संजय गांधींची कृपा ! दिल्लीचं विमान मुंबईत उतरलंच नाही आणि अंतुले मुख्यमंत्री झाले

राजकारणात बरीच मंडळी मोठीमोठी स्वप्न घेऊन येतात. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री होणं हा प्रत्येक राजकारण्याचा जिव्हाळ्याचा विषय ! मग यासाठी किती ही उसाभर करावी लागली तरी बेहत्तर. पदासाठी कायपण. अशाच एका नेत्याने मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून दिल्लीहून निघालेलं विमान मुंबईत उतरु दिलं नव्हतं. हे प्रस्थ होतं बॅरिस्टर अंतुले !

तेव्हा तर पक्षाच्या हायकमांडने त्यांना आमदारकीचं तिकीट देखील दिलं नव्हतं. पण निकाल लागल्यानंतर त्यांना थेट महाराष्ट्राच मुख्यमंत्री केलं त्याचाच हा किस्सा. 

तर काळ होता १९८० चा. महाराष्ट्रात शरद पवारांनी पुलोद स्थापन केल होतं. इंदिरांनी पुलोदचा कार्यक्रम केला. यशवंतराव, शरद पवार अशी मात्तब्बर मंडळी एस कॉंग्रेसमध्ये होती. तर कॉंग्रेसमध्ये वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, प्रतिभाताई पाटील अशी मंडळी होती. प्रतिभाताई तेव्हा विरोधी पक्ष नेत्या होत्या तर अंतुले कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभेचे खासदार होते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुकींचे पडघम वाजू लागले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रेमला काकी चव्हाण संभाव्य उमेदवारांची यादी घेवून इंदिरा गांधींना भेटण्यासाठी गेल्या. सोबत बॅरिस्टर अंतुले देखील होते. इंदिरा गांधींनी ओळीने नावं वाचली. श्रीवर्धन मधून उमेदवारांच्या यादीत अंतुले यांच नाव होतं. इंदिरा गांधींनी अंतुलेंना विचारलं,

“तुम्ही तर राज्यसभेचे खासदार. मग आमदार होण्यात काय इंटरेस्ट”.

अंतुलेंना प्रश्नाचा योग्य रोख कळल्यानं अंतुले शांतच बसले असावेत. तात्काळ इंदिरांनी श्रीवर्धनच्या जागेवरुन अंतुलेंच नाव खोडलं आणि अंतुलेंच्या पसंतीचा उमेदवार तिथून उभा करण्याचे आदेश दिले. यादी डिक्लेर झाली. अंतुले श्रीवर्धन मधून लढणार याची माहिती माध्यमांना होती. पण यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. अंतुलेंचे पंख कापण्याच काम कॉंग्रेसच्या हायकमांडने केल्याची चर्चा सुरू झाली.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तेव्हा वंसतदादा पाटील आणि प्रतिभाताई होत्या. अंतुले राज्यसभेवरच असल्याने त्यांचा राज्याच्या निवडणुकीत सहभाग राहिला नाही. दादांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने लढाई लढली. सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो अंतर्गत विरोध वाढण्याचा. पण अंतुलेच नसल्याकारणाने निवडणुकांचा प्रचार हायकमांडच्या इच्छेप्रमाणे पार पडला. निकाल लागला. देशाप्रमाणे राज्यात देखील इंदिरा सरकार चाललं. कॉंग्रेस आय ने कमाल केली. पण आत्ता महत्वाचा प्रश्न होता, तो मुख्यमंत्री पदाचा.

पुढचा मुख्यमंत्री मीच म्हणून वसंतदादांनी शड्डू ठोकला होता. प्रतिभाताई पाटील देखील रेस मध्ये होत्या. वसंतदादा तेव्हा जाहिरपणे सांगत,

“तो अंतुले मुख्यमंत्री होत नसतो”.

वसंतदादा आणि प्रतिभाताईंचा समझोता झाला. दोघांनी एकत्र इंदिरा गांधींना भेटायचं. एकमेकांच्या नावांना पाठिंबा द्यायचा.

तुम्ही किंवा मी.

दादा इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला गेले तर अंतुले दिल्लीवरुन मुंबईला आले. दादांनी इंदिरांना सांगितलं प्रतिभाताईंना मी मुख्यमंत्री झालो तर काहीच अडचण नाही. त्या झाल्या तर मला अडचण नाही. इंदिरा म्हणाल्या तुम्ही दोघं झालात तरी मला अडचण नाही फक्त एक काम करा, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या आमदारांच अनुमोदन आणा.

दादा तातडीने मुंबईला आले. पण नशिबाने म्हणा किंवा कमनशिबाने अंतुलेंच विमान दिल्लीवर त्यांच्या अगोदर लॅंण्ड झालं होतं. 

खरं तर आणीबाणीनंतर जेव्हा जनता सरकार इंदिरा गांधी यांच्यामागे हात धुऊन मागे लागलं होत तेव्हा अंतुले इंदिरा गांधी यांच्या मागे ठामपणे उभे होते. राज्यसभेत काँग्रेसची भूमिका मांडत होते. याचाच परिणाम इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या मनात अंतुले हेच मुख्यमंत्री होणार ठरलं होत.

पण अंतुलेंना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटेल, अशी भीती दादांनी घातली होती. परिणामी इंदिरा गांधी यांच्या मनात वेगळा विचार आला. सीताराम केसरी निरीक्षक म्हणून मुंबईत दाखल झाले होते. त्यांचा एक दिवस सकाळी फोन आला आणि अंतुलेंच नाव मागे पडण्याची शक्यता असल्याबद्दल त्यांनी अंतुलेंना सावध केले.

अंतुलेंनी तात्काळ संजय गांधी यांना फोन केला आणि परिस्थिती सांगितली. यावर संजय गांधी म्हंटले

आता बदल नाही. तुम्हीच मुख्यमंत्री होणार!

पण इकडे तर इंदिरा गांधी यांनी तत्कालीन हवाई वाहतूकमंत्री ए. के. शर्मा यांना निरीक्षक म्हणून मुंबईला धाडल. ते विमानाने मुंबईला निघाल्याचे समजताच ही बाब अंतुलेंना समजली आणि त्यांनी ती संजय गांधी यांना सांगितली. संजय गांधी यांनी नवी दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून शर्मा यांच विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलाविले. विशेष म्हणजे तेव्हा शर्मा यांच विमान मुंबईच्या जवळ आले होते. शर्मा यांच विमान मुंबईत उतरलंच नाही.

आणि अंतुले मुख्यमंत्री झाले. 

पण चर्चा रंगली ती मुस्लीम माणसाला महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्री कस करण्यात आलं याची. इंदिरा गांधींनी अगोदरच अंतुलेंना लढायला लावलं असत तर दादा गटाबरोबर मराठा व इतर समाजघटक देखील नाराज झाले असते. पण गांधींनी अंतुलेंना शांत डोक्यानेच पहिला मुस्लीम मुख्यमंत्री करायचं ठरवल्याच बोललं जातं. कधीकधी चांगल्या गोष्टीसाठी देखील तिकीट कापलं जावू शकतं इतकच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.