अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय पण यापेक्षाही मोठं संकट संत्र्याच्या फेक कलमांचं आहे…

संत्रा म्हटलं कि तोंडाला नुसतं पाणी सुटतं. आंबट गोड चवीचा नागपुरी संत्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. परंतु यंदाच्या हंगामात संत्र्याची चव पुरेपूर घेता येणार नाही. कारण संत्रा पीक घेतल्या जाणाऱ्या नागपूर, अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे संत्र्यांच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याची फळं गळत आहेत. 

समोरच्या काही दिवसांमध्ये ही फळगळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संत्र्याच्या आंबिया (पावसाळी) बहरावर संकट आलेलं आहे. संत्र्याच्या फळगळीमुळे शेतकरी आणि संत्र्याच्या खवय्यांमध्ये नाराजी पसरलीय. 

परंतु या संत्र्याच्या फळगळी पलीकडे आणखी एक मोठी समस्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होत आहे. 

शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बनावट कलमांची लागवड केल्यामुळे संत्र्याच्या झाडाला हवी तितकी फळं न लागण्याची समस्या निर्माण होत झाली आहे. 

नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागातील अनेक शेतकऱ्यांनी बाजारातील खोट्या संत्रा कलमांची लागवड केली होती. त्यामुळे चार-पाच वर्ष कष्ट करून वाढवलेल्या झाडांना हवे त्या प्रमाणात संत्रेच लागत नाहीयेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या संत्र्यामध्ये अस्सल नागपुरी संत्र्याची चवच नाहीय त्यामुळे सुद्धा समस्या निर्माण झालीय.  

खोट्या कलमांच्या लागवडीमुळे संत्र्याच्या खऱ्या चवीत बदल होत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात आपल्या जगावेगळ्या आंबटगोड चवीमुळे प्रसिद्ध असलेल्या संत्र्याच्या प्रजातीवर संकट निर्माण होत आहे. 

आता अनेक जण म्हणतील संत्रा तर संत्रा असतो त्यात काय इतकं? पण तसं नाही नागपुरी संत्रा जगावेगळी आंबटगोड चव असलेला एकमेव संत्रा आहे.

भारतात सगळ्यात जास्त संत्र्याचं उत्पादन मध्य प्रदेश आणि पंजाब मध्ये केलं जातं. परंतु भारतात असलेल्या संत्र्यांच्या सर्व प्रजातींपैकी नागपुरी संत्र्याची चव सगळ्यात अनोखी आहे. नागपुरी संत्र्याची चव आंबट आणि गोड या दोन चवींचा संगम आहे. नागपुरी संत्र्याच्या या अनोख्या चवीमुळेच जीओग्रॉफिकल इंडिकेशन रजिस्ट्री चेन्नई या संस्थेने नागपुरी संत्र्याला जी आय इंडिकेशन नंबर दिलाय.

या अनोख्या नागपुरी संत्र्याला जो जीओग्रॉफिकल इंडिकेशन मिळालाय त्यामागे नागपुरी संत्र्याच्या कलमांची भूमिका महत्वाची आहे.

अस्सल नागपुरी संत्र्याची केवळ दोन प्रकारची कलमं आहेत. त्यात पहिला कलम रंगपूर लिंबाच्या खुंटाचा वापर करून बनवला जातो तर दुसरा कलम जंबेरी लिंबाच्या खुंटाचा वापर करून बनवला जातो. यातील रंगपूर लिंबाचीची प्रजात भारी पोताच्या जमिनीसाठी वापरली जाते. तर जंबेरी लिंबाची प्रजात हलक्या आणि माध्यम पोताच्या जमिनीसाठी वापरली जाते.

नागपुरी संत्र्याला जो जीओग्रॉफिकल इंडिकेशन मिळालाय त्यासाठी आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी संत्र्याची कलमं बनवण्याच्या काही प्रक्रिया आहेत. 

नागपुरी संत्र्याबरोबरच देशातील संत्र्यांच्या प्रजातींवर संशोधन करण्यासाठी सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना आकारण्यात आलेली आहे. सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सीसीआरआयने नागपुरी संत्र्यावर संशोधन करते. 

सीसीआरआयने केलेल्या संशोधनाच्या आधारावरच संत्र्याची कलमं तयार करण्यासाठी एक ठराविक प्रक्रिया ठरवून दिली आहे. 

