९० वर्षांपूर्वी एक मराठमोळी अभिनेत्री चक्क “मर्सिडीज ब्रॅण्डची” मॉडेल होती..

एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जेव्हा कलाकार म्हणून यशस्वी होतात तेव्हा त्यामागे असते एक प्रचंड मेहनत. सध्याच्या काळात स्वतःच्या अभिनयाचे रंग दाखवण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. त्यामुळे एखादी मालिका किंवा एखादी वेबसीरिज मिळाली की एखाद्या कलाकाराला पटकन प्रसिद्धी मिळते.

परंतु जेव्हा कलासृष्टीची नुकतीच सुरुवात झाली होती, त्याकाळी मात्र स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी एखाद्या कलाकाराला किती पराकोटीची मेहनत करावी लागत असावी, याचा आपण विचार करू शकत नाही.

सिनेसृष्टीच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करून त्याकाळच्या मोठमोठ्या कलाकारांसोबत आत्मविश्वासाने अभिनय करणारी एक अभिनेत्री म्हणजे दुर्गा खोटे.

आज दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी.

सिनेमात असणाऱ्या आईची व्याख्या काळानुरूप बदलत गेल्या. परंतु मुलांवर जीवापाड प्रेम असणारी, मुलगा आणि नवरा यांच्यामध्ये नेमकी कोणाची बाजू घ्यावी या संभ्रमात असणारी तुमच्या आमच्या घरातली आई दुर्गा खोटे यांनी सिनेमात साकारली.

आजही जेव्हा ‘मुघल – ए – आजम’ सिनेमा पाहण्यात येतो, तेव्हा दुर्गा खोटे यांनी साकारलेली जोधाबाईची व्यक्तिरेखा ही एका आदर्श आईचे उदाहरण म्हणून पाहता येईल.

एका बाजूला पतीची कठोर अशी तत्व तर दुसऱ्या बाजूला मुलाविषयी तुटत जाणारं काळीज, दुर्गा खोटेंनी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्याला तोड नाही.

दुर्गा खोटे यांच्या व्यक्तीमत्वाविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आणि अभिनयात असलेला साधेपणा. यामुळे समोर कोणताही मोठा कलाकार असुदे दुर्गाबाईंचा अभिनय छोट्या प्रसंगात सुद्धा झळाळून उठतो.

उदाहणादाखल सांगायचं झालं,

तर ‘आनंद’ सिनेमात दुर्गाबाईंचा राजेश खन्ना सोबत एक प्रसंग आहे. या प्रसंगात आईच्या नात्याने त्या राजेश खन्नाची विचारपूस करतात. यावेळेस दुर्गाबाईंच्या चेहऱ्यावर असलेला कमालीचा साधेपणा आणि मायेची भावना आपलीशी वाटते.

ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांपासून सुरू झालेलंं सिनेमाचं रुपांतर जेव्हा रंगीत सिनेमात होत होतं, तेव्हा दुर्गाबाई खोटे या बदलाच्या साक्षीदार होत्या.

ज्या काळात दुर्गाबाई खोटे यांनी सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवले तो काळ महिलांसाठी तितका अनुकूल नव्हता. अगदी सिनेमात सुद्धा महिलांच्या भूमिका पुरुष कलाकार साकारत होते. अशा विचित्र परिस्थितीमध्ये दुर्गा खोटे यांनी सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.

इतकंच नव्हे तर, सिनेमात येऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी त्या आदर्श झाल्या.

दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबईत झाला.

एका प्रतिष्ठित परिवाराची पार्श्वभूमी त्यांना होती. वयाच्या १८ व्या वर्षी विश्वनाथ खोटे यांच्याशी दुर्गाबाईंचा विवाह झाला. दुर्गाबाई आणि विश्वनाथ यांचं वैवाहिक जीवन सुखी सुरू होतं. परंतु फार कमी वयात दुर्गाबाईंना वैधव्य आलं. साधारण वयाच्या २६ व्या वर्षी दोन मुलांचं संगोपन करण्यासाठी दुर्गाबाईंनी सिनेमात काम करण्याची वाट निवडली.

त्याकाळी चांगल्या घरच्या मुलींनी सिनेमात काम करू नये, असा एक समज होता.

