प्रिन्स चार्ल्सला किस केल्याने पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येसुद्धा चर्चेत आल्या होत्या….
पद्मिनी कोल्हापुरे हे नाव महाराष्ट्राला चिमणी पाखरं या सिनेमामुळे चांगलंच परिचित आहे. अगदी घरातल्या गडी माणसांना आणि आयाबायांना धाय मोकलून रडायला लावणारा हा सिनेमा होता. पण ८० च्या दशकात नवीन नवीन पद्मिनी कोल्हापुरे बॉलिवूडमध्ये वावरू लागल्या होत्या पण एक अशी घटना घडली ज्यामुळे पद्मिनी कोल्हापुरे ब्रिटनमध्येसुद्धा फेमस झाल्या होत्या. त्याबद्दलचा किस्सा आज जाणून घेऊया.
८० च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. सुरवातीला पद्मिनी कोल्हापुरे बॉलिवूडमध्ये आल्या होत्या. यादों कि बारात, किताब, दुष्मन दोस्त अशा सिनेमांमध्ये पद्मिनी कोल्हापुरे या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या. खरंतर पद्मिनी कोल्हापुरे या गायिका बनण्याच्या उद्देशाने आल्या होत्या पण पुढे त्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या.
पद्मिनी कोल्हापुरे यांची पहिली सुपरहिट फिल्म म्हणजे प्रेम रोग. या सिनेमाने त्यांना बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला. सौतन, सात दिन आणि प्यार झुकता नहीं हे पद्मिनी कोल्हापुरेंचे गाजलेले सिनेमे होते. पण या सुपरहिट सिनेमांच्या नादात एक मोठी घटना घडली आणि त्या ब्रिटनच्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या.
१९८० ची गोष्ट. प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आला होता. आता भारत दौऱ्यावर आलेल्या प्रिन्स चार्ल्सला सिनेमाची शूटिंग बघण्याची लहर आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी प्रिन्स चार्ल्सला मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये घेऊन जाण्यात आलं. तो स्टुडिओ होता राजकमल, याच स्टुडिओमध्ये तेव्हा पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आहिस्ता आहिस्ता या सिनेमाची शूटिंग सुरु होती.
प्रिन्स चार्ल्स आल्याची बातमी पद्मिनी कोल्हापुरे यांना कळताच त्या स्वतः प्रिन्स चार्ल्सला भेटायला गेल्या. तेव्हा अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्सची आरती वैगरे केली होती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी प्रिंस चार्ल्सला गालावर किस करत माळ घातली होती.
प्रिन्स चार्ल्सला किस करण्याची घटना लोकांच्या नजरेतून सुटली नाही. त्यावेळी भारतातल्या कुठल्याही अभिनेत्रीने किस करणं नॉर्मल मानलं जात नव्हतं. एव्हढच काय तर सिनेमात रोमान्सचा सिन आला तरी आपले बॉलिवुडवाले दोन फुलं दाखवून गेम ओव्हर करायचे. पण हि घटना मोठी होण्याचं कारण होतं कि प्रिन्स चार्ल्सचं लग्न तेव्हा झालेलं नव्हतं.
हे प्रकरण तेव्हा इतकं गाजलं कि याची चर्चा थेट ब्रिटनला गेली. एका मुलाखतीत पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितलं होतं कि त्या घटनेमुळे बऱ्याच ठिकाणी मला ऑकवर्ड फील झालं. पद्मिनी कोल्हापुरे सांगतात या किस प्रकरणानंतर माझं ग्रेट ब्रिटनला जाणं झालं तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने मला विचारलं होत कि प्रिन्स चार्ल्सला किस करणाऱ्या तुम्हीच का ? हे ऐकून पद्मिनी कोल्हापुरेंना तेव्हा लाजिरवाणं फील झालं होतं.
विदेशात हे किस करणं वैगरे नॉर्मल मानलं जात पण भारतीय मीडियाने या प्रकरणाला उगाच हवा दिल्याने हे प्रकरण गाजल्याचं पद्मिनी कोल्हापुरे म्हणतात. पुढे हे प्रकरण मागे पडलं आणि पद्मिनी कोल्हापुरे पुन्हा बॉलिवूड आणि मराठी सिनेमांमध्ये सुपरहिट सिनेमे देऊ लागल्या. ८० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री म्हणून पद्मिनी कोल्हापुरे प्रसिद्ध होत्या, पण या प्रकरणाने ब्रिटनमध्ये सुद्धा पद्मिनी कोल्हापूरेंची चर्चा झाली होती.
हे हि वाच भिडू :
- रडारडीचा विषय निघाला की आज पण “चिमणी पाखरं” आठवतो
- प्रिन्सेस डायनाच्या लग्नाला कोण जाणार म्हणून पंतप्रधान व राष्ट्रपतींमध्ये वाद झाला होता
- किंग बॉबीचे मिम्स फेमस करण्यामागे पाकिस्तानी चाहत्याचा हात आहे
- बारमधली आशिकी असो किंवा ट्रॅक्टरवर वाजणारा राझ, नव्वदीची पिढी त्यांना विसरणार नाही..