नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या समता परिषदेमुळेच भुजबळ राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकले

दिनांक १ नोव्हेंबर १९९२……

याच दिवशी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची स्थापना करण्यात आली. याच समता परिषदेमुळे भुजबळ राष्ट्रीय स्तरावरचे नेते झाले. 

या समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना इथं पार पडला. या मेळाव्याच्या  अध्यक्षपदी शरद पवार होते. तर प्रमुख पाहुणे देशाचे तत्कालीन समाजकल्याण मंत्री सिताराम केसरी, महाराष्ट्रातील तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, मंत्री शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड यांच्यासह देशातील विविध मान्यवरांसह सुमारे २ लाखांहून जास्त सदस्य उपस्थित होते.

जालना इथं झालेल्या या मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यानंतर १९९४ साली शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला हे या पहिलं यश होतं.

मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा १९९४ साली अमरावती इथं शरद पवार आणि तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न झाला. या मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानण्यात आले.

पुढं मराठवाडा विद्यापीठाची नामांतराची मागणी सुद्धा समता परिषदेने लावून धरली होती. 

मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली. जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या त्यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सदस्यांनी मराठवाड्यातील गावांगावात जाऊन जातीय सलोखो निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. त्यात समता परिषदेला यश देखील मिळाले.

सन १९९५ साली युतीची सत्ता असतांना पुण्यात बाबुराव सनस मैदानावर मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षपदी शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर नागपूरात समता परिषदेने मेळावा घेतला.

याच मेळाव्यात शरद पवार यांनी राज्यपातळी बरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्या असं सांगितलं.

याचाच परिपाक म्हणून लगेचच २००५ मध्ये दिल्लीतल्या रामलीला मैदानावर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थामध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या मेळाव्यात लालू प्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच ५ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते.

याचा परिणाम देशपातळीवर ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ प्रकाश झोतात आले. 

२००६ नंतर समता परिषदेचे मेळावे देशभरात घेण्यात येऊ लागले. 

२००६ मध्ये बिहार मधील गांधी मैदान येथे तत्कालीन मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास ७ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. २००६ साली छगन भुजबळ यांच्या उपस्थित गोवा येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास ६० हजारांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. २००८ मध्ये राजस्थान जयपूर येथील विद्याधर स्टेडियम येथे कृषी मंत्री प्रभुलाल सैनी यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ३ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. त्यानंतर हैद्राबाद मेळावा २०११ मध्ये ‘हजारीबाग झारखंड’ येथे घेण्यात याला. 

५ जानेवारी २०१५ मध्ये मध्यप्रदेश सतना इथं मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उपेंद्र कुशवाह, खासदार राजकुमार सैनी, स्वामी प्रसाद मोर्य यांच्यासह १ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. सन २०१६ मध्ये ‘दतिया’ मध्यप्रदेश येथे मेळावा घेण्यात आला.

सुरुवातीला समता परिषद असं नाव असलेल्या या चळवळीचं नामकरण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असं करण्यात आलं. गेल्या ३० वर्षापासून ही संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून गेल्या १७ वर्षापासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवीत येत आहे.

अखिल भारतीय समता परिषद देशभरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, झारखंड, उत्तरांखंड, बिहार, नवी दिल्ली, हरियाना, पंजाब,कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश येथे सामाजिक कार्य करत आहे. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, बिहार, या राज्यात लाखोंच्या संख्येने सदस्य सक्रीय आहेत.

समता परिषदेच मुख्य काम म्हणजे महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हेच होतं. पण आज समता परिषद त्याही पुढे पोहोचली आहे. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.