सेनेमुळे शरद पवारांना महाराष्ट्रात होणारा ह्युंडाई प्रकल्प तामिळनाडूला सोडावा लागला…

फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्यात तू तू मैं मैं सुरू झाली. काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले. यामध्ये ते म्हणाले एकदा प्रकल्प गेला की गेला. सोबत राजकीय संदर्भ सांगत असताना त्यांना जुन्या गोष्टींच्या आठवणी काढल्या. महाराष्ट्र गुंतवणूकीत मागे पडत असल्याचं भाष्य देखील केलं.. आपल्या कारकिर्दीत कोणत्या गोष्टी झाल्या हे देखील सांगितलं.. 

असेच काही किस्से जे शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, किंवा त्यांचा सहभाग असताना महाराष्ट्रातल्या गुंतवणूकीबाबत घडलेले.. 

पहिला किस्सा शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटले.. 

 1991 पूर्वी देशात लायसन्स राज होतं. परकिय गुंतवणूकीला परवानगी नव्हती. मात्र मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या पुढाकारातून भारताने अर्थव्यवस्थेला 180 अंशाचा टर्न घेत उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. अशा वेळी परकिय कंपन्यांना आकर्षित करुन घेण्यासाठी प्रत्येक राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्या.. 

यातलीच प्रमुख राज्ये होती ती महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात.. 

88 ते 91 आणि मार्च 93 ते 95 या काळात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर1990 ते 94 या काळात गुजरातचे मुख्यमंत्री होते चिमणभाई पटेल. महाराष्ट्रासोबत गुजरात देखील परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्पर्धेत असायचा. मात्र महाराष्ट्रातल्या शहरीकरणासोबत गुजरातच्या शहरीकरणाची तुलना होत नव्हती. महाराष्ट्राने खाजगी संस्थांना तंत्रशिक्षण देण्यास अनुमती दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात इंजिनियर झालेले तरुण होते, कुशल मनुष्यबळ आणि सोईसुविधा होत्या. 

मात्र अशा वेळी गुजरात स्पर्धेत राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे काही प्रमुख उद्योग गुजरातला जावू लागले. अशा वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटले यांच्यात एक अलिखित करार झाला. जे लहान प्रकल्प असतील ते महाराष्ट्राने गुजरातसाठी सोडायचे आणि जे मोठ्ठे प्रकल्प असतील ते गुजरातने महाराष्ट्रासाठी सोडायचे.

या अलिखित सामंज्यस्यामुळे दोन्ही राज्यांचा फायदा होणार होता. एकतर लहान प्रकल्पांना आकर्षित करून घेण्याच्या स्पर्धेतून महाराष्ट्र बाजूला होणार होता आणि दूसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रकल्पांना आकर्षित करुन घेण्यासाठी गुजरात स्पर्धेत नसणार होता. त्यामुळे मोठ्या उद्योगांसोबत महाराष्ट्राला आपल्या अटी व नियमांनुसार व्यवहार करणं सोप्प ठरणार होतं. हा करार दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपआपसाल्या अंडरस्टॅण्डिंगने मांडला आणि आपल्या राज्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.. 

दूसरा किस्सा शरद पवारांच्या हातून सत्ता गेल्यानंतरचा.. 

1995 साली महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारून पाच वर्ष झालेली. त्या काळात भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात तुलनेत खूप कमी स्पर्धा होती. मात्र दूसरीकडे ग्राहकांची संख्या वाढत होती. 1995 च्या काळात भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील मिड सेगमेंटमध्ये मारूती सुझूकी, हिंदूस्थान, प्रिमियर, टाटा, मंहिद्रा आणि दायवो याच प्रमुख कंपन्या होत्या. त्यापैकी मारूतीसोबत आलेली सुझूकी ही जापनीझ आणि दायवो ही कोरियन कंपनी भारतात होती.. 

सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून मारूती 800 चा उल्लेख होत असे. अशा वेळी भारताची मोठ्ठी बाजारपेठ ह्युंडाई कंपनीला खूणावत होती. ह्यूंडाई यांनी आपला प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी जागा शोधण्यास सुरवात केली. व त्यासाठी सर्वात पहिली पसंद तोही ती महाराष्ट्राची.. 

महाराष्ट्रातल्या चाकण येथे ऑटोहब विकसित होत होतं. बजाज यांचा प्लॅन्ट इथेच होता. मर्सडिझ सारखी कंपनी देखील 1994 साली चाकण येथे आली होती. भारतात प्लॅन उभा करण्यासाठी कंपनीला पुण्याची जागा सर्वात योग्य होती.. 

दूसरं कारण होतं ते म्हणजे शरद पवारांशी असणारे व्यक्तिगत संबंध. शरद पवार आणि ह्युंडाई ग्रुपचे अध्यक्ष चांग से यंग यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे भारतात जेव्हा हातपाय पसरण्याची वेळ आली तेव्हा चांग से यंग यांनी सर्वात प्रथम संपर्क केला तो शरद पवारांना.. 

मात्र शरद पवार तेव्हा सत्तेतून बाहेर गेले होते. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर बाळासाहेब ठाकरेंच्या हाती सत्तेची सुत्र होती. शरद पवारांनी स्वत:हून महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पवारांनी स्वत: चांग से यंग यांना महाराष्ट्रात आणून चाकणचा बजाजचा प्लॅन्ट दाखवला.. 

त्यानंतर शरद पवारांनी ह्युडांईचे अध्यक्ष चांग से यंग यांची बाळासाहेब ठाकरे व मनोहर जोशींची भेट घालून दिली.. 

ह्युडांई महाराष्ट्रात येणार यावर जवळपास निश्चिती झाली. मात्र कोणत्याच हालचाली सुरु झाल्या नाहीत. काही दिवसांनी चांग से यंग यांनी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू होईल याबद्दल शाश्वती वाटत नाही असा निरोप पवारांना दिला.. 

सरकारमार्फत योग्य त्या हालचाली होत नसल्याचं पवारांच्या लक्षात आलं. त्यानंतर शरद पवारांनी जयललिता यांच्याशी संपर्क साधला. तामिळनाडू सरकारने तात्काळ पाठपुरावा केला आणि ह्युडांई इंडिया या कंपनीचा प्लॅन्ट चैन्नई शेजारी असणाऱ्या इरंगट्टूकोट्टई आणि श्रीपंरबदूर येथे उभारण्यात आला. दिनांक 23 सप्टेंबर 1998 रोजी या प्लॅन्टमधून ह्युडांईची पहिली कार सेन्ट्रो तयार होवून बाहेर पडली.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.