एन्रॉनच्या रिबेकाबाईंसाठी बाळासाहेब जोशी सरांवर नाराज झाले होते

मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी मराठी माणसाला मिळवून दिली. एक आंदोलन म्हणून सुरु झालेली हि संघटना पुढे राजकीय पक्ष बनली, संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. कित्येक शिवसैनिक कोणताही राजकीय वारसा नसताना तळागाळातून आलेले. यातच एक प्रमुख नाव म्हणजे मनोहर जोशी.

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पहिल्या फळीचे शिलेदार. एक साधा शिवसैनिक ते पुढे मुंबई महापालिकेचे नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विरोधी पक्ष नेते आणि अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास मनोहर जोशींनी कष्टाने मेहनतीने आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर पार पडला.

पण मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एन्रॉन प्रकल्पामुळे बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांच्यात नाराजीनाट्य घडलं होतं.

तर नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आले. त्यानंतर अनेक बदल देशभरात घडू लागले. महाराष्ट्रात वीजनिर्मिती होत होती मात्र भविष्यात शेती आणि उद्योगाची वाढती भूक बघता ती पुरेल की नाही याची शंका होती. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा पासून त्यांनी वीजनिर्मिती प्रकल्प व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते.

राज्याची आर्थिक क्षमता एखादा वीजप्रकल्प तयार करण्याएवढी सक्षम नव्हती. मग खाजगी गुंतवणूक होईल का याची चाचपणी सुरु झाली. महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ अमेरिकेला पाठवण्यात आलं. या शिष्टमंडळापुढे तिथल्या वेगवेगळ्या कंपन्यानी प्रेजेंटेशन दिलं. त्यातीलच एक कंपनी होती एन्रॉन.

एन्रॉन कॉर्पोरेशन ही अमेरिकेतील पहिल्या पाचशे मोठ्या बहु राष्ट्रीय कंपन्यामध्ये गणना होणारी अशी मोठी कंपनी होती. त्यांनी सादर केलेला प्रकल्प तत्कालीन सरकारला आवडला. त्यांनी त्या कंपनीला महाराष्ट्रातील दाभोळ येथे गॅसवर साधारण दोन हजार मेगा वॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचे आमंत्रण दिल. या करारावर सह्या झाल्या तोवर शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते. अंतिम करार सुधाकरराव नाईक यांनी पूर्णत्वास नेला.

१९९३ सालापासून स्थानिकांनी भूसंपादनावरून विरोध सुरु केला. शिवाय पर्यावरणवाद्यांचा विरोध होताच. जेव्हा वीजखरेदी कराराचे तपशील उघड झाले त्यानंतर मात्र आंदोलनास तोंड फुटले.

परदेशी कंपनीशी डॉलरमध्ये ठरवलेला वीजदर देऊन करार करण्यात आला आहे याबद्दल मेधा पाटकर, गुहागर तालुका एन्रॉनविरोधी संघर्ष समिती, सिटू आदि कामगार संघटना, डावे पक्ष यांनी जोरात निदर्शने सुरु केली. या वीजप्रकल्पामुळे पारंपारिक रोजगारावर परिणाम होणार होता. कोकणातील स्थानिक तरुणांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. तिथले शेतकरी, मच्छीमार यांना आपल्या रोजगारावर या उद्योगामुळे परिणाम होईल याची आशंका होती. यात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली.

विरोधात असणाऱ्या शिवसेना, भाजप नेत्यांनी एन्रॉन विरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली. देशपातळीवर देखील याची चर्चा होऊ लागली. पवारांनी परकीय कंपनीला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे असे आरोप होऊ लागले. विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी यांनी एन्रॉन विरुद्ध रान उठवले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान तर शिवसेना-भाजपने घोषणा दिली,

“सत्तेत आलो तर एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवून टाकू !!”

खरोखर पवारांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा पराभव करून युतीचे सरकार सत्तेत आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रकल्प रद्द केला. राज्याला विजेची गरज असताना एवढा मोठा प्रकल्प रद्द करणे चुकीचे आहे अशी भूमिका पवारांनी घेतली.

त्यात एन्रॉनने महाराष्ट्र सरकारने केलेला करार पाळला नाही याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायलयात धाव घेतली. याच दरम्यान ७ नोव्हेंबर १९९५ रोजी एन्रॉनच्या संचालिका रिबेका मार्क्स सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला आल्या. दुसऱ्या दिवशी फेरवाटाघाटी करायचं ठरलं.

मुख्यमंत्री जोशी यांना त्यांनी भेटण्याची वेळ ठरलेली होती. जोशी सर हे वक्तशीरपणाबद्दल अत्यंत प्रसिद्ध आहेत. रिबेका मार्क यांना त्यांच्या कार्यालयात पोचायला खूपच उशीर झाला, तेव्हा जोशी सर रागावले आणि त्यांनी ती भेटच रद्द करून टाकली. त्यावेळी रिबेका मार्क अगोदर मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी गेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना उशीर झाला, याची कल्पना जोशी सरांना नव्हती.

तिकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर अशी गोष्ट घालण्यात आली की रिबेका मार्क या प्रथम ठाकरे यांना भेटायला गेल्यामुळे जोशी नाराज झाले! या ‘कानगोष्टी’मुळे आता ठाकरे नाराज झाले! परंतु जोशी सरांनी आपल्या हातोटीनुसार त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले.

पुढे ८ जानेवारी १९९६ रोजी युती शासन काळात एन्रॉनशीच नव्याने करार केला गेला.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.