या ५ कारणांमुळं उद्धव ठाकरेंना अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जिंकणं फायद्याचं ठरु शकतं

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये  शिवसेना  ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके  यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल भडकली आणि भगवा फडकला अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यात एकूण तीन पोटनिवडणूका झाल्या. देगलूर ची पहिली पोटनिवडणूक कॉंग्रेसने जिंकली, त्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने व त्यानंतरची कोल्हापूर दक्षिणची पोटनिवडणूक कॉंग्रेसने जिंकली. पैकी देगलूर आणि कोल्हापूर दक्षिणचे पुर्वीचे उमेदवार कॉंग्रेसचेच होते. मात्र पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे होती. भाजपला ही जागा खेचून घेण्यात यश मिळालं होत. 

नव्या सत्तासमीकरणांमध्ये ही पहिलीच पोटनिवडणूक झाली. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची झाली होती. कोणत्याही परिस्थितीत अंधेरी पुर्व पोटनिवडणूक उद्धव ठाकरेंसाठी जिंकण गरजेचं होत. अस का सांगण्यात आले त्याची काही प्रमुख कारणं ही आहेत. 

1) जनतेचा कौल कोणाकडे हे दाखवून देणं 

उद्धव ठाकरेंनी भाजप सेना युतीला दिलेलं बहुमत नाकारात कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या तीनही पोटनिवडणूका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढण्यात आल्या. मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय पक्षातील बहुसंख्य आमदारांना मान्य नाही या कारणामुळे सेनेत अभूतपुर्व फुट पडली.

एकीकडे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर जनादेश न पाळल्याचा आरोप करतात तर दूसरीकडे उद्धव ठाकरे देखील असाच आरोप करतात. अशा वेळी लोकांच्यात जावून खऱ्या अर्थाने जनादेश घेण्याचा पर्याय राहतो. अंधेरी पुर्वची पोटनिवडणूक देखील जनादेश कोणाच्या बाजूने आहे यासाठी लिटमस टेस्ट म्हणून पाहिली जात होती. उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली. त्यामुळे इथून पुढे जनतेचा कौल आपल्या बाजूने असल्याचा प्रचार ठाकरेंना करता येणार आहे,

2) कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सहकार्य 

अंधेरी पुर्व हा मतदारसंघ पारंपारिक कॉंग्रेसचा समजला जातचा. २०१९ च्या निवडणूकीत २८ हजार इतकी मत मिळवण्यात कॉंग्रेसचे उमेदवार यशस्वी झाले होते. कॉंग्रेस विरुद्ध सेना अशी या मतदारसंघाची पारंपारिक लढत. अंधेरी पुर्वच्या निमित्ताने कॉंग्रेसने ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे.  त्यामुळे कॉंग्रेसची किमान २० हजार मते मिळविले गरजेचे होते.  कॉंग्रेसने प्रत्यक्ष मैदानात उद्धव ठाकरेंना मदत केली असल्याचे या पोटनिवडणुकीतून दिसून येते. यामुळे पुढे महाविकास आघाडीच्या बॅनरखाली राज्यातील विधानसभा निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल. 

3) आगामी मुंबई महानगरपालिका 

शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडलं असलं तरी प्रत्यक्ष मुंबईत डॅमेज कंट्रोल करण्यात ठाकरेंना यश मिळालं आहे. ठाकरेंच्याकडे सहानभुती जात असून त्याचा प्रत्यक्ष फायदा निवडणूकीत झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा फायदा ठाकरेंना येत्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये होणार आहे. 

मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंसाठी सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे, जर का मुंबई महानगरपालिका हातून गेली तर उद्धव ठाकरेंची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली अस म्हणावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडवायचा यासाठी भाजपने प्लॅन आखला आहे. अशा वेळी अंदाज म्हणून अंधेरी पुर्व ची पोटनिवडणूक उद्धव ठाकरेंसाठी महत्वाची होती.

4) मशाल चिन्हावर लोकांचा विश्वास 

शेवटच्या घटकांपर्यन्त पक्षाचं नवं नाव आणि पक्षाचं नवं चिन्ह घेवून जाण्याची जबाबदारी ठाकरेंवर आहे. धनुष्यबाणाशिवाय होणारी हि पहिली निवडणूक होती. अशा वेळी मशाल चिन्हाचा शिवसैनिकांकडून किती खुबीने केला.

शिवसेना मुळात ओळखली जाते ती आपल्या क्रेएटिव्हिटीसाठी. भिंतीवर लिहल्या जाणाऱ्या घोषणा हा शिवसेना सर्वात प्लस पॉईन्ट होता. त्यामुळे धनुष्यबाण घराघरात पोहचू शकला. आत्ता मात्र मशाल चिन्ह घेवून जाण्यामध्ये अनेक मर्यादा होत्या. मात्र या विजयातून उद्धव ठाकरेंनी यशस्वी प्रचार केला अस म्हणावं लागेल. 

5) कायदेशीर पेचप्रसंग 

एका पोटनिवडणूकीमुळे अधिक फरक पडत नसला तरी आजही पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही पदाधिकारी दोन्ही ठिकाणच्या व्यासपीठांवर दिसतात तर काही पदाधिकाऱ्यांनी दोन्हीकडे न जाता थंड होवून खाण्याची निती वापरली आहे.

अशा वेळी खरी शिवसेना कोणाची हा कस निवडणूक आयोगापुढे लावण्यात येणार आहे. आमदार व खासदारांच्या संख्येत एकनाथ शिंदे पुढे असले तरी प्रत्यक्ष पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरेंना दाखवून द्यावं लागणार आहे. 

अशा वेळी अंधेरी पोटनिवडणूकीतला विजय उद्धव ठाकरेंसाठी प्लस पॉईन्ट ठरू शकतो. त्यामुळे काठावरचे अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

या व अशा गोष्टींमुळेच उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जिंकणं फायद्याचं ठरु शकतं

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.