मध्यप्रदेशच्या राज्यपालांनी पुण्याच्या मारुतीचं नाव डुल्या मारुती केलं..

पुणे तिथं काय उणे असं म्हणतात. बाकी काय उणे असेल नसेल पण इथं देवांची कमी मात्र नक्कीच नाही.

सदाशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ असे पुण्यात एकूण सतरा पेठा आहेत. १८१० साली केलेल्या नोंदीनुसार या सगळ्या पेठांमध्ये एकूण चारशेच्या वर मन्दिरे होती. यात गेल्या दोनशे वर्षात वाढच झाली. आताचा आकडा नक्की माहित नाही.

पण पेशव्यांच्या काळातल्या देवळांचा थाटचं निराळा होता हे खरं!!

पुण्याच्या देवांची नावेही एकदम पुणेरी वळणाप्रमाणे तिरकस आणि युनिक आहेत. पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा ,दाढीवाला दत्त, जिलब्या मारुती, पानमोड्या म्हसोबा, साधे गणपती म्हटलं तरी गुंडाचा गणपती, गुपचूप गणपती, चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मद्रासी गणपती असे हजार प्रकारचे गणपती आहेत.

पण आज आपण चर्चा करणार आहे डुल्या मारुतीबद्दल.

गणेश पेठेतून लक्ष्मीरोडला गेलं तर मध्येच हे पेशवे कालीन दगडी मंदिर आहे. त्यात पाच फूट उंचीचा काळाकभिन्न डुल्या मारुती उभा असलेला दिसेल. हे मंदिर जवळपास ३०० वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं.

असं म्हणतात की पुण्याच्या पेठांमध्ये जेवढे गल्लीबोळ आहेत तेवढ्याच आख्यायिका देखील आहेत. तशाच आख्यायिका या डुल्या मारुतीबद्दल देखील सांगण्यात येतात.

सगळ्यात पहिली आणि फेमस आख्यायिका आहे पानिपतच्या युद्धाबद्दल. पानिपताच्या युद्धाला जाण्यापूर्वी पेशव्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ या मारुतीचा आशीर्वाद घेऊन गेले होते. पण युद्धात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारतावर अस्मानी संकट बनून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या अफगाणी सेनेपुढे आपला टिकाव लागला नाही.

स्वतः पेशवेपुत्र विश्वासराव गोळी लागून धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यावर बेभान झालेले सदाशिवराव युद्धभूमीवर घुसले ते पुढे त्यांचं काय झालं याचा पत्ताच लागला नाही. त्यांच्या जाण्याने पेशवाई सेनेचा धीर खचला. अफगाण्यांनी लाखो सैनिकांची कत्तल केली.

पुण्यात असं सांगितलं जात कि पानिपतची लढाई झाली त्या दिवशी संक्रांतीचा दिवस होता आणि तो रक्त पात सुरु झाल्यावर ही गणेश पेठेतली मारुतीची मूर्ती यातनेने थरथर कापू लागली. त्यामुळेच या मारुतीला डुल्या मारुती म्हटलं जाऊ लागलं.

दुसरी थिएरी अशी आहे म्हणतात की जेव्हा दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांच्या विरोधात युद्ध हरत होते तेव्हा त्यांनी पुणे सोडून जावे का या बद्दल या मारुतीला कौल लावला आणि चक्क या मारुतीने मान डोलावून त्याला मान्यता दिली.

मान डोलावणारा मारुती तो डुल्या मारुती असं म्हटलं जाऊ लागलं.

या सगळ्या झाल्या आख्यायिका आणि थिएरी. पण या मंदिराचं खरं नाव चेंज केलं ते मध्यप्रदेशचे माजी राज्यपाल हरिभाऊ पाटसकर यांनी.

हरिभाऊ विनायक पाटसकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे. स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात सुप्रसिद्ध वकिल होते. १९२०मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले. १९२६मध्ये ते तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. १९३७ ते १९३९ आणि नंतर पुन्हा १९४५ ते १९५२ पर्यंत त्यांनी निवडणुका जिंकल्या आणि मुंबई विधानसभेचे सदस्य होते.

१९५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या नंतर केंद्रीय कायदे मंत्रिपदाची जबाबदारी हरिभाऊ पाटसकर यांनी सांभाळली.

कायदामंत्री या हिंदू कोड बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधेयके संमत करून त्यांचे कायद्यात रूपांतर करण्यात हरिभाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. आंध्र प्रदेश आणि मद्रास या राज्यांमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. हा सीमावाद पाटसकर फॉर्म्युल्यामुळे कायमचा संपुष्टात आला.   

पुढे त्यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाली. अनेक वर्षे ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. आपला अखेरचा काळ त्यांनी पुण्यातच व्यतीत केला.

गणेश पेठेतील लक्ष्मी रोडवरच्या डुल्या मारुतीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. ते नेहमी या मूर्तीची पूजा करण्यासाठी येत असत. आख्यायिका काहीही असोत या मारुतीचे आणि मंदिराचे नामकरण माजी गव्हर्नर हरिभाऊ पाटसकर यांनीच केलं आहे असं तिथल्या मंडळाचे पदाधिकारी सांगतात. या मंदिरामुळे गणपती मंडळाचे नाव डुल्या मारुती मंडळ ठेवण्यात आले आहे.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Saket Deo says

    पानमोड्या म्हसोबा पुण्यात कुठे आहे?
    आपल्या लेखात तसा उल्लेख आहे म्हणून विचारलं!

Leave A Reply

Your email address will not be published.