सीसीआरआयने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचं पालन करून संत्र्याची कलमं तयार केली जातात. सर्वप्रथम संत्र्याच्या निरोगी आणि उत्तम फळ देणाऱ्या झाडाची निवड केली जाते. निवडलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये जेथून नवीन फांदी तयार होणारी जागा असते. ती जागा म्हणजेच झाडाचे डोळे होत. ते डोळे कापून रंगपूर लिंबू आणि जंबेरी लिंबाच्या खुंटांवर लावले जातात.

हे काम वेगवेगळ्या नर्सरी मध्ये केले जाते. परंतु शेतकऱ्यांना योग्य कलमं मिळावीत यासाठी राष्ट्रीय फलोद्यान मंडळाकडून नर्सरींना परवानगी दिली जाते.  

राष्ट्रीय फलोद्यान मंडळ म्हणजेच एनएचबी कडून जेव्हा एखाद्या नर्सरीला परवानगी देण्यात येते. तेव्हा कलमांसाठी ज्या झाडाचे डोळे वापरण्यात येतात त्या झाडांची निवड स्वतः एनएचबी कडून केली जाते. त्यांनतर रंगपूर लाईम आणी जंबेरी लिंबाच्या खुंटावर डोळ्यांचे प्रत्यारोपण करण्यापासून रोपं तयार होईपर्यंत एनएचबीकडून पाहणी केली जाते. त्यांनतर नर्सरीला परवानगी दिली जाते. 

परंतु एकदा मिळालेली परवानगी फक्त दोन वर्षांसाठीच असते. दोन वर्षांनंतर नर्सरीला एनएचबीच्या पुन्हा तशाच प्रकारच्या तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागते. 

कलमांच्या निर्मितीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी बोल भिडूने सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त प्रिंसिपल रिसर्चर डॉ. आंबादास हुच्चे यांच्याशी संपर्क साधला. 

कलम निर्मितीबद्दल माहिती देतांना डॉ. हुच्चे सांगतात की,

“संत्र्याची कलमं तयार करण्यासाठी आणि संत्रा पिकाच्या लागवडीसाठी सीसीआरआयने शास्त्रीय नियम तयार केलेले आहेत. त्या नियमांच्या आधारे एनएचबी कडून नर्सरीची तपासणी केली जाते. अशा प्रमाणित नर्सरीज मध्ये तयार झालेली रोपं  निर्दोष असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिच रोपं खरेदी करायला हवीत.”

याबद्दल आणखी सविस्तर माहिती देतांना डॉ हुच्चे सांगतात की,

“खासगी नर्सरींकडून नियमांचे पालन केले जात नाही. मुळात अयोग्य असलेल्या झाडांचे डोळे काढले जातात आणि त्यांनतर अप्रमाणित खुंटांवर त्यांचे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे निर्माण होणारी कलमं बनावट असतात. ही बनावट कलमं अगदी खऱ्या कलमांसारखीच दिसतात त्यामुळे रोपांना बघून काहीच सांगतात येत नाही.” असं डॉ हुच्चे म्हणाले. 

एनएचबीच्या या नियमांमुळे अनेक खासगी नर्सरी निर्माते शासकीय मान्यता न मिळवता आपल्या पद्धतीनेच संत्र्याच्या कलमांची निर्मिती करतात.

खासगी नर्सरीचे निर्माते एनएचबीची प्रक्रिया पूर्ण न करतातच आपल्या अर्धवट ज्ञानाने संत्र्याची कलमं तयार करतात. त्यात अनेकदा रंगपूर लिंबू आणि जंबेरी लिंबाचा तुटवडा असल्यामुळे सर्रासपणे गलगल लिंबाचे खुंट वापरतात. तर काही वेळेस गलगल लिंबाव्यतिरिक्त आणखी वेगळ्याच कोणत्या तरी लिंबाचे खुंट वापरले जाते. 

खुंटांच्या घोळाबरोबरच संत्र्याचे डोळे काढतांना रोग असलेल्या, फळं न येणाऱ्या, तसेच रंगपूर आणि जंबेरी खुंटाव्यतिरिक्त दुसऱ्याच अनोळखी खुंटावर तयार झालेल्या झाडांचे डोळे घेतले जातात. नर्सरीत रोप तयार करतांना रोपांना द्यायची खतं, त्यासाठी करायची बुरशीनाशक फवारणी, रोपांचं ड्रिंचिंग बरोबर दिलं जात नाही. तसेच कलम तयार करतांना घ्यायची काळजी सुद्धा घेतली जात नाही त्यामुळे कलम दोषपूर्ण बनते. 

