दुर्गा – जिने नेहरूंना प्रवेश नाकारला होता…!!!

वर्ष १९२३. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भरलेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. अधिवेशनाच्या ठिकाणीच एक खादी प्रदर्शन देखील भरलेलं. प्रदर्शनाच्या गेटवर स्वयंसेवक म्हणून एक १४ वर्षीय मुलगी थांबलेली. तिकिटाशिवाय कुणालाही प्रदर्शनात  प्रवेश द्यायचा नाही, ही जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली. ही जबाबदारी त्या मुलीने  इतकी इमानेतबारे पार पाडली, की प्रदर्शनाचं तिकीट नाही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील त्या मुलीने प्रदर्शनात प्रवेश नाकारला होता, जे नेहरू पुढे स्वातंत्र्यानंतर तीला नियोजन आयोगाची सदस्य म्हणून नियुक्त करणार होते. हे काही त्या मुलीने नेहरूंना ओळखलं नाही म्हणून अनावधानाने केलं नव्हतं, तर आपण फक्त नियमांचं पालन करत होतो, आणि नियम सगळ्यांना सारखेच असले पाहिजेत असं तिचं म्हणणं होतं. फक्त प्रवेश नाकारूनच ती थांबली नव्हती तर ज्यावेळी आयोजकांनी नेहरूंसाठी तिकीट खरेदी केलं तेव्हाच तिनं नेहरूंना प्रदर्शनात प्रवेश दिला. दुर्गाबाई देशमुख त्या मुलीचं नाव. स्वातंत्र्य भारताचे पहिले वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या पत्नी. तेच चिंतामणराव देशमुख ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.

दुर्गाबाईंच्या लहानपणचा अजून एक किस्सा असाच रंजक आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या काकिनाडा दौऱ्यात त्यांना भेटून गांधीजींनी आंध्र प्रदेशमधील शोषित, वंचित, निराधार आणि तळागाळातील महिलांना भेटण्यासाठी यावं, त्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी त्यांनी केली होती. या शोषित महिला पुरुषांबरोबर गांधीजींच्या बैठकांना हजर राहू शकत नाहीत, त्यामुळे गांधीजींनीच त्यांना भेटावं अशी गळ त्यांनी गांधीजींना घातली. विशेष म्हणजे गांधीजींशी त्यांच्या आवडत्या भाषेत संवाद साधण्यासाठी दुर्गाबाईंनी अवघ्या सहा महिन्यातच हिंदी शिकून घेतली होती. केवळ स्वतः हिंदी भाषा शिकून त्या थांबल्या नाहीत तर मुलींना मोठ्या प्रमाणात हिंदी शिकता यावी म्हणून राजमुंदरी येथे मुलींसाठी ‘बालिका हिंदी पाठशाला’ स्थापन  करून अनेक महिला आणि मुलींना हिंदी शिकवली. या मुलीचा एवढा निग्रह बघून गांधीजींनी केवळ ५ मिनिटांचा वेळ तीला दिला आणि सोबतच स्वातंत्र्य चळवळीसाठी ५०० रुपये देण्यासही सांगितलं. गांधीजी ज्यावेळी या महिलांना भेटले त्यावेळी त्यांनी दिलेला ५ मिनिटांचा वेळ ते स्वतःच विसरले आणि जवळपास २ तास त्यांनी या महिलांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांना मार्गदर्शन केलं. या महिलांनीही स्वातंत्र्य चळवळीशी असणारं आपलं देणं म्हणून जवळपास १०००० रुपयांची मदत गांधीजींना सुपूर्द केली.

दुर्गाबाई देशमुख या आंध्र प्रदेश मधून येणाऱ्या आद्य महिला स्वातंत्र्यसेनानीपैकी एक होत. त्यांच्या आई कृष्णवेनाम्मा या काँग्रेसमध्ये सक्रीय असल्याने लहानपणापसूनच राजकीय आणि सामाजिक चळवळीचा वारसा त्यांना मिळालेला. बंडखोरी तर रक्तातच होती कारण वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी शाळेत इंग्रजी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारून त्यांनी शालेय शिक्षण सोडलं होतं. गांधीजींच्या अनुयायी असणाऱ्या दुर्गाबाईंनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत कारावास भोगला. तुरुंगवासानंतर त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. १९३७ साली त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापना केली. त्यांनी संविधान सभेच्या सदस्य म्हणूनही काम बघितलं. संविधान सभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या दुर्गाबाई एकमेव महिला होत. १९५२ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली पण त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. पंतप्रधान नेहरूंनी मात्र त्यांना नियोजन आयोगाच्या सदस्या म्हणून नियुक्त केलं. महिलांच्या प्रश्नांबाबतीत त्यातही प्रामुख्याने महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत त्या अतिशय आग्रही असत. त्यामुळेच महिला शिक्षा राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला. १९७५ साली भारत सरकारने त्यांना पद्म-विभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. १९८१ मध्ये त्यांचं निधन झालं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.