फिल्म इंडस्ट्रीचा हा हिरो हातातल्या बेड्यांसकट शूटिंगसाठी हजर व्हायचा..

बलराज साहनी चित्रपट क्षेत्रातील आणि साहित्यातील एक मोठं नाव. चित्रपटात त्यांच्या भूमिका जितक्या गाजल्या त्याहीपेक्षा त्यांच्या समाजकार्याचे गोडवे गायले गेले. आक्रमक आणि क्रांतिकारी असलेले बलराज साहनी दोन्ही क्षेत्रात आपलं योगदान देत होते. त्यांच्या समाजकार्याचे आणि चित्रपटाचे बरेच चर्चेत असलेले किस्से आहेत. त्यापैकी दोन किस्से आपण पाहूया ज्यामुळे समाजमनावर बलराज साहनी यांची वेगळी छाप होती आणि ते लोकांमध्ये जास्तच प्रिय झाले.

समुद्रकिनारी एकदा फेरफटका मारत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले, त्यावेळी तिथल्या मच्छीमारांनी त्यांना दवाखान्यात भरती केलं. या घटनेने दवाखान्याबाहेर लोकांची गर्दी वाढू लागली. या लोकांमध्ये बहुतेक लोक हे मजूर होते. बलराज साहनींना कळून चुकलं होतं कि आता आपला शेवट जवळ आला आहे तेव्हा त्यांनी तिथल्या डॉक्टरला एका चिठ्ठीवर लिहायला सांगितलं कि ,

माझ्या सर्व देशवासियांना माझा नमस्कार , मी माझं जीवन सुखी पद्धतीने व्यतीत केलं आहे. माझ्या मृत्यूनंतर धार्मिक रीतिरिवाज न करता माझ्या देहावर लाल पताका आणि लेनिनची पुस्तकं ठेवा.

क्रांतिकारक , लेखक, समाजसेवक अशा अनेक पाडव्यानि ते संपन्न होते. मजूर आणि कष्टकरी लोकांसाठी त्यांचा विशेष जिव्हाळा असायचा.

बलराज साहनी यांचा जन्म ३० एप्रिल १९१३ साली रावळपिंडीत झाला. मूळ नाव युधिष्ठीर साहनी होतं पण चित्रपट सृष्टीशी संबंध आल्यामुळे नाव बदलून बलराज ठेवलं. बलराज साहनी हे अभ्यासात हुशार होते. रक्ताने पंजाबी पण मनाने ते पूर्णपणे बंगाली होते. ते एकेकाळी नावाजलेले लेखक होते आणि त्यांचे छोटे बंधू भीष्म साहनी हे देखील उत्तम लेखक होते.

साहित्याची सेवा करत असताना त्यांचा नाटकाशी संबंध आला. सुरवातीला शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी होते. गांधीजींसोबत त्यांचं नातं चांगलं होतं. त्यांची बुद्धिमत्ता पाहून गांधीजींनी त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं असं सांगितलं. शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि तिथे बीबीसी हिंदी रेडिओसाठी काम करू लागले.

भारतात परत आल्यावर थिएटर ग्रुपशी त्यांचा संबंध आला. त्यांना अनेक लोक अभिनेता म्हणून ओळखायचे पण त्यांना अभिनेत्याऐवजी लेखक हि ओळख जास्त आवडायची. पुढे चित्रपट क्षेत्रात ते आल्यावर त्यांनी मजूर लोकांचं चित्रण आपल्या अभिनयातून इतक्या उत्कृष्टरित्या सादर केले कि त्यांचा हा अभिनय आजवरचा भारतातला सगळ्यात उत्तम अभिनय मानला जातो.

दो बिघा जमीन या चित्रपटाने बलराज साहनी यांचं नाव अजरामर केलं.

त्यांच्या जेलवारीचा किस्सा –

भारत स्वतंत्र झाल्यानंतर जनआंदोलनाला समर्थन न देणाऱ्या लोकांची उचलबांगडी करणाऱ्या राजकारण्यांचा एक मोठा गट करत होता. कम्युनिस्ट लोकांना देशद्रोही ठरवून त्यांची धरपकड सुरु झाली. बलराज साहनी हे कम्युनिस्ट विचारसरणीचे असल्याने त्यांनाही पकडून नेण्यात आलं.

त्यावेळी दिग्दर्शक के आसिफ हे हलचल नावाची सामाजिक मुद्यावर आधारित असलेली फिल्म बनवत होते. या चित्रपटात मुख्य कलाकार नर्गिस आणि दिलीप कुमार होते. बलराज साहनी यांची भूमिका या चित्रपटात जेलरची होती आणि महत्वाची होती. चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं होतं आणि त्याचवेळी कम्युनिस्ट चळवळीमुळे बलराज साहनी जेरबंद झाले होते. के आसिफ यांची चिंता वाढली, अर्ध शूटिंग झालं होतं, शूटिंग कॅन्सल केलं तर पैसेही वाया जातील आणि पुन्हा दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या तारखाही पुन्हा मिळणार नाही.

अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी के असिफ यांनी सरकारकडे मागणी केली आणि आर्थिक नुकसान होण्याचा हवाला देऊन सरकारला विनंती केली कि ज्या ज्या वेळी हलचल चित्रपटाचं शूटिंग असेल त्या त्या वेळी बलराज सहानी याना सोडण्यात यावं किंवा त्यांची सुटका करावी. यावर बरेच दिवस सरकार विचार करत राहिलं. यावर उपाय म्हणून सरकारने सुटकेऐवजी शूटिंगच्या दिवशी स्टुडिओला जाण्याची परवानगी दिली.

चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं त्यावेळी बलराज साहनी आर्थर रोडच्या जेलमधून पोलिसांच्या गाडीत हातात बेड्या घालून शूटिंग साठी येत असत. पोलिसांच्या पहाऱ्यात या चित्रपटाचं शूटिंग केलं जाई, हलचल चित्रपटाची बरीचशी शूटिंग बलराज साहनी यांनी जेलमधून येऊन जाऊनच केली. कम्युनिस्ट चळवळीमुळे साहनी याना सहा महिने तुरुंगात घालवावे लागले.

साहित्य आणि सिनेमा दोन्ही विषयात पारंग असलेले बलराज साहनी जेलवाऱ्यांमुळे प्रचंड चर्चेत राहिले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.