खेळाडूंनी ब्ल्यूटूथ बँडचा नियम न पाळल्यामुळे आयपीएलमध्ये कोरोनाची एंट्री झालीय….

कोरोनाचं संकट देशावर ओढवलं असताना आयपीएल का खेळवली जात आहे? असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. ह्या प्रश्नावर सगळीकडून बीसीसीआयवर टीका देखील होतं होती. अशातच आता कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघामधील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफ पासून बीसीसीआय पर्यंत सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत.

त्यानंतर आज होणार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामना पुढे ढकलण्यात आला.

कोलकाता संघातील फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी सह अजून एक प्रशिक्षक आणि बसचा क्लिनर पॉझिटिव्ह आले आहेत.

याच्या काही कारणांचा शोध घेतल्यावर यात खेळाडूंसाठी सुचवलेलं ब्लु टूथ बँड खेळाडू वापरत नसल्याचं निदर्शनास आल्याने आणि दिलेले नियम खेळाडूंनी न पाळल्यामुळे हि स्थिती ओढवली गेली असल्याचं म्हणलं जातंय.

पण नक्की हा ब्लूटूथ बँड काय आहे आणि आता आयपीएल खेळवली जाणार कि अर्ध्यावरच हि स्पर्धा थांबणार याविषयी आपण जाणून घेऊया.

बायो बबलमध्ये आयपीएल सुरक्षितरित्या खेळवली जाईल अशी ग्वाही बीसीसीआयने दिली होती. त्यानुसार २०२० साली युएई मध्ये जेव्हा आयपीएल स्पर्धा झाली तेव्हा बीसीसीआयने खेळाडूंसाठी ब्लूटूथ बँड बनवला होता. हा बँड केवळ झोपायच्या वेळी हातातून काढायचा इतर वेळी तो हातातच असायला हवा अशा सूचना बीसीसीआयने खेळाडूंना केल्या होत्या.

या ब्लूटूथ बँडमुळे काय व्हायचं तर सोशल डिस्टंसिंगचं भान राखलं जायचं. दोन मीटरपेक्षा जास्त जवळ संपर्कात कोणी आलं तर हा ब्लूटूथ बँड अलार्म वाजवायचा.

त्यावेळी एक कोरोनाचा पेशंट पूर्ण आयपीएलची वाट लावू शकतो हे बीसीसीआयने ओळखले होते त्यासाठी हि खास सोय करण्यात आली होती. अंपायर आणि खेळाडूंसाठी हा ब्लूटूथ बँड सक्तीचा असल्याचं बीसीसीआयने सांगितलं होत. या बँड मुळे खेळाडूंची संपूर्ण सुरक्षा केली जायची.

२०२१ आयपीएल भारतात खेळवण्यात आली. यावेळी मात्र हा ब्लूटूथ बँड अंपायर सोडून कुठल्याही खेळाडूंच्या हातात दिसला नाही. राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू जयदेव उनाडकत याने सांगितलं होतं कि,

खेळताना हि बंधन पाळणं खेळाडूंना कठीण जाणार आहे, विकेट पडल्यावर एकत्र येणे, टाळ्या, अभिनंदन करणे, सरावाच्या वेळी एकत्र येणे या गोष्टी घडणारच आहेत. अशा गोष्टीचा सामना आम्ही कधी केलेला नाही.

आता स्पर्धा रद्द होणार का?

आयपीएलमधील आधीच काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र बीसीसीआयने जाण्याची त्यांची परवानगी नाकारली आहे आणि वरून हेही सांगितलं आहे कि स्पर्धा संपेपर्यंत खेळाडूंची काळजी आम्ही घेऊ. त्यांना त्याच्या मायदेशी पाठवण्याची पूर्ण जबाबदारी आमची राहील.

आधीही या स्पर्धेतल्या अक्षर पटेल, नितीश राणा याना कोरोना झाला होता मात्र त्यांनी उपचार घेऊन पुन्हा स्पर्धा खेळायला सुरवात केलीय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहा कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र पुन्हा एकदा कोरोनाने आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. ६० सामन्यांची हि स्पर्धा असून २९ व्या सामन्यालाच हि समस्या उदभवली आहे. यात खेळाडूंनी सूचना न पाळल्याने आणि खेळाडूंची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अर्धी स्पर्धा झाली असली तरी स्पर्धेच्या आधी अनेक स्तरातून आयपीएल बंद केली पाहिजे असा सूर होता. 

आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. इतक्या अडचणी समोर आल्याने आयपीएलवर स्पर्धा रद्द करण्याचं संकट येऊन ठेपलं आहे. ब्लूटूथ बँड आणि दिलेल्या सूचना यांच्याकडे लक्ष न दिल्याने हि वेळ अली असल्याचं बोललं जातंय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.