ही बनावट कलम अगदी खऱ्या खुऱ्या कलमेसारखी दिसते त्यामुळे रोपांचे तज्ज्ञ सुद्धा खरी आणि बनावट कलम ओळखू शकत नाहीत. या बनावट कलमांमुळे शेतकऱ्यांच्या बागेतील समस्या अलीकडच्या काळात वाढत आहेत. 

अशा सदोष कलमांमुळे संत्रा उत्पादक भागात काय परिस्थिती आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने स्थानिक कृषी केंद्र चालक आणि कृषी मित्र अज्जु खान यांच्याशी संपर्क साधला. 

सध्याची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सांगतांना अज्जू खान सांगतात की, “सध्या भागामध्ये गेल्या ६-७ वर्षांपासून बनावट कलमांचा सुळसुळाट आहे. अनेक नर्सरी निर्माते बनावट पद्धतीने कलमं तयार करून विकतात परंतु जेव्हा संत्र्याची झाडं मोठी होतात तेव्हा यातील प्रॉब्लेम समोर येतात. परंतु तेव्हा झाडं मोठी झाली असतात त्यामुळे यावर उपाय करता येत नाही.”

याबद्दल सविस्तर माहिती देतांना अज्जू खान पुढे सांगतात की, ” अनेक शेतकरी मला सांगतात कि त्यांच्या शेतात ५-६ टक्के झाडं डिफेक्टिव निघत आहेत. झाडाच्या फांद्या योग्य पद्धतीने न वाढत बांबूसारख्या सरळ वाढतात. काही झाडांच्या फांद्या बारीक असतात आणि काहींच्या फांद्या येलारून जातात. तसेच अनेक झाडांवर संत्रेच लागत नाहीत.” असे अज्जू खान म्हणाले.

अज्जू खान यांनी सांगितल्याप्रमाणे या अशास्त्रीय बनावट कलमांचे गेल्या ५-६ वर्षात मोठे पेव फुटले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नर्सरीचा व्यवसाय वाढला आहे. एनएचबीने मान्यता दिलेल्या नर्सरीमध्ये रंगपूर आणि जंबेरी खुंटावर बनवलेल्या एका रोपाची किंमत साधारणपणे ८०-१०० रुपयांपर्यंत असते. तर तेच सामान्य नर्सरीमध्ये त्याच रोपांची किंमत साधारणपणे  ४५-५० रुपये असते.याव्यतिरिक्त गलगल किंवा वेगळ्या खुंटाचा वापर केलेल्या रोपाची किंमत साधारणपणे २०-२५ रुपयांपर्यंत असते.

एकतर सामान्य नर्सरीमध्ये किंमत कमी असते आणि दुसरी गोष्ट एनएचबीची मान्यता मिळालेल्या नर्सरीची संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या ओळखीच्या नर्सरीतुन कलमं खरेदी करतात. शेतकऱ्यांच्या याच चुकीमुळे  झाडांच्या फांद्या, झाडांवर येणारी फळं, फळांची गुणवत्ता या सगळ्यांवर परिणाम होत आहे.

बनावट कलमांमुळे झाडांवर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी राजू वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. 

स्वतःच्या संत्रा बागेतील परिस्थिती व्यक्त करतांना राजू वानखेडे सांगतात की, “माझ्या बागेत साधारणपणे ४५० संत्र्याची झाडीन आहेत. त्यातील १५-२० झाडांवर फांद्या वाढतांना समस्या येत आहेत. मी आणि माझ्या मित्राने आमच्या विश्वासातील माणसाकडून ही कलमं घेतली तरीसुद्धा समस्या आलीय. ही झाडं आता ३ वर्षांची आहेत. ही झाडं जेव्हा २ वर्षांनी फळाची होतील तेव्हा जर फळं लागली नाहीत तर माझी सगळी मेहनत वाया जाईल” असं राजू वानखेडे म्हणाले.

संत्र्यांच्या बनावट कलमांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकेकाळी कोणत्याही प्रकारची बनावट कलमं नव्हती परंतु आता याचं प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच जनजागृती न केल्यास ही समस्या आणखी वाढेल. या समस्येमुळे शेतकऱ्यांना नुकसान होईलच परंतु नागपुरी संत्र्याच्या प्रजातीला आणि स्वादाला सुद्धा धोका उत्पन्न होईल.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आणि एनएचबीने मान्यता दिलेल्या प्रमाणित नर्सरींमधून संत्र्याची कलमं खरेदी करणे गरजेचे आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.