चिलने यावर बंदी घातली होती. यामुळे बंगालच्या बाजारपेठांमध्ये तांदूळ आणि इतर धान्यांची कमी भासू लागली आणि भूकबळीने लोकांचे बळी जाण्यास सुरवात झाली. १९४३ चा दुष्काळ हा नैसर्गिक नव्हता तर तो मानवनिर्मित होता.

जानेवारी १९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं. पण यामुळे बंगालमध्ये अन्नधान्याचं उत्पादन घटलं नव्हतं. यामागे इंग्रजांचं धोरण जबाबदार होतं. ज्यावेळी बंगालमध्ये दुष्काळ पडला तेव्हा बंगालमध्ये अन्नधान्याचा साठा पूर्ण भरलेला होता पण इंग्रजांनी अधिकच्या नफ्यासाठी हे उत्पादन मोठ्या प्रमाणात ब्रिटनला पाठवलं त्यामुळे बंगालमध्ये अन्नधान्याची चणचण भासू लागली.

भारताचे तत्कालीन अर्थमंत्री अमर्त्य सेन म्हणाले होते कि

१९४३ साली अन्नधान्याची कुठलीही कमी बंगालमध्ये नव्हती. १९४१ च्या तुलनेत जास्त अन्नधान्याचा साठा होता. पण या दुष्काळासाठी पूर्णपणे ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल जबाबदार आहेत.

सगळी परिस्थिती माहिती असतानाही चर्चिलने अमेरिका आणि कॅनडा यांच्या इमरजेंसी फूड सप्लायच्या प्रस्तावाला धुडकावून लावलं. हे सगळं चर्चीलमुळे उदभवलं आहे.

या भूकबळीला वैतागून लोकं जिवंत राहण्यासाठी विषारी वनस्पती आणि साप खाऊ लागले. काही लोकं तर भुकेने तडफडणाऱ्या मुलांना नदीत फेकून देत होते. कित्येक लोकांनी ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला, महिलांनी परिवार चालावा म्हणून वेश्याव्यवसायाचा रस्ता धरला. लोकं सडलेल्या अन्नावरून भांडू लागले तर श्रीमंत लोकं या सगळ्याची मजा बघत होते. 

बंगालमधील या भीषण परिस्थितीला वैतागून बंगालच्या ग्रामीण भागातले लोक ढाका, कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागले. पण तिथेही खाण्यालायक आणि राहण्यालायक काहीच नव्हतं. कचराकुंड्यांजवळ हि लोकं राहू लागली. तिथेही अन्नावरून कुत्र्यामांजरांसोबत त्यांचा संघर्ष सुरु झाला. कोलकाता आणि ढाकामध्ये लोक रस्त्यावरच जीव सोडून देऊ लागले. हळूहळू शहरातले रस्ते मुडद्यांनी भरून जाऊ लागले.

या दुष्काळात तेच लोकं वाचले जे कामाच्या शोधात कोलकाता शहरांमध्ये आधीच स्थायिक झाले होते. या काळात सरकारला जाब विचारला जाईल किंवा आंदोलन केलं जाईल इतकीही क्षमता लोकांमध्ये नव्हती. १९४३ च्या पूर्ण वर्षभर भारतातून ब्रिटन आणि ब्रिटिश फौजेला अन्नधान्य पुरवठा होत राहिला. याला सरकारची गैरजबाबदारी कारणीभूत ठरली. 

ब्रिटिश इतिहासकारांच्या मते बंगाल दुष्काळात तब्बल १५ लाख लोकं मारले गेले होते तर भारतीय इतिहासकारांच्या मते हि संख्या ३० लाखाहून अधिक होती. पण मानवी वास्तवाचं असं भीषण स्वरूप याआधी कुठेही पाहायला मिळालं नव्हतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.