या कारणांमुळे ठामपणे सांगता येईल गडचिरोलीतील नक्षलवादी घटना कमी झाल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी दिवाळी लष्करासोबत साजरी करत असतात. तोच कित्ता यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवत आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्यतील भामरागड येथील आऊटपोस्ट येथे असणाऱ्या पोलिसांसोबत साजरी करत आहे.

त्यापूर्वी नागपूर येथे आले असता एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नक्षलवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे गडचिरोलीचा विकास होतोय. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचं लक्ष असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला करण्यात येत आहे की, खरच देशातील नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या आहेत; मुख्यमंत्री म्हणतात तसं गडचिरोतील नक्षलवाद कमी होण्याची काय कारण आहेत. 

या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली आकडेवारी पाहुयात 

नक्षलवादी चळवळ ही दहशतवाद्यांपेक्षा डेंजर समजली जाते. २००९ च्या तुलनेत विचार केला तर २०२१ मध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया ७७ टक्क्यांनी घटल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राज्य सभेत एका प्रश्नाला उत्तरं देतांना सांगण्यात आले आहे.

याच बरोबर नक्षलवाद्यांमुळे होणारी मनुष्यहानी ८५ टक्क्यांनी कमी झाली आहे. यात पोलिसांबरोबरच सामान्य नागरिकांचा सुद्धा समावेश आहे. २०१० मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस आणि सर्व सामान्य नागरिक अशा १ हजार ५ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२१ मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १४७ जणांचा मृत्यू झाला.  

देशातील ६ राज्यात नक्षलवादी कारवाई कमी झाले आहे. त्यात छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, ओडिसा आणि बिहार यांचा समावेश आहे. २०१० मध्ये देशातील ९६ जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ सक्रिय होती. तर २०२१ मध्ये ही संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. सध्या नक्षलवादी चळवळ देशातील ४६ जिल्ह्यात सक्रिय आहे. हे झालं देशातील. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे घरच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कमी झाले आहेत का? 

सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दलमची संख्या १८० वरून  १२० पर्यंत खाली आहे. तर यातील फक्त १० ते २० दलम सक्रिय असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच गडचिरोली पोलिसांच्या माहिती नुसार मागच्या काही वर्षात नक्षलवादी चळवळीत नवीन भरती झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नक्षलवाद्यांची ताकत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

याच कारण म्हणजे पोलिसांच्या इनकॉउंटर मध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या लीडरचा झालेला खातमा, अटक, अनेक नक्षलवादी आपले शस्त्रे खाली टाकून मुख्य प्रवाहात येत आहेत. मागच्या २ वर्षांत गडचिरोली पोलिसांनी ५४ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.  २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२२ या ५ वर्षांच्या कार्यकाळात १९६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर ९० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर समर्पण केले आहे. 

गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवाद्यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याचा मृत्यू.  

 १३ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी नक्षलवाद्यांची चकमक झाली होती. यात २६ नक्षलवादी ठार झाले होते.  सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला.

गेल्या अनेक वर्षांपासून तेलतुमडे भूमिगत होता. मोस्ट वाँटेड नक्षलवादी आणि मास्टर माईंड म्हणून मिलिंद तेलतुंडे याचे नाव घेतले जात होते. माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य व महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड झोनचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. भूमिगत राहून शहरी भागात नक्षलवादी चळवळीचा सहभाग वाढवण्यात मिलिंदचा मोठा सहभाग होता.  

गडचिरोली, गोंदिया, बालाघाट व राजनांदगाव या जिल्हय़ांमध्ये पोलिसांच्या हालचालीचे बारकाईने विश्लेषण करून त्याच्यावर मोठे मोठे हल्ले, ब्लास्टींग व हिंसक घटना घडवून आणण्याबाबत नियोजन करणे व अंमलात आणणे यात मिलिंद तेलतुंबडेचा हातखंड होता. 

मिलिंद याच्यावर ५० लाखांचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडे यांच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळी समोर अनेक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मुख्य म्हणजे मिलींद गडचिरोली भागात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. 

मागच्या काही वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकही नवीन नक्षलवादी भरती झाली नाही. याच कारण म्हणजे पोलिसांचा तरुणांशी असलेला कॅनेक्ट आणि त्यांच्यासाठी करण्यात येत असलेली रोजगार भरती.  जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ दोन वर्षांत ५ हजार ८१४ तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल, नर्सिंग, व्यवसाय विकास आणि इतर क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सुधारणे हे देखील नक्षलग्रस्त भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत अनेक रस्ते आणि पूल बांधण्यात असल्याने आपल्या भागात विकास होत असल्याची भावना स्थानिक तरुणांमध्ये आहे.

 या कारणांमुळे ठामपणे सांगता येईल गडचिरोलीतील नक्षलवादी घटना कमी झाल्या आहेत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.