फक्त नमाजच्या कारणामुळे इंझमामने मिस्बाहला कित्येक वर्ष पाक टीमपासून दूर ठेवलं होतं..

मिस्बाह उल हक हे नाव वाचल्यावर डोळ्यासमोर येतो २००७चा वर्ल्डकप. भारत पाकिस्तान हा हायहोल्टेज अंतिम सामना.  मिस्बाह उल हकने आधीच मॅच पाकिस्तानकडे झुकवली होती. शेवटच्या षटकांत जोगिंदर शर्माच्या चेंडूवर त्याने उंचावर फटका मारला आणि श्रीशांतने तो कॅच पकडला आणि भारताने करंडक उंचावला.

बऱ्याच लोकांनी मिस्बाह उल हकलाच पाकिस्तानच्या हरण्याला जबाबदार ठरवले. इतकं चांगलं खेळून उगाच स्कुप शॉट खेळून संघाला हरवलं असेही आरोप त्याच्यावर करण्यात आले.

मिस्बाह उल हक जर संघात आला तर पाकिस्तान संघ बिघडेल अशी भीती इंझमाम उल हकला होती. त्यासाठी त्याने हर एक प्रकारचे प्रयत्न करून त्याला संघापासून दूर ठेवले होते. त्याबद्दलचा आजचा किस्सा.

इंझमाम उल हक हा पाकिस्तानचा यशस्वी कर्णधार होता. त्याला त्याच्या धर्माबद्दल असलेलं प्रेम हे सर्वश्रुत होत. त्याच्या अशा धार्मिकपणामुळे पाकिस्तान संघातले अनेक खेळाडू पब, पार्टी, बार वगैरेंच्या नादाला न लागता नमाज वर ध्यान देऊ लागले होते.

इंझमाम उल हक हा काही जास्त शिकला वगैरे नव्हता आणि त्याला कायम असं वाटायचं कि संघातली एकी जर टिकवायची असेल तर धर्म हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

पण ज्यावेळी मिस्बाह उल हकने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात प्रवेश केला तेव्हा इंझमामने त्याला जोवर तो कर्णधार होता तोवर त्याला खेळण्याची संधी दिली नाही , त्यामागे कारण होतं कि मिस्बाह हा MBA शिकलेला होता, उत्तम खेळत होता आणि त्याचे संघातल्या इतर खेळाडूंसोबत चांगले संबंध होते. मिस्बाहच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे इंझमामला भीती होती कि मिस्बाहच्या संघात येण्याने संघावरचा त्याचा संघावरचा कंट्रोल कमी होईल, खेळाडू मिस्बाहचं म्हणणं ऐकू लागेल, नमाज सोडून परत बार आणि पार्टीच्या नादी लागतील.

२००१ साली पाकिस्तानकडून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिस्बाह उल हकला २००६ साली दुसरी संधी मिळता मिळता राहिली. ओव्हल टेस्टमध्ये झालेल्या वादावरून इंझमाम उल हकवर चार सामन्यांचा बॅन लागला. यामुळे उपकर्णधार युनूस खान याला कर्णधार पद मिळालं. युनूस खानने थेट मिस्बाह उल हकला संघात खेळवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी निवड समितीने त्याची मागणी धुडकावून लावली आणि त्याला सांगितले कि,

३३ वर्षीय मिस्बाह हा एकदिवसीय सामन्यांसाठी म्हातारा खेळाडू आहे,

यावर युनूस खानने सरळ सरळ कर्णधारपदाचा राजीनामा देऊन टाकला. उत्तम खेळत असूनही इतके दिवस तो संघातून बाहेर होता.

२००७ साली वनडे विश्वचषक आणि टी-ट्वेन्टी विश्वचषक दोन्ही स्पर्धा झाल्या. वनडे विश्वचषकात पाकिस्तान अत्यंत वाईटरीतीने पराभूत झाला, त्यावेळी पाकिस्तानी संघात बऱ्याच गडबडी झाल्या, त्याला वैतागून इंझमाम उल हक कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि शोएब मलिकला कर्णधारपद सोपवलं.

शोएब मलिकने मिस्बाहला संघात घेतलं आणि त्यानेही विश्व्चषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पाकिस्तान संघासोबत मजल मारली. काही काळानंतर मिस्बाह उल हक स्वतः कर्णधार झाला आणि त्याने पुन्हा नव्याने पाकिस्तान संघाची बांधणी केली. सईद अजमल आणि यासिर शहा या दोन स्पिनर्सना घेऊन त्याने संघाला अनेक विजय मिळवून दिले.

मिस्बाह उल हक सोशल मीडियावर मात्र त्याने शतक झळकावण्याआधी प्रचंड ट्रोल होत होता. त्याच्यावर एक ट्रेंडही आला होता. ज्या ज्या वेळी त्याला शतक कधी मारणार असं विचारलं जायचं तेव्हा त्याला ट्रोल करण्यासाठी लोकांनी व्हिडिओमध्ये एक गाणं ऍड केलं होतं ते गाणं प्रसिद्ध गायक अत्ताउल्लाह खान यांचं

आप वो बात क्यू पुछतें हे, जो बताने के काबील नहीं….

यावरचा व्हिडिओही बराच गाजला होता.

इंझमाम उल हकच्या धार्मिक धोरणामुळे त्याला क्रिकेट क्षेत्रापासून लांब ठेवण्यात आलं आणि यामुळे पाकिस्तान क्रिकेटचं खूप मोठं नुकसान झालं असं पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरांनी सांगितलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.