दारासिंग सोबत कोणतीच नटी काम करत नव्हती आणि मग मुमताजची एंट्री झाली…

बॉलिवूडमध्ये सुंदरता किती मॅटर करते हे तर आपल्याला माहितीच आहे. जुन्या सिनेमांमध्ये सशक्त अभिनेत्री आणि सोबतच सुंदरतेची जोड फार अभावाने पाहायला मिळायचं. त्यातही सिनेमा हिट होईल ना होईल हे सगळं गुलदस्त्यात असायचं. तरीही जुन्या काळातल्या अभिनेत्र्या आणि आजच्या हिरोईन यांच्यात तुलना हि होतेच. पण जुन्या काळातली एक अभिनेत्री अशी होती जिला सुंदरतेचं प्रतीक मानलं जायचं.

आजही ज्या ज्या वेळी रेट्रो लूकची चर्चा केली जाते तेव्हा याच अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो ती अभिनेत्री होती मुमताज.

राजेश खन्ना आणि मुमताज हि जोडी जुन्या जाणत्या सिनेरसिकांच्या चांगलीच लक्षात राहिलेली. पण मुमताज सुरवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होती पण सिनेमामध्ये एंट्री कशी झाली त्याबद्दलचा आजचा किस्सा.

३१ जुलै १९४७ रोजी मुमताजचा जन्म मुंबईमध्ये एका मुस्लिम परिवारात झाला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मुमताजने वयाच्या १२ व्या वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपड सुरु केली. सुरवातीला १९५८ साली मुमताजला पहिला सिनेमा मिळाला बालकलाकाराच्या रूपाने तो म्हणजे सोने कि चिडिया. पण मुमताजचा स्ट्रगल मोठा होता. 

आपल्या बहिणीसोबत स्टुडिओचे उंबरठे झिजवणे सुरु झालं होतं. कसाबसा एखादा साईडरोल मिळायचा त्यावर त्यांचं पोट सुरु होतं. अनेक छोटेमोठे रोल आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून मुमताजला काम मिळू लागलं पण कमी वेळचा रोल असल्यामुळे प्रेक्षकांची नजर तिच्यावर जात नव्हती. पण एक घटना घडली आणि मुमताज बॉलिवूडमधली ब्लॉकबस्टर अभिनेत्री ठरली.

मुमताजला मुख्य अभिनेत्री म्हणून रोल मिळाला तो १९६३ साली आलेल्या दारा सिंग यांच्या फौलाद या सिनेमामध्ये. पण यामागे सुद्धा एक किस्सा आहे. एक काळ असा होता कि पहिलवान असलेले दारासिंग योगायोगाने सिनेमामध्ये आले होते. पण त्यांच्यासोबत कुठलीच हिरोईन काम करायला तयार नव्हती याला कारण होतं दारा सिंग यांचं धष्टपुष्ट शरीर. दारासिंग यांच्यासमोर कुठलीही अभिनेत्री एकदम बाहुलीसारखी वाटायची. 

दिग्दर्शक सुद्धा या प्रकाराला वैतागले होते. अनेक त्याकाळातल्या नामवंत अभिनेत्र्यांनी दारा सिंग यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. त्यावेळी दिग्दर्शक मेहमूद हसन यांची नजर मुमताज यांच्यावर पडली. त्यांनी तात्काळ दारा सिंग यांच्या अपोझिट मुमताजला सिनेमासाठी साइन केलं.

ज्या ज्या वेळी हिरोईन दारा सिंग यांच्यासोबत काम करायला नकार द्यायच्या तेव्हा दारा सिंग म्हणायचे कि सिनेमात हिरोईन नसली तरी चालेल सिनेमा माझ्या जोरावर चालला जाईल. पण मुमताजने दारासिंग यांच्यासोबत काम करण्यास होकार दिला आणि दारा सिंग म्हणाले कि मला मुमताजबरोबर काम करण्यास हरकत नाही. 

फौलाद सिनेमात दारासिंग आणि मुमताज यांची जोडी झळकली. हा तोच सिनेमा होता ज्यामुळे ज्युनिअर आर्टिस्ट असलेली मुमताज थेट अभिनेत्री म्हणून समोर आली. याबद्दल मुमताज सांगते कि

आज माझं जे हिरोईन म्हणून नाव झालंय त्यात सगळ्यात मोठा वाटा हा दारा सिंग यांचा आहे. दारा सिंग यांच्यामुळेच माझी बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. दारा सिंगांबरोबर काम केल्यामुळे मला चांगले चांगले सिनेमे ऑफर होऊ लागले.

दारा सिंग यांच्यानंतर मुमताजची जोडी जमली ती राजेश खन्नासोबत. त्या काळात राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होते. या जोडीला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळालं. १९६९ पासून ते १९७४ पर्यंत या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. दो रास्ते या सिनेमातून या जोडीची सुरवात झाली होती ती पुढे दीर्घकाळ चालली. सच्चा झूठ, अपना देश, दुश्मन,बंधन आणि रोटी असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

सुरवातीच्या काळात मुमताजला नकार देणारे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेतेसुद्धा तिच्यासाठी रांगा लावू लागले. बॉलिवूडमधली एकेकाळची सगळ्यात सक्सेसफुल अभिनेत्री म्हणून मुमताजकडे पाहिलं जायचं. अनेक अवॉर्ड सुद्धा तिला मिळत गेले. पण एके काळी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मुमताजला बॉलिवूडमध्ये दारा सिंग यांच्यामुळे येता आलं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.