दुर्गाबाईंचं कुटुंब सुद्घा प्रतिष्ठित असल्याने त्यांना साहजिक घरातुन विरोध झाला. परंतु कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं दुर्गाबाईंनी ठरवलं होतं. त्यामुळे घरच्यांचा विरोध असूनही दुर्गाबाई सिनेमात आल्या.

मूकपट मागे सरून बोलपटांचा जमाना सुरू झाला होता.

या काळात दुर्गाबाईंनी केलेला पहिला सिनेमा म्हणजे ‘फरेबी जाल’. पैशाची गरज होती त्यामुळे ‘फरेबी जाल’ सिनेमात दहा मिनिटांची एक छोटीशी भूमिका दुर्गाबाईंनी केली.

पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा सिनेमाचा आशय काहीसां वेगळा असल्याकारणाने दुर्गाबाईंना सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलं. पहिल्या सिनेमात काम करण्याचा असा विचित्र अनुभव आल्याने दुर्गाबाईंनी सिनेमांचा जणू धसका घेतला.

अशातच शांताराम बापूंची आणि दुर्गाबाईंची गाठ पडली.

दुर्गाबाईंची मेहनत आणि काम करण्याची जिद्द शांताराम बापूंना माहित होती. ‘प्रभात फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेल्या ‘अयोध्येचा राजा’ या सिनेमात तारामतीची भूमिका करण्याची ऑफर शांतारामबापूंनी दुर्गाबाईंना दिली. पहिल्या सिनेमात आलेल्या वाईट अनुभवामुळे दुर्गाबाईंनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला.

शांताराम बापूंनी दुर्गाबाईंना समजावलं आणि अखेर दुर्गाबाई ‘अयोध्येचा राजा’ सिनेमात काम करण्यास तयार झाल्या.

‘अयोध्येचा राजा’ सिनेमात दुर्गाबाईंनी साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा झाली. दुर्गाबाईंना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आणि या सिनेमानंतर दुर्गाबाईंना भारतीय सिनेसृष्टीत एक आदराचे स्थान मिळाले.

दुर्गाबाई या भारतीय सिनेमातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी सिनेमा निर्मितीप्रक्रियेत सुद्धा स्वतःचा सहभाग दर्शवला.

१९३७ साली आलेल्या ‘साथी’ या सिनेमाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दुर्गाबाईंनी सांभाळली. त्या काळच्या चंद्र मोहन, सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर यांसारख्या अनेक दिग्गज नटांसोबत दुर्गाबाईंनी काम केले.

अभिनयात स्थिरस्थावर होण्याआधी दुर्गाबाईंनी काही काळ मॉडेलिंग सुद्धा केली होती

१९३० साली मर्सिडीज बेंझ गाडीची जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्या जाहिरातीमध्ये दुर्गाबाई मॉडेल म्हणून झळकल्या होत्या. दुर्गाबाई या पहिल्या मराठी स्त्री असाव्यात ज्यांना इतक्या मोठ्या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकण्याची संधी मिळाली. आपल्या सर्वांसाठी निश्चितच ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

IMG 20200921 WA0024

२००० साली एका लोकप्रिय वृत्तपत्राने भारताची निराळी ओळख रचणाऱ्या १०० लोकांच्या यादीत दुर्गाबाईंना स्थान दिलं होतं.

१९८० साली सुभाष घई यांचा ‘कर्ज’ हा दुर्गाबाईंचा शेवटचा सिनेमा. त्यानंतर प्रकृतीच्या कारणाने त्यांनी अभिनयातून निवृत्ती पत्करली. परंतु ‘दुर्गा खोटे प्रोडक्शन कंपनी’ अंतर्गत त्यांनी अनेक जाहिराती, शॉर्ट फिल्म्स यांची निर्मिती केली. दूरदर्शन वरील गाजलेल्या ‘वागळे की दुनिया’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती दुर्गा खोटे यांनी केली होती.

एकूणच ज्या काळात कलाक्षेत्रात स्वतःचा जम बसवण्यासाठी महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं, अशा काळात दुर्गाबाईंनी जवळपास पन्नास वर्ष विविध सिनेमांतून भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.