“चोली के पीछे क्या है” गाण्यामुळे सुभाष घईंचा नॅशनल अवॉर्ड हुकला होता….

बॉलिवूडचा आत्मा म्हणजे सिनेमातली गाणी. गाण्यांशिवाय पिच्चर बघण्यात मजा नाही असं एक सेगमेंट बॉलिवूडमध्ये तयार झालं होतं. सिनेमा रिलीज व्हायच्या आधी गाणी मार्केटमध्ये येतात आणि सिनेमा पाहण्याचं कारण सांगून जातात. पण अशाच एका गाण्यामुळे सुभाष घईंचा नॅशनल अवॉर्ड हुकला होता. त्याबद्दलचा आजचा किस्सा.

सुभाष घई हे भारतातल्या महत्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक. ब्लॉकबस्टर सिनेमे देण्यात सुभाष घईंचा हातखंडा होता. अशाच ब्लॉकबस्टर हिटपैकी एक म्हणजे खलनायक. संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित अशा तगड्या स्टारकास्टने हा सिनेमा जबरदस्त हिट केला. सिनेमातली गाणी प्रचंड गाजली होती.

या सिनेमात एक गाणं होतं चोली के पीछे क्या है….

अलका याग्निक आणि ईला अरुण या दोघीनी हे गाणं गायलं होतं. पण चोली के पीछे क्या है… हे गाणं ज्यावेळी रिलीज झालं तेव्हाच या गाण्यावरून वाद सुरु झाले. भारतीय संगीत क्षेत्रातील आणि बॉलिवूडमधील सगळ्यात वादग्रस्त गाणं म्हणून चोली के पीछे हे गाणं फेमस झालं होतं. पण या कॉंट्रोव्हर्सीमुळेच सिनेमा चांगला चालला आणि गाणं लोकांमध्ये सुपरहिट झालं.

या गाण्यातला माधुरीचा डान्स हा आजवरचा आयकॉनिक परफॉर्मन्स मानला गेला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ३२ संघटना आणि राजकीय पक्षांनी मिळून हे गाणं बंद करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. हे गाणं व्हलगर आहे असं जेव्हा संघटना आणि राजकीय पक्ष बोलून वाद घालू लागले तेव्हा सुभाष घई त्यांना हे गाणं व्हलगर नाही हे समजावून सांगत होते. 

या गाण्याबद्दल ज्या वेगाने कॉंट्रोव्हर्सी वाढत होती त्याच्या दुप्पट वेगाने हे गाणं फेमस होत होतं. या कॉंट्रोव्हर्सीमुळे त्या वेळी चोली के पीछे क्या है या गाण्याची प्रचंड विक्रमी कॅसेट विक्री झाली. एका आठवड्यात १ करोड कॅसेट विक्री या गाण्याची झाली होती आणि हा तेव्हा एक रेकॉर्ड मानला गेला होता.

गायिका अलका याग्निक आणि ईला अरुण यांच्यावरसुद्धा बरीच टीका झाली होती. ईला अरुण या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगताना म्हणतात कि अलका याग्निक हे गाणं गाण्याच्या अगोदर खूप घाबरली होती. हे गाणं रिलीज झाल्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील या विषयी ती साशंक होती. पण धाडसाने आम्ही ते गाणं गायलो होतो.

खलनायक सिनेमा त्यावेळच्या सगळ्यात हिट सिनेमांपैकी एक होता आणि बऱ्याच अवॉर्ड्सच्या शर्यतीत होता. मात्र नॅशनल अवॉर्ड मिळणं हे मोठं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं त्यामुळे या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळेल अशा शक्यताही वर्तवल्या जात होत्या. पण चोली के पीछे क्या है या गाण्याने राडा केला.

खरंतर संजय दत्तचाच तेव्हा दुसरा मॅटर सुरु होता आणि पुन्हा या गाण्याचा मॅटर यामुळे सुभाष घई चिंतेत होते. गाण्यामुळे सिनेमा हिट झाला खरा पण सुभाष घईंच्या तोंडातला घास म्हणजे नॅशनल अवॉर्ड हुकला. याचं दुःख सुभाष घईंना जास्त झालं. जवळपास १०० % अवॉर्ड हा खलनायक घेऊन जाणार होता पण गाण्यामुळे त्याला ब्रेक लागला. 

आजसुद्धा रसिकांमध्ये चोली के पीछे क्या है…. या गाण्याची क्रेझ आजही लोकांमध्ये तशीच आहे. अनेक ठिकाणी हे गाणं आजसुद्धा वाजतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.