रक्तदानापासून सुरुवात करणाऱ्या बच्चू कडूंचे प्रत्येक आंदोलन त्यांचे वेगेळेपण दाखवून देते

गेल्या काही आठवड्यांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. दोघेही शिंदे फडणवीस सरकारमध्ये असताना सुद्धा विरोधकांप्रमाणे एकमेकांवर बेछूट आरोपांची फैरीच दोघांनी झाडल्या. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. 

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात मध्यस्थी केली. मध्यस्थीनंतर रवी राणांनी या वादातून माघार घेतली.

यानंतर आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावती येथे मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते म्हणाले की,  प्रहार काही आंडू पांडूचा पक्ष नाही, आम्ही संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत. आम्ही कोणाच्या वाटाल्या जात नाही आणि कोणी वाट्याला गेलं तर त्याचा कोथळा काढल्या शिवाय राहत नाही. विनाकारणा तोंड माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही, सत्तेची आम्हाला परवा नाही. मी २० वर्ष ३५० गुन्हे घेऊन प्रवास केला असल्याचे म्हटले. 

यावेळी  रवी राणा यांच्याशी सुरू असलेल्या  वादावर बच्चू कडू म्हणाले की, 

ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही”, असा इशारा त्यांनी रवी राणा यांना दिला. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले.

अमरावती येथे घेण्यात आलेल्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यात दिव्यांग व्यक्तीची संख्या मोठी. अगदी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या बच्चू कडू यांना कुटुंबाकडून कोणताच राजकीय वारसा नाही, पण दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे बच्चू कडू यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते सलग ४ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 

पण सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या बच्चू कडू यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता  राज्यात इतक्या मोठया प्रमाणात लाइमलाईट मध्ये कशे आले ?   

तर याचं कारण आहे बच्चू कडू यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामध्ये आहे. बच्चू कडू यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी ते ज्या कारणामुळे राजकारणात आले ते आधी समजून घ्यावं लागेल. 

१९९०-९१ च्या दरम्यान कबड्डी खेळात असतांना कडू यांच्या मित्राला रक्ताची उलटी झाली. तब्येत सिरीयस झाल्यामुळे मित्राला रक्त चढवण्याची वेळ आली. तेव्हा बच्चू कडू यांनी मित्रासाठी रक्तदान केलं. रक्तदानाच्या या घटनेनंतर जवळपासच्या भागात कोणत्या रुग्णाला रक्ताची गरज असेल तर ते बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधायला लागले. त्यानंतर येईल त्याला मदत करण्याचे काम ते करू लागेल. 

दरम्यानच्या काळात बच्चू कडू यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रभाव वाढू लागला होता. 

याच प्रभावामुळे बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. १९९७ मध्ये ते चांदुर बाजार पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून गेले. एवढंच नाही तर वयाच्या २५ व्या वर्षीच ते चांदुर बाजार पंचायत समितीचे सभापती झाले होते.

सभापती असतांना बच्चू कडू यांनी पंचायत समितीत झालेला शौचालय घोटाळा उघडकीस आणला होता. उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे बच्चू कडू यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र लवकरच त्यांचे सेनेतील स्थानिक नेत्यांसोबत खटके उडायला लागले होते. 

त्याचं कारण असं होतं की, 

अपंगांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानामध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्या निधीअंतर्गत अपंगांना सायकल वाटण्याची योजना बच्चू कडू यांनी बनवली होती, पण इतर नेत्यांनी याला विरोध केला. या विरोधामुळेच बच्चू कडू यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. 

शिवसेना सोडल्यानंतर १९९९ मध्ये बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. नवीन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्यांसाठी वेगवगेळ्या पद्धतीची आंदोलनं करण्याला सुरुवात केली. 

आर. आर. पाटील गृहमंत्री असताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन अर्धदफन आंदोलन केलं होतं. अर्धदफन आंदोलनासोबतच स्वतःला झाडाला उलटं टांगून घेऊन आंदोलन करण्याचा प्रकार सुद्धा कडू यांनीच सुरु केल्याचे सांगितलं जाते. बच्चू कडू यांनी आदिवासी समाजातील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या खावटी योजनेत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी खावटी आंदोलन केलं. 

बच्चू कडू यांनी एकदा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये बाईक रॅली काढली होती. 

तर एकदा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या तासगावच्या घरासमोर असलेल्या विहिरीत बसून आंदोलन केलं होत. या तुफान आंदोलनासोबतच एकदा मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन अडवून आंदोलन केलं होतं.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा, सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडून आंदोलन करणे, नागपुरात पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन, सरकारी कार्यालयावर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन या आंदोलनामुळे बच्चू कडू यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

या आंदोलनामुळेच बच्चू कडू यांची शेतकरी आणि दिव्यांगांचा कैवारी अशी ओळख निर्माण झाली.  

याच आंदोलनांमुळे बच्चू कडू हे ४ वेळेस अचलपूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र लवकरच स्वतःच्या आंदोलनांमुळे चर्चेत आल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. 

परंतु २००४ साली लोकसभेच्या पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं. २००४ मध्ये बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख यांना हरवून अचलपूर मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात घेतला. तेव्हापासून आज पर्यंत बच्चू कडू हेच अचलपूर मतदार संघातुन निवडून येत आहेत. 

आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेल्या बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यामुळे प्रसिद्धी मिळत गेली. 

अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यामुळे बच्चू कडू वादात सापडलेले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भा. रा. गावित यांना मारहाण केली होती. तर २०२१ मध्ये अकोला रुग्णालयातील स्वयंपाक्याला बच्चू कडू यांनी मारहाण केली होती. 

सरकारी अधिकाऱ्यांकडून सामान्य व्यक्तीचे काम वेळेवर पूर्ण केले जात नाहीत. त्यामुळे अनेकदा वाद होतात. अशावेळी बच्चू कडू यांच्या कडून साप सोडण्या सारखे आंदोलन करतात.  त्यामुळे लोकांमध्ये बच्चू कडू यांच्याबद्दल एक प्रकारची क्रेझ निर्माण झाली आहे असे विश्लेषक सांगतात. 

पारंपरिक आंदोलनाच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या अफलातून आंदोलनामुळे बच्चू कडू यांना राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. आजच्या घडीला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे २ आमदार आहेत. यासोबतच विदर्भातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सुद्धा आहेत.  